आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एकात्मिक औषध क्षेत्रात आरोग्यविषयक संशोधनासाठी सहयोग आणि सहकार्याला गती मिळण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय विज्ञान परिषद आणि आयुष मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार


या सामंजस्य कारारामुळे पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांच्यातला समन्वय सुरु राहून, वैज्ञानिक पुराव्यांचे आधारे आयुर्वेदाला आपली ओळख अधिक बळकट करण्यास मदत मिळेल: डॉ. मांडवीय

Posted On: 11 MAY 2023 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक असलेली एक लक्षणीय उपलब्धी तसेच, आयुष वैद्यकशास्त्रांना आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडत, मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने, आरोग्य मंत्रालायाच्या अखत्यारीतील संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयादरम्यान आज एक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एकात्मिक आरोग्य शास्त्राच्या क्षेत्रात सहयोग आणि सहकार्याला गती देण्याचे उद्दिष्ट यामुळे साध्य होऊ शकेल. आयुष मंत्रालयाचे सचिव, वैद्य राजेश कोटेचा आणि डीएचआरचे सचिव तसेच आयसीएमआर चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत ह्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि नीती आयोगाचे सदस्य, डॉ. वि. के. पॉल हे ही यावेळी उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे आयुष आणि आयसीएमआर या संस्थांमध्ये सहकारी आणि सहयोग करण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे, दोन्ही संस्थांमधील आरोग्यविषयक एकात्मिक संशोधन अधिक समन्वयाने आणि एकत्रितपणे होऊ शकेल, जेणेकरुन आरोग्य क्षेत्रातील संशोधनाच्या क्षमता अधिक बळकट होतील.

या सामंजस्य कराराअंतर्गत, आयुष मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्यातील संधी विस्तारल्या जातील. यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम राबवणे आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या आजारांवर उपाययोजना करणे शक्य होईल. दोन्ही संस्था परस्पर सहकार्यातून, आयुष अंतर्गत येणाऱ्या वैद्यकशस्त्रांमधील उपचारांना वैज्ञानिक पाठबळ आणि पुरावे सादर करत इतर देशांकडून या उपचार पद्धतींना एक वैधानिक, शास्त्रीय आधार मिळू शकेल.

आयुष मंत्रालयाने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतूक करत, डॉ. मांडवीय म्हणाले, आधुनिक संशोधन आणि नवोन्मेष यांच्याशी पारंपरिक वैद्यक शास्त्राची सांगड घातल्यामुळे, आयुर्वेदाला, आधुनिक वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे, आपली ओळख अधिक स्पष्ट करण्यास पाठबळ मिळेल.

"पुराव्यावर आधारित संशोधन क्षमतांना अधिक बळकट करण्यासाठी, त्यांचा वेग वाढवून त्या क्षमता अधिक व्यापक करण्यासाठी, या करार उपयुक्त ठरेल," असे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले.

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923425) Visitor Counter : 236