आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविय यांनी वैद्यकीय उपकरण निर्मिती करणाऱ्या जपानी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद


जपानी वैद्यकीय कंपन्यांना "मेक इन इंडिया", "इनोव्हेट इन इंडिया" आणि "डिस्कव्हर इन इंडिया" योजनांच्या संधींचा लाभ घेण्यासाठी केले निमंत्रित

Posted On: 16 MAY 2023 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

"वैद्यकीय उपकरणे निर्मिती  क्षेत्र हे भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राचा आवश्यक आणि अविभाज्य घटक आहे. भारताने वैद्यकीय उपकरणे आणि निदान सामग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून कोविड 19 महामारीच्या देशांतर्गत आणि जागतिक लढ्याला पाठिंबा दिल्यामुळे या क्षेत्राचे योगदान अधिक महत्वाचे ठरले आहे." असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविय यांनी जपानी वैद्यकीय उपकरण कंपन्यांच्या प्रतिनिधींशी टोकियो येथे संवाद साधताना सांगितले.

"वैद्यकीय उपकरणे क्षेत्राच्या क्षमता वृद्धीला मोठा वाव असून सध्याच्या 11 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 2030 पर्यंत त्यात चौपट वाढ होऊ शकते" असे डॉ मांडवीया म्हणाले.आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढत्या गरजा आणि वृद्धीला चालना देण्यासाठीच्या  भारत सरकारच्या  वचनबद्धतेमुळे, भारतीय वैद्यकीय उपकरणे उद्योगाकडे  येत्या 25 वर्षांमध्ये संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेत जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येण्याची ताकद आहे आणि या क्षेत्राचा विस्तार आणि प्रगती होऊन ते आत्मनिर्भर व्हावे आणि भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या मंत्रानुसार जागतिक आरोग्य सेवा क्षेत्राला योगदान देण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय उपकरण क्षेत्राची सुव्यवस्थित वाढ होण्यासाठी आणि सर्वांसाठी, परवडण्याजोगे, गुणवत्ता आणि नवोन्मेष ही  सार्वजनिक आरोग्याबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताने नुकतेच आपले पहिले राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण मंजूर केले, अशी माहिती डॉ. मांडविय यांनी दिली.

"नवोन्मेषामध्ये गतिमान प्रगतीसह, भारत आता वैद्यकीय उपकरणे आणि तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक स्तरावर नेण्यासाठीचा ऐतिहासिक प्रवास करत आहे" असे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले आणि जपानी वैद्यकीय कंपन्यांना "मेक इन इंडिया", "इनोव्हेट इन इंडिया" आणि "डिस्कव्हर इन इंडिया" योजनांच्या संधींचा लाभ घेण्यासाठी निमंत्रित केले.आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव, विशाल चौहान आणि केंद्र सरकारचे इतर अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

 

S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924532) Visitor Counter : 197