दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट आता कोट्यवधी व्यापाऱ्यांसाठी बनले लॉजिस्टिक भागीदार
Posted On:
09 MAY 2023 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे इंडिया पोस्ट विभागाने अखिल भारतीय व्यापारी महासंघ (सीएआयटी) आणि ट्रिप्टा टेक्नोलॉजीज यांच्याशी सामंजस्य करार केला. या करारान्वये ‘भारत ईमार्ट’ या पोर्टलचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या कार्यस्थळावरुन मालाची खेप उचलली जाण्याची सोय झाली असून देशभरात जेथे हा माल पोहोचणे अपेक्षित आहे तेथे पोहोचण्याची सुनिश्चिती झाली आहे. या सुविधेचा लाभ सीएआयटीशी जोडल्या गेलेल्या सुमारे आठ कोटी व्यापाऱ्यांना होईल असा अंदाज आहे.
इंडिया पोस्टने नुकतेच माल पाठविणारे आणि घेणारे यांच्या ठिकाणी अनुक्रमे पार्सलचे पिकअप आणि वितरण करण्याची सेवा पुरविण्यासाठी सरकारी ई-बाजार (जीईएम), भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाची प्रादेशिक केंद्रे यांच्याशी अशाच प्रकारचे करार केले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे विकसित होणाऱ्या डिजिटल वाणिज्य मंचासाठीच्या ओपन नेटवर्कमध्ये इंडिया पोस्ट हे लॉजिस्टिक सेवा पुरवठादार म्हणून लवकरच सहभागी होणार आहे.
आजच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणाले की टपाल विभागाने काळाबरोबर आणि जनतेच्या मागणीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. तंत्रज्ञानाचा समावेश तसेच नव्या सेवांची सुरुवात यामुळे इंडिया पोस्ट आता आधुनिक आणि बहुविध प्रकारच्या सेवांचा पुरवठादार विभाग झाला आहे. आज या विभागाद्वारे बँकिंग, विमा या सुविधांसोबतच सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, या विभागाने कोविड-19 च्या काळात तंत्रज्ञानाची मदत घेऊन डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच ऑनलाईन सेवा वितरण सुरु करून या संकटाचे संधीमध्ये रुपांतर केले.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922909)
Visitor Counter : 153