कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनसीजीजी ने मालदीव आणि बांगलादेशातील नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 3 क्षमता निर्मिती कार्यक्रमांची केली सुरुवात

Posted On: 09 MAY 2023 3:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

एनसीजीजी अर्थात राष्ट्रीय सुशासन केंद्राने आपल्या उपक्रमांमध्ये वाढ केली असून त्या अंतर्गत मसुरी येथील केंद्रामध्ये बांगलादेश (45 प्रशिक्षणार्थींची 59 वी तुकडी) आणि मालदिव्ह्ज (50 प्रशिक्षणार्थींची 22 तसेच 23 वी तुकडी) या देशांच्या नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तीन क्षमता निर्मिती कार्यक्रमांची सुरुवात केली आहे. यानंतर 6 मे 2023  रोजी बांगलादेशाच्या 58 व्या तुकडीचा क्षमता निर्मिती कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. नागरिक-केंद्री सरकारी धोरणे, सुशासन तसेच सेवांच्या वितरणात सुधारणा करण्यास उत्तेजन देणे आणि त्याद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून नागरिकांचे जीवनमान  उंचावणे हा  एनसीजीजी तर्फे देशांतर्गत तसेच इतर विकसनशील देशांतील नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेल्या क्षमता निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन असलेल्या  ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानाला अनुसरून  भारत तसेच इतर विकसनशील देशांतील नागरी सेवा कर्मचाऱ्यांच्या दरम्यान सहकार्य  आणि ज्ञान  यांना प्रोत्साहन देण्याप्रती एनसीजीजी समर्पित आहे. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना  गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन सुसज्ज बनवणे  हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  दोन आठवडे कालावधीचा हा सखोल प्रशिक्षण कार्यक्रम या कर्मचाऱ्यांना नव्याने उदयाला येत असलेली डिजिटल साधने तसेच सुशासनासाठी आवश्यक उत्तम पद्धतींसह त्यांचे ज्ञान तसेच कौशल्ये  अद्ययावत  करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात एनसीजीजी चे महासंचालक भरत लाल यांनी सामान्य लोकांना त्यांची संपूर्ण क्षमता समजून घेण्यात मदत करण्याच्या  नागरी सेवा कर्मचाऱ्यांच्या  भूमिकेवर अधिक भर दिला. जलद गतीने तसेच मोठ्या प्रमाणात  काम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले .  कालबद्ध पद्धतीने नागरिकांना जागतिक दर्जाच्या मुलभूत सेवा पुरवण्यावर त्यांनी भर दिला. मूलभूत सेवा देताना, नागरी सेवा कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गरजा तसेच प्राधान्यक्रम यांचा योग्य पद्धतीने अंदाज घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचा स्वीकार करावा अशी सूचना  त्यांनी केली.

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922779) Visitor Counter : 133