विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत आणि इस्रायलदरम्यान आज औद्योगिक संशोधन आणि विकास यासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञान क्षेत्रांवर केंद्रित सहकार्यविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
सीएसआयआर आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षणविषयक संशोधन आणि विकास संचालनालय यांच्यादरम्यान बहु-क्षेत्रीय करार करण्यात आला
Posted On:
02 MAY 2023 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2023
भारत आणि इस्रायल हे देश नवोन्मेष आणि स्टार्ट अप उद्योगांसारख्या अनेक क्षेत्रांतील भागीदारीत वाढ करतील तसेच अधिक सखोल द्विपक्षीय सहयोगाचा नवा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतील असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुऊर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षणविषयक संशोधन आणि विकास संचालनालयाचे प्रमुख डॉ.डॅनिएल गोल्ड यांच्या नेतृत्वाखालील उच्च स्तरीय शिष्टमंडळ आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले असताना ते बोलत होते.
या प्रसंगी, भारत आणि इस्रायल या देशांनी अवकाश तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, स्थापत्य, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी, पर्यावरणशास्त्र, वातावरण, भू तसेच महासागरी विज्ञान आणि जल, खनन, खनिजे, धातू आणि साहित्य, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा (पारंपरिक तसेच अपारंपरिक) आणि उर्जेची साधने, कृषी,पोषण आणि जैवतंत्रज्ञान तसेच आरोग्यसुविधा यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांवर अधिक भर देणाऱ्या औद्योगिक संशोधन आणि विकास यासंदर्भातील सहकार्यविषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
याशिवाय, यावेळी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या सन्माननीय उपस्थितीत नवी दिल्ली येथील सीएसआयआर-विज्ञान केंद्र येथे सीएसआयआर आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षणविषयक संशोधन आणि विकास संचालनालय यांच्यादरम्यान बहु-क्षेत्रीय करार करण्यात आला.
या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे स्वागत करत, केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, 2023 हे वर्ष आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे कारण या वर्षी भारताकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, यावर्षी भारत- इस्रायल हे देश त्यांच्यातील यशस्वी राजकीय संबंधांची 30 वर्षे देखील साजरी करत आहेत असे त्यांनी सांगितले.
हा करार नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप उद्योगांसारख्या अनेक क्षेत्रांतील भारत-इस्रायल भागीदारीचा नवा अध्याय सुरु करेल याबाबत आपण आशावादी असल्याचे मत केंद्रीय मंत्र्यांनी मांडले.
ते म्हणाले की, भारत आणि इस्रायल हे केवळ द्विपक्षीय भागीदार नाहीत तर ते आपल्या जगासमोर उभ्या ठाकलेल्या काही सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त गुंतवणूक तसेच पाणी, ऊर्जा, वाहतूक,अवकाश,आरोग्य आणि अन्न सुरक्षा क्षेत्रे यांतील नवे उपक्रम यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी आय2यू2 गट म्हणजेच भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका या देशांचा समावेश असलेल्या गटाची निर्मिती करण्यात आली आहे असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921486)
Visitor Counter : 186