गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या 'मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर' या भव्य मोहिमेचा प्रारंभ
Posted On:
15 MAY 2023 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मे 2023
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या 'मेरी लाईफ ( LiFE), मेरा स्वच्छ शहर (माझी पर्यावरणसासाठी जीवनशैली,माझे स्वच्छ शहर )' या भव्य मोहिमेचा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस. पुरी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रारंभ केला.
सामान्य घरगुती वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या सवयीतून प्रेरणा घेऊन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कचरा व्यवस्थापनातील तीन R अर्थात कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर' मोहिमेचा प्रारंभ केला आहे. शहरी भारत कचऱ्यापासून ‘संपत्ती’ बनवण्याची तत्त्वे अधिकाधिक अंगीकारत आहे आणि पुन्हा वापरण्यासाठी जुन्या वस्तूंचे सक्रियपणे नूतनीकरण करत आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियान -शहर 2.0 अंतर्गत एकूण शून्य-कचरा परिसंस्थेला चालना मिळत आहे.
कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण हा ‘कचऱ्यातून संपत्ती निर्मितीचा’ चा कणा आहे आणि त्यातून अनेक कारागीर, पुनर्चक्रीकरण करणारे, बचत गट, उद्योजक, स्टार्टअप इत्यादींना अनेक उत्पादनांमध्ये कचऱ्याचा पुनर्वापर करून उत्पादननिर्मितीत सक्षम बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभियान, लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) वैयक्तिक आणि सामूहिक कृतीला आणखी प्रोत्साहन देते.
या देशव्यापी मोहिमेचे उद्दिष्ट, नागरिकांना कपडे, पादत्राणे , जुनी पुस्तके, खेळणी आणि वापरलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर किंवा पुनर्वापर करण्यासाठी योगदान देता यावे यासाठी शहरांमध्ये ‘तीन आर( Reduce, Reuse, Recycle) केंद्रे, वन स्टॉप संग्रह केंद्रे , यांची उभारणी व्हावी, हा आहे.
देशभरात 20 मे 2023 रोजी RRR केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. न वापरलेल्या किंवा वापरलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, कपडे, पादत्राणे, पुस्तके आणि खेळणी जमा करण्यासाठी ही केंद्रे नागरिक, संस्था, व्यावसायिक उपक्रम इत्यादींकरिता वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करतील. संकलनानंतर, या वस्तू वेगवेगळ्या भागधारकांना पुनर्वापरासाठी, नूतनीकरणासाठी किंवा नवीन उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी दिल्या जातील. अशा प्रकारे सरकारच्या चक्राकार अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनाला खऱ्या अर्थाने गती दिली जाईल.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी आरआरआर संकल्पना गीत स्पर्धेचा प्रारंभही केला. स्पर्धक संकल्पना गीत लेखन, रचना, गायनाद्वारे सादर करू शकतात आणि आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात. ही स्पर्धा MyGov मंचावर 20 मे ते 18 जून 2023 या कालावधीत खुली असेल.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून 5 जून, 2023 रोजी पर्यावरणासाठी जीवनशैली प्रतिज्ञा घेऊन तसेच सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमा हाती घेऊन 'मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर' मोहिमेचा समारोप होईल.
नागरिक MyGov वर https://pledge.mygov.in/life-movement/ येथे 'पर्यावरणासाठी जीवनशैली' (LiFE) प्रतिज्ञा घेऊ शकतात.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924260)
Visitor Counter : 253