पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटर्सच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 APR 2023 11:00PM by PIB Mumbai

नमस्कार ,

कार्यक्रमासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, विविध राज्यांचे माननीय मुख्यमंत्री सहकारी, खासदारवर्ग, आमदारवर्ग, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, 

आजच्या या कार्यक्रमात पद्म सन्मान प्राप्त करणारी अनेक व्यक्तिमत्वे देखील आपल्या सोबत सहभागी झाली आहेत. मी त्यांचे देखील आदरपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज ऑल इंडिया रेडियो च्या एफएम सेवेचा हा विस्तार, देशव्यापी एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. आकाशवाणीच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सची ही सुरुवात देशातील 85 जिल्ह्यांमधील 2 कोटी लोकांसाठी एखाद्या भेटवस्तू प्रमाणे आहे. एका प्रकारे या आयोजनात भारताची विविधता आणि वेगवेगळया रंगांची झलक देखील आहे. ज्या जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट केले जात आहे त्यामध्ये आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांना देखील या सेवांचा लाभ मिळत आहे.  मी या कामगिरीसाठी आकाशवाणीचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. आपल्या ईशान्येकडील बंधुभगिनींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, युवा मित्रांना होणार आहे. यासाठी त्यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करतो.

मित्रांनो,

ज्यावेळी रेडियो आणि एफएमची चर्चा होते, तर आपण ज्या पिढीमधील लोक आहोत, आपल्या सर्वांचे एका भावुक श्रोत्याचे देखील नाते आहे आणि माझ्यासाठी तर ही अतिशय आनंदाची बाब आहे की माझे तर एक सादरकर्ता म्हणून देखील नाते निर्माण झाले आहे. आता काही दिवसातच मी आकाशवाणीवर 'मन की बात' चा शंभरावा भाग सादर करणार आहे. 'मन की बात' चा हा अनुभव, देशवासीयांसोबत अशा प्रकारचा भावनात्मक नातेसंबंध केवळ रेडियोच्या माध्यमातूनच शक्य होता. मी याच्या माध्यमातून देशवासीयांच्या सामर्थ्याच्या संपर्कात राहिलो, देशाच्या सामूहिक कर्तव्यशक्तीच्या संपर्कात राहिलो. स्वच्छ भारत अभियान असो, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ असो, किंवा ‘हर घर तिरंगा’ अभियान असो, 'मन की बात' ने या अभियानांना लोकचळवळ बनवले आहे. म्हणूनच एका प्रकारे मी आकाशवाणीच्या तुमच्या संचाचा देखील एक भाग आहे. 

मित्रांनो,

आजच्या या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. वंचितांना मानांकन देण्याच्या सरकारच्या धोरणाला देखील हे पुढे नेत आहे. जे आतापर्यंत या सुविधेपासून वंचित राहिले, ज्यांना अतिदुर्गम भागातील मानले जात होते, ते आता आपल्या सर्वांसोबत आणखी जास्त प्रमाणात जोडले जातील. वेळेवर माहिती पोहोचवयाची असेल, समुदाय बांधणीचे काम असेल, शेतीशी संबंधित हवामानाची माहिती असेल, शेतकऱ्यांना पिके, फळे-भाजीपाला यांच्या दरांची ताजी माहिती देणे असेल, रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या हानीविषयी चर्चा असेल, शेतीसाठी आधुनिक यंत्रांचे पुलिंग असेल, महिलांच्या बचत गटांना नव्या बाजारपेठांविषयी माहिती द्यायची असेल, किंवा मग एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपूर्ण भागाला मदत पुरवायची असेल, यामध्ये या एफएम ट्रान्समीटर्सची अतिशय महत्त्वाची भूमिका असेल. या व्यतिरिक्त एफएमचे जे माहितीपूर्ण मनोरंजन मूल्य आहे ते तर असेलच.

मित्रांनो,

आमचे सरकार, सातत्याने, याच प्रकारे,  तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण , Democratization यासाठी काम करत आहे. भारताला आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी कोणत्याही भारतीयाकडे संधीची कमतरता नसेल ही बाब अतिशय गरजेची आहे. आधुनिक तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध बनवणे, परवडणारे बनवणे याचे हे खूप मोठे माध्यम आहे. आज भारतात ज्या प्रकारे गावागावांमध्ये ऑप्टिकल फायबर पोहोचवले जात आहे. मोबाईल आणि मोबाईल डेटा, या दोघांच्या किमती इतक्या कमी झाल्या आहेत की त्यामुळे माहिती पर्यंत पोहचणे   अतिशय सोपे झाले आहे. सध्या आपण पाहात आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावांमध्ये डिजिटल उद्योजक  तयार होऊ लागले आहेत. गावातील युवा गावात राहूनच डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कमाई करू लागले आहेत. याच प्रकारे आपल्या लहान दुकानदारांना, फेरीवाल्या मित्रांना इंटरनेट आणि युपीआयची जेव्हापासून मदत मिळाली आहे तेव्हापासून त्यांनी बँकिंग प्रणालीचा लाभ घ्यायला देखील सुरुवात केली आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या मच्छिमार बांधवांना हवामानाची योग्य माहिती योग्य वेळी मिळू लागली आहे. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले लघुउद्योजक आपली उत्पादने, देशाच्या कानाकोपऱ्यात विकू शकत आहेत. यामध्ये गवर्नमेंट-ई-मार्केट प्लेस म्हणजे GeM ने देखील त्यांना मदत मिळू लागली आहे. 

