संरक्षण मंत्रालय

दहशतवादाचा एकत्रितपणे समूळ नायनाट करण्याची आणि दहशतवादाला पाठबळ देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज ,नवी दिल्लीत आयोजित एससीओ देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त


संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमधील तरतुदींवर आधारित शांतता आणि सुरक्षा राखण्यात भारताचा विश्वास : राजनाथ सिंह

'सुरक्षित, स्थैर्य असलेला समृद्ध प्रदेश प्रत्येक देशाच्या लोकांचे जीवनमान सुधारेल'

सामायिक संरक्षण हितांसाठी एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण क्षमता बांधणीसाठी वचनबद्ध : संरक्षण मंत्री

Posted On: 28 APR 2023 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2023

 

सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समूळ  नायनाट करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे  आणि दहशतवादी कारवायांना  मदत किंवा निधी देणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांना  केले आहे. नवी दिल्लीत 28 एप्रिल 2023 रोजी आयोजित एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य किंवा त्याला कोणत्याही स्वरूपात पाठिंबा देणे हा मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा आहे आणि या  धोक्यासह  शांतता आणि समृद्धी एकत्र नांदू  शकत नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.

“एखाद्या राष्ट्राने दहशतवाद्यांना आश्रय दिला तर ते केवळ इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही धोक्याचे ठरते.तरुणांमधला कट्टरतावाद हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेचे कारण तर आहेच त्याचबरोबर समाजाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे.जर आपल्याला  शांघाय सहकार्य संघटना  एक बळकट आणि अधिक विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय संघटना बनवायची असेल, तर   दहशतवादावर प्रभावीपणे मात करणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य हे असले पाहिजे.”, असे संरक्षण मंत्र्यानी सांगितले.

भारताने प्रादेशिक सहकार्याची एक ठोस रूपरेषा मांडली असून ती  सर्व सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा परस्पर आदर करून त्यांच्या न्याय्य हितसंबंधांवर भर देणारी  आहे,असे राजनाथ सिंह यांनी सांगितले . संयुक्त राष्ट्रांच्या सनदीमधील  तरतुदींवर आधारित शांतता आणि सुरक्षितता राखण्यावर विश्वास ठेवत असल्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये  विश्वास आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी  केले.  सुरक्षित, स्थैर्य असलेला समृद्ध प्रदेश प्रत्येक देशाच्या लोकांचे जीवनमान सुधारेल, असे ते म्हणाले.

2018 मध्ये चीनमधील किंगडाओ येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'SECURE 'म्हणजेच 'सुरक्षित'  संकल्पने  बद्दलही राजनाथ सिंह यांनी यावेळी विस्ताराने सांगितले. ‘SECURE’ या शब्दाचे  प्रत्येक अक्षर या प्रदेशाच्या बहुमितीय  कल्याणासाठी भारताची वचनबद्धता दर्शवते, असे ते म्हणाले. 

एस - नागरिकांची सुरक्षा

- सर्वांसाठी आर्थिक विकास

सी  - प्रदेशांना परस्परांशी जोडणे

यु – लोकांमधला एकोपा

आर  - सार्वभौमत्व आणि अखंडतेचा आदर

 - पर्यावरण संरक्षण

आज जगाचा मोठा भाग अन्न संकटातून जात आहे, याकडे संरक्षण मंत्र्यांनी 'SECURE ' म्हणजेच 'सुरक्षित'  च्या विविध पैलूंकडे सदस्य देशांचे लक्ष वेधले. एससीओ  सदस्य देशांना एकात्मिक योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षण आणि सह-उत्पादन तसेच  वस्तूंच्या सह-निर्मितीच्या  माध्यमातून एससीओ  सदस्य देशांच्या संरक्षण क्षमता बांधणीची भारताची वचनबद्धता संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली.सुरक्षेची आव्हाने कोणा एका देशापुरती मर्यादित नसल्यामुळे, सामायिक हित लक्षात घेऊन भारत संरक्षण सहकार्याच्या  क्षेत्रात सहयोगात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. .

त्यापूर्वी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला संरक्षण मंत्र्यानी,  एससीओ  एक विकसित आणि बळकट  प्रादेशिक संघटना असल्याचे सांगितले आणि भारत  या संघटनेला  सदस्य राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची संस्था मानतो हे अधोरेखित केले

चर्चेच्या शेवटी, सर्व एससीओ  सदस्य देशांनी या प्रदेशाला सुरक्षित, शांततामय  आणि समृद्ध बनवण्याची त्यांची सामूहिक इच्छा व्यक्त करत  मसुदा पत्रावर स्वाक्षरी केली. समकालीन आव्हानांना सामोरे जाताना प्रदेशात समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी आपल्या  भाषणाचा समारोप करताना केले. एससीओला बदलत्या काळानुरुप  निरंतर बळकट आणि अधिक जोमदार  आणि लवचिक संघटना बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

दहशतवादावर मात करण्यासह विविध देशांमधील असुरक्षित लोकसंख्येची सुरक्षा तसंच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये  सहकार्य करण्यावर सर्व सदस्य राष्ट्रांनी सहमती दर्शवली, असे संरक्षण सचिव   गिरीधर अरमाने यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920540) Visitor Counter : 129