गृह मंत्रालय

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची ( DRRWG - डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक मुंबईत 23 ते 25 मे 2023 या कालावधीत होणार


आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीच्या कार्य गटाच्या बैठकीत पाच प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर विचारविनिमय होणार

जी-20 चे प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला देणार भेट

Posted On: 18 MAY 2023 6:04PM by PIB Mumbai

मुंबई, 18 मे 2023

 

मुंबईया शहराला पावसाळ्यात पाणी साचल्याने आपत्तकालीन परिस्थितीला सामोरे जावे लागले असा इतिहास आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबई महानगर प्रदेशात ढगफूटी मुळे झालेला विक्रमी पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापूराची आठवणी अद्यापही नागरीकांच्या मनात कायम आहे.

जी -20 अंतर्गत दुसऱ्या आपत्ती जोखीम निवारण कार्य गट (DRRWG) बैठकीत सहभागी होणारे प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट  देणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञान आधारित उपाय योजनांच्या आधारे मुसळधार पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मान्सून मध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत हे जाणून घेणार आहेत.

येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची (DRRWG - डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी  बैठक होत आहे. आपत्कालीन परिस्थितील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या कार्यकारी गटाने अर्थात डीआरआरडब्ल्यूजीने पाच प्रमुख प्राधान्यक्रमावरच्या उपाययोना मांडल्या आहेत. यात आगाऊ सूचना, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील अशा लवचिक पायाभूत सुविधा, राष्ट्रीय प्रतिसाद, अधिक चांगले आणि निसर्ग-आधारित उपाययोजनांची आखणी या उपाययोजनांचा समावेश आहे.

2005 मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर महाराष्ट्र सरकारने माधवराव चितळे सत्यशोधन समिती स्थापन केली होती. या समितीने आपल्या अहवालातून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पाणी साचण्याच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या भागांमध्ये अशा प्रकारची पाणी उपसा स्थानके उभारावीत यासह विविध उपाययोजना राबविण्याच्या शिफारसी केव्या होत्या.

मुंबईत पावसाच्या वेळीच समुद्राला भरती आलेली असेल तर अशावेळी पावसामुळे साचलेले पाणी समुद्रात वाहून जात नाही. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्याने समुद्राच्या दिशेने वाहून आलेले पावसाचे पाणी पुन्हा शहराच्या दिशेनेच ढकलले जाते, आणि परिणामी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते. ही परिस्थिती टाळता यावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करता यावा यासाठी पाणी उपसा स्थानकांमधील उच्च क्षमतेच्या पाण्याच्या पंपांच्या उपयोगाने, पावसामुळे साचलेले पाणी पुन्हा समुद्रात फेकले जाते. या व्यवस्थेमुळेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसामुळे साचलेल्या पाण्याचा झपाट्याने निचरा करणे शक्य होत असते. मुसळधार पावसाच्या काळात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ही पाणी उपसा स्थानके महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी म्हटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाची पाणी उपसा स्थानके (pumping stations - पंपिंग स्टेशन ) आणि भूमिगत पाणी साठवण टाक्यांमुळे पावसामुळे साचलेल्या पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यात मदत होत असते. मुंबईचे विशिष्ट भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तसेच मुसळधार पावसात पावसाच्या पाण्याचा प्रभावशाली पद्धतीने निचरा व्हावा यासाठी हाजी अली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), इरला (जुहू) आणि गजाधारबांध (संत) अशा सहा ठिकाणी पालिकेने उदंचन केंद्रे अर्थात पाणी उपसा स्थानके उभारली असून, ती कार्यरत आहेत. यासोबतच पालिकेच्या वतीने लवकरच आणखी दोन पाणी उपसा स्थानके उभारली जाणार आहेत. नमूद केलेल्या सहा पाणी उपसा केंद्रासोबत मुंबईत आणखी इतर ठिकाणी काही छोटी पाणी उपसा स्थानके देखील कार्यरत आहेत. या 6 पाणी उपसा केंद्रा मध्ये एकूण 43 पंप बसवलेले आहेत. प्रति सेकंद 6,000 लिटर पाण्याचा उपसा करण्याची या पंपांची क्षमता आहे. एकत्रीतपणे पाहीले तर, या सर्व पंपांची मिळून प्रति सेकंदाला एकूण 2 लाख 58 हजार लिटर इतक्या पाण्याचा उपसा करण्याची क्षमता आहे. या सर्व पंपांचे कार्यान्वयन संगणकीय पद्धतीने केले जाते. तसेच पावसाचे प्रमाण आणि पाणी उपसा स्थानकांच्या दिशेने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रमाणानुसार हे पंप स्वयंचलीतरित्या सुरू होतात.