 

मित्रांनो,

गेल्या काही वर्षात देशात जी तंत्रज्ञान क्रांती झाली आहे, त्याने रेडियो, विशेषतः एफएम रेडियोला देखील नवा साज चढवण्यात आला आहे. इंटरनेटमुळे रेडियो मागे पडलेला नाही तर ऑनलाईन एफएमच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून अशा अभिनव पद्धतीने, रेडियो आणखी लोकांपर्यंत पोहोचतो आहे. म्हणजे डिजिटल इंडियाने रेडियोला नवे श्रोतेही दिले आहेत आणि नवा विचारही दिला आहे. हीच क्रांती आपण संपर्काच्या प्रत्येक माध्यमात झालेली बघू शकता. जसे की आज देशात, सर्वात मोठे डीटीएच प्लॅटफॉर्म, डीडी मोफत डिश सेवा चार कोटी 30 लाख घरांपर्यंत पोहोचते आहे. देशातल्या कोट्यवधी ग्रामीण घरांमध्ये, सीमेवर राहणाऱ्या लोकांपर्यंत आज जगातील प्रत्येक माहिती, त्याचवेळी पोहोचते. समाजातला जो वर्ग, कित्येक दशके दुर्बल आणि वंचित होता, त्याला देखील फ्री डिशच्या माध्यमातून शिक्षण आणि मनोरंजनाची सुविधा मिळते आहे. यामुळे समाजाच्या विविध वर्गांमधे असलेली  विषमता दूर करण्यासोबतच प्रत्येक व्यक्तीपर्यंत दर्जेदार माहिती पोहचवण्यात यश मिळाले आहे. आज डीटीएच वाहिन्यांवर विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एकाहून एक उत्तमोत्तम विद्यापीठांचे ज्ञान थेट आपल्या घरांपर्यंत पोहोचते आहे. कोरोना काळात यामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना खूप मदत मिळाली. डीटीएच असो किंवा मग एफएम रेडियो असो, यांची ही ताकद आपल्याला भविष्यातील भारतात डोकावून बघण्याची एक खिडकी देते, यातूनच आपल्याला स्वतःला भविष्यासाठी सज्ज करायचे आहे.

मित्रांनो,

एफएम ट्रान्समीटर्स मुळे निर्माण झालेल्या संपर्कव्यवस्थेला आणखी एक पैलू आहे. देशातील सर्व भाषांमध्ये आणि विशेषतः 27 बोली भाषांच्या  प्रदेशात या एफएम ट्रान्समीटर्स द्वारे प्रसारण होणार आहे. म्हणजे ही संपर्क व्यवस्था फक्त संवादाच्या, संपर्काच्या साधनांनाच परस्परांशी जोडत नाही, तर लोकांनाही जोडते आहे. ही आमच्या सरकारची काम करण्याच्या पद्धतीची एक ओळख आहे. आपण जेव्हा नेहमी संपर्कव्यवस्थेबद्दल बोलतो, तेव्हा आपल्यासमोर रस्ते, रेल्वे, विमानतळे यांचे चित्र उभे राहते. मात्र, आमच्या सरकारने या भौतिक संपर्कयंत्रणेसोबतच सामाजिक संपर्कयंत्रणा वाढवण्यावरही भर दिला आहे. आमचे सरकार सांस्कृतिक संपर्कयंत्रणा आणि बौद्धिक संपर्क यंत्रणा देखील सातत्याने मजबूत करत आहे.

उदाहरणार्थ, गेल्या नऊ वर्षात आपण पद्म पुरस्कार, साहित्य आणि कला पुरस्कारांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील खऱ्या नायकांचा गौरव केला आहे. पूर्वीप्रमाणे आता पद्म सन्मान शिफारसींच्या आधारावर दिला जात नाही, तर देश आणि समाजसाठी केलेल्या सेवेच्या मूल्यांकनाच्या आधारावर दिला जातो. आज आपल्यासोबत उपस्थित असलेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांना हे चांगलेच माहीत आहे. देशाच्या विविध भागांतील तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर एका राज्यातील लोक दुसऱ्या राज्यात जात आहेत. पर्यटन स्थळांना भेट देणार्‍या लोकांची वाढती संख्या हा देशातील वाढत्या सांस्कृतिक संपर्काचा पुरावा आहे. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित संग्रहालय असो, बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थची पुनर्बांधणी असो, पीएम संग्रहालय असो किंवा राष्ट्रीय युद्ध स्मारक असो, अशा उपक्रमांनी देशातील बौद्धिक आणि भावनिक संपर्काला नवा आयाम दिला आहे.

मित्रांनो,

संपर्क व्यवस्था कोणत्याही स्वरूपात असू शकते, त्याचा उद्देश देशाला जोडणे, 140 कोटी देशवासियांना जोडणे हा आहे. ऑल इंडिया रेडिओसारख्या सर्व संवाद वाहिन्यांचे हेच ध्येय असले पाहिजे. मला खात्री आहे की, तुम्ही याच दूरदृष्टीने पुढे जात राहाल, तुमचा हा विस्तार संवादातून देशाला नवे बळ देत राहील. पुन्हा एकदा, मी ऑल इंडिया रेडिओ आणि देशाच्या दूरवरच्या भागातील माझ्या प्रिय बंधू-भगिनींना माझ्या शुभेच्छा देतो,

खूप खूप अभिनंदन.

धन्यवाद !

 

*****

Ankush C/ V.Ghode/R.Aghor/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920706) Visitor Counter : 192