नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची जी-20 अध्यक्षता म्हणजे सागरी वाऱ्यांतून निर्माण होणाऱ्या उर्जेशी संबंधित देश, व्यापारी संस्था तसेच आर्थिक संस्थांना स्वच्छ उर्जा स्थित्यंतरविषयक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची मिळालेली संधी आहे - केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय सचिव भूपिंदर सिंग भल्ला

Posted On: 17 MAY 2023 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली होत असलेल्या उर्जा स्थित्यंतरविषयक कृतिगटाच्या (ईटीडब्ल्यूजी) तिसऱ्या बैठकीचा भाग म्हणून   केंद्रीय  नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने  (एमएनआरई) जागतिक पवन उर्जा परिषद (जीडब्ल्यूईसी) तसेच राष्ट्रीय पवन उर्जा संस्थेच्या (एनआयडब्ल्यूई) सहकार्याने मुंबई येथे 16 मे 2023 रोजी  उर्जा संक्रमणाला  गती देण्यासाठी सागरी वाऱ्यांचा वापर या विषयावर आधारित उच्च-स्तरीय सत्राचे आयोजन केले होते. संबंधित सरकारी अधिकारी आणि आर्थिक संस्था तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.  भारतात तसेच जागतिक पातळीवर उर्जा निर्मितीसाठी समुद्रांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा अधिक प्रमाणात उपयोग करून घेण्यासंदर्भात  आवश्यक असलेल्या -  परवानग्या तसेच मंजुऱ्या, पुरवठा साखळीची  लवचिकता, कमी दरातील कर्ज पुरवठा, क्षमता बांधणी तसेच उर्जा बाजारात आकर्षकता वाढवण्यासाठी व्यापाराची वाढीव उलाढाल यांसारख्या   तातडीच्या प्राधान्यक्रमाच्या बाबींचे आदानप्रदान करण्यासाठीचा मंच म्हणून हे सत्र उपयुक्त ठरले.        

यावेळी बोलताना केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी वायू प्रदूषण आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने  सागरी वारे  उपयुक्त ठरू शकतात असे सांगितले. समुद्रांतून वाहणाऱ्या वाऱ्यांपासून निर्माण होणाऱ्या पवन उर्जाविषयक मूल्य साखळीची भरघोस वाढ करण्यातून  देशात  रोजगार निर्मिती करणे शक्य  आहे यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, भारताची जी-20 अध्यक्षता म्हणजे सागरी पवन उर्जेशी संबंधित देश, व्यापारी संस्था तसेच आर्थिक संस्था यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी आणि राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच जागतिक सागरी पवन उर्जा आणि स्वच्छ उर्जा स्थित्यंतरविषयक उद्दिष्टांच्या पूर्तीला पाठींबा देण्यासाठी परस्पर सामर्थ्य उभारण्यासाठी मिळालेली संधी आहे.

ईटीडब्ल्यूजीचे अध्यक्ष आणि केंद्रीय उर्जा मंत्रालय सचिव आलोक कुमार यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, भारताच्या आगामी उर्जा मिश्रण प्रकारात समुद्रांतून वाहणाऱ्या वाऱ्यांपासून निर्माण होणाऱ्या पवन उर्जेचे प्रमाण  वाढवण्याच्या  भूमिकेवर भर दिला. तसेच सागरी वाऱ्यांचा उपयोग करण्याचे क्षेत्र उपलब्ध असणे ही देशासाठी वर्ष 2030 नंतरच्या काळात  उदयाला येणारी मोठी संधी असेल असे ते म्हणाले.  ते म्हणाले की, पवन उर्जेसंदर्भात स्वीकारलेल्या अभियान तत्वावरील दृष्टीकोनामुळे देशाच्या आकांक्षांना आणखी बळ मिळेल आणि त्यातून एक सशक्त मूल्य साखळी विकसित होऊन अधिक उत्साही सहभागासाठी उद्योग क्षेत्राला याकडे आकर्षित करेल.

भारत सरकारच्या नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश दयानंद जगदाळे यांनी किनाऱ्यालगतच्या प्रदेशांच्या उर्जा संक्रमणासंदर्भातील प्रगतीच्या विविध पैलुंबाबत रूपरेषा स्पष्ट केली. यात प्रस्तावित व्यावसायिक मॉडेल्स, निविदा काढण्याच्या भावी योजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मजबूत पर्यावरणाची सुविधा तयार करण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यात व्यापक संपर्क प्रस्थापित करण्याचा समावेश आहे.

जीडब्ल्यूईसी इंडियाचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांनी सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्य आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ऑफशोअर कंपन्या याशिवाय उर्जा निर्मिती संयंत्रे आणि मूळ उपकरणांचे उत्पादक यांच्यातील भागीदारी याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी शेवटी बहुपक्षीय विकास बँकांचा सहभाग याविषयी स्पष्टीकरण केले. त्यांनी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच खासगी आणि सरकारी कंपन्या यांच्यात वीज खरेदी करारांबाबत दीर्घकालीन भागीदारीवर जोर दिला.

ग्लोबल हेड ऑफ ऑफशोअर विंड (जीडब्ल्यूईसी), रिबेका विल्यम्स आणि आयआरईडीएचे माजी संचालक चिंतन शहा यांनी दोन उच्चस्तरीय पॅनल चर्चेत सहभाग घेतला. या सत्राचे नाव रोल ऑफ ग्लोबल ऑफशोअर विंडसेक्टर इन रिचिंग नेट झिरो टार्गेट्स असे होते. त्यात वै ग्लोबल ऑफशोअर विंड क्षेत्रातील अनुभव, आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पद्धती, पुरवठा साखळीतील प्राधान्यक्षेत्रे आणि उदयोन्मुख भारतीय ऑफशोअर विंड बाजारपेठांकडून उद्योगाला असलेल्या अपेक्षा यावर विचारविनिमय करण्यावर भर देण्यात आला होता.

किनाऱ्यालगतच्या प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परीसंस्थेसाठी विकसित करण्यासंबंधी गरजा भागवण्यासाठी वित्तपुरवठा आणि क्षमता निर्मिती यावर पॅनलमध्ये झालेल्या चर्चेत सर्वसमावेशक असा विचार करण्यात आला. आशियाई विकास बँक, जागतिक बँक, कोरियो जनरेशन, एओएन, राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, आरईएल, एनआयडब्ल्यूई, आरईएनईडब्ल्यू आयआरईडीए, अपकटीय वारे आणि नवीकरणीय उर्जाविषयक उत्कृष्टता केंद्र, आयईए, ओटु पॉवर आणि एसजीआरई यासह अनेक तज्ञ सहभागी झाले होते.

आपल्या समारोपाच्या भाषणात, एनएनआरई, संयुक्त सचिव,दिनेश दयानंद जगदाळे यांनी या प्रसंगी सर्वांचे दृष्टीकोन समृद्ध करणारी चर्चा घडल्याचे नमूद केले. तसेच सर्व विद्वान वक्त्यांचे आणि प्रतिष्ठित सहभागी व्यक्तींचे त्यांच्या उत्साही सहभागाबद्दल आभार मानले.

 

 

 

 

JPS/ST/Sanjana/Umesh K/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924764)