हाजी अली उदंचन केंद्र

बृहन्मुंबई महापालिकेने 'स्वर्गीय प्रमोद महाजन पार्क' परिसरात पाण्याची भूमिगत साठवण टाकी बांधण्याचे कामही हाती घेतले होते. मुंबईतील हिंदमाता भागात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येपासून सुटका मिळवसाठी ही टाकी उभारण्यात आली होती. मुसळधार पावसाच्या वेळी या भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करून ते या टाकीत साठवले जाते. 2022 च्या पावसाळ्यात या प्रचंड मोठ्या पाणी साठवण टाकीत लाखो लिटर पावसाचे पाणी साचवले गेले होते. त्यामुळे मागच्या वर्षी पावसाच्या काळात या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली नव्हती.

भूमिगत साठवण टाकी

जुलै 2005 मध्ये पूरपरिस्थिती, कचरा आणि नदीलगतच्या अतिक्रमणामुळे मिठी नदी नदीच्या पात्राचा विस्तार झाल्याने मुंबईत काही उपनगरीय भागात पूर आला. या अतिशय गंभीर  प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर 2022 मध्ये पवई परिसरात 'मिठी नदी पाणी गुणवत्ता सुधारणा' प्रकल्प सुरू केला, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त  पी. वेलरासू यांनी दिली.

   

'मिठी नदी पाणी गुणवत्ता सुधारणा' प्रकल्प

 

जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकार गट ( DRRWG - डीआरआरडब्ल्यूजी )

हा भारताने आपल्या जी-20 च्या अध्यक्षपदाअंतर्गत हाती घेतलेला उपक्रम आहे. यावर्षी मार्च - एप्रिलमध्ये गांधीनगरमध्ये इथे जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यकारी गटाची ( DRRWG - डीआरआरडब्ल्यूजी ) पहिली बैठक झाली होती. आपत्ती धोका निवारण्याचा मुद्दा जी 20 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी भारताने हाती घेतलेला हा उपक्रम, 2015 ते 2030 ( Sendai Framework ) या काळात आपत्तकाली परिस्थितीतील धोका कमी करण्यासाठीच्या सेंदाई आराखड्याचा ( Sendai Framework ) भाग आहे. हा करार, जी 20 सदस्य देशांना आपत्तींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून विकास प्रक्रियांच्या लाभांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कृती आराखडा प्रदान करणारा पहिला महत्वाचा करार ठरला होता. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्यासंदर्भातल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेवेळी हा करार स्विकारला गेला होता. 'आपत्तींमुळे उद्भवणारे धोखे, बळी पडणारे जीव, तसेच उपजीविका आणि आरोग्य आणि त्यासोबतच व्यक्ती, व्यवसाय, समुदाय तसेच त्या त्या देशांच्या आर्थिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीत शाश्वत स्वरुपाची लक्षणीय घट साधायला हवी या उद्देशाने हा करार केला गेला आहे. आपत्तींमुळे उद्भवणारे धोके कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये प्राथमिक भूमिका ही राज्याची असते, त्यामुळेच स्थानिक पातळ्यांवरची सरकारे तसेच खाजगी क्षेत्रांसह इतर भागधारकांनीही या बाबतीतल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत असेही या करारात म्हटले गेले आहे.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925287) Visitor Counter : 228