इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यु आय डी ए आय ) द्वारे नागरिकांना अधिक उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आधार ऑपरेटर्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम
यावर्षी आणखी 100 कार्यशाळा घेण्यात येणार आहेत
Posted On:
11 MAY 2023 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2023
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यु आय डी ए आय) ने देशभरातील हजारो आधार ऑपरेटर्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देशव्यापी क्षमता निर्माण मोहिमेला सुरुवात केली आहे.
या मोहिमेद्वारे ऑपरेटर्सना आधार परिसंस्थेमधील धोरणे/प्रक्रियेतील नवनवीन बदलांविषयी माहिती देऊन आणि नावनोंदणी, अद्यतने आणि प्रमाणीकरण प्रक्रियेदरम्यान ऑपरेटर स्तरावरील त्रुटी कमी करून परिसंस्था आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे नागरिकांना अधिक उत्तम सेवांचा अनुभव मिळेल.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, यु आय डी ए आय ने गेल्या काही महिन्यांमध्ये ईशान्येकडील राज्यांसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास दोन डझन प्रशिक्षण सत्रे आयोजित केली होती. ऑपरेटर्स हे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि नावनोंदणी, नवीन माहिती नमूद करणे आणि प्रमाणीकरण यासाठी जबाबदार असतात, त्यामुळे त्यांना प्रक्रिया, मार्गदर्शक सूचना आणि योजनांविषयी चांगली समज असणे अनिवार्य आहे.
याआधी घेतलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये जवळपास 3,500 ऑपरेटर आणि मास्टर प्रशिक्षकांना अद्ययावत ज्ञान तसेच नावनोंदणी, अपडेट आणि प्रमाणीकरण प्रक्रियेची यंत्रणा याविषयी आवश्यक मार्गदर्शन केले आहे. ते आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार करून इतरांपर्यंत माहिती पोहोचवू शकतात.
याशिवाय, यु आय डी ए आय द्वारे चालू वर्षात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी 100 हून अधिक पूर्ण-दिवसीय प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील.
या ऑपरेटर्सना मिळालेले आधार परिसंस्था आणि वर्तणुकीतील बदलाविषयीचे व्यापक ज्ञान, देशभरातील नावनोंदणी/अपडेट केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना अधिक सौहार्दपूर्ण आणि सुधारित अनुभव देण्यास साहाय्यभूत ठरेल.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923371)
Visitor Counter : 205