माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेतून जातिवाद आणि तुष्टीकरण संपुष्टात आणले : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा


मन की बात हा एक PERFECT म्हणजे शांतता, सक्षमीकरण, चिंतनशील , उत्सव, आर्थिक विकास, काळजी आणि विवेकी संवाद आहे

मन की बात हे कोणताही राजकीय रंग नसलेले आणि समाजातील सुप्त प्रतिभेची जोपासना करण्याचे व्यासपीठ आहे : अमित शहा

सुशासनासाठी संवाद आवश्यक, मन की बात हे संवादाचे अचूक तंत्र : अश्विनी वैष्णव

'मन की बात'च्या 100 भागांच्या निमित्ताने टपाल तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन

Posted On: 26 APR 2023 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे मन की बात @100 या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप  सत्राला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ प्रसारणाचा देशावर होणारा परिणाम या विषयावर दिवसभर चर्चा  झाली.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, मन की बात हा एक अनोखा प्रयोग आहे ज्याने आपल्या लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. या कार्यक्रमाने युवक आणि आकाशवाणी यांच्यात एक बंधही  निर्माण केला आहे. नागरिक आणि सरकार यांच्यातील संवाद हा लोकशाहीच्या प्रमुख उपायांपैकी एक आहे आणि लोकशाहीची ताकद या संवादाची मजबूती आणि परिणामकारकता यावरून ठरते. मन की बातमधील या संवादाच्या 99 भागांनी देशाच्या सर्जनशील कौशल्याला आणि नैतिकतेला  एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

भारतीय शासनव्यवस्थेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान नमूद करताना  ते म्हणाले की,  पंतप्रधानांनी सर्वप्रथम भारतीय लोकशाही व्यवस्थेतून जातिवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण संपुष्टात आणले.  या राजकारणाने सामान्य मताधिकाराची अभिव्यक्ती भ्रष्ट केली होती. आता भारतीय राजकारण राजकीय क्रियाशीलतेच्या व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. त्यातही ही  कामगिरी पार पाडणारे  जनतेची सेवा करण्यास खरोखरच पात्र आहेत.

आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे  पद्म पुरस्कारांचे लोकशाहीकरण, जे दीर्घकाळ शिफारशींच्या व्यवस्थेच्या ताब्यात होते. आता कोणताही सामान्य नागरिक ज्याने देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे  त्याला हा पुरस्कार मिळू शकतो, असे ते म्हणाले.,

'मन की बात'ने लहान-सहान सामाजिक प्रयोग करणार्‍या लोकांना, त्यांच्या  क्षमतेत समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. इतर प्रसिद्ध जागतिक नेत्यांच्या अशाच प्रकारच्या संभाषणांना राजकीय रंग दिला जात असताना, मन की बातला जराही  राजकीय रंग नाही.

मन की बातने संपूर्ण भारतात आपले अस्तित्व  पसरवले  आहे आणि लोकांच्या विविध गटांना संबोधित करणारे विविध विषय हाताळले  आहेत, ज्यामुळे देशाच्या विवेकबुद्धीवर मोठा प्रभाव पडला आहे, असे अमित शाह म्हणाले. स्वच्छ भारत, फिट इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जलसंधारण, व्होकल फॉर लोकल , आत्मनिर्भर भारत आणि सुगम्य भारत यांसारख्या जनजागृतीपर  आणि सामाजिक बदलाच्या अनेक कार्यक्रमांच्या यशात या कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे.

मन की बात हे संवादाचे असे  साधन आहे ज्याने देशापुढील आव्हानांवर प्रामाणिक चर्चा घडवून आणली आहे, लोकांना या आव्हानांच्या निराकरणात मुख्य हितधारक बनवले आहे आणि त्यांना  उपाय मिळवून दिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी वापरलेली संवाद पद्धत भावनिक, अध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक क्रियांना चालना देणारी असल्यामुळे चार स्तंभावर  उभारलेली आहे. गृहमंत्र्यांनी याला  PERFECT म्हणजे शांतता, सक्षमीकरण, चिंतनशील , उत्सव, आर्थिक विकास, काळजी आणि विवेकी संवाद असे म्हटले आहे. 

मन की बातने खादीला लोकप्रिय करण्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनात मोलाची भूमिका बजावली आहे. देशात खेळणी बनवण्याचा आणि खेळण्यांच्या उद्योगाला पाठिंबा दिला जात असल्याचा  उल्लेख मन की बातमध्ये केल्यापासून, खेळण्यांची आयात 2018-19 मधील 371 दशलक्ष डॉलर्स वरून 2021-22 मध्ये 110 दशलक्ष डॉलर्सपर्यंत घसरली आणि निर्यात 202 दशलक्ष डॉलर्स वरून 326 दशलक्ष डॉलर्सवर गेली यावरून मन की बातचा प्रभाव किती आहे याचा अंदाज बांधता येतो असे ते म्हणाले.

'मन की बात’ हा मंच समाजातील सुप्त शक्तींना वाव देणारा मंच आहे, लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेणारा हा कार्यक्रम असून, त्याद्वारे देशातील लोकांना भारताच्या बहुआयामी प्रगतीसाठी कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.

देशाच्या राजकीय पटलावर 2014 पासून झालेला बदल, सरकार आणि लोकांना एकमेकांशी जोडणारा आहे, त्यांच्यात समन्वय साधणारा आहे, आधी या दोन घटकांमध्ये संघर्ष होत असे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.  लोकांसाठी काम करणारे सरकार, आणि सरकारवर असलेला लोकांचा विश्वास, असा बदल यामुळे घडला आहे, असे अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले.

उत्तम प्रशासनासाठी संवाद हा महत्वाचा भाग असून  मन की बात अशा संवादाचे प्रभावी माध्यम ठरले आहे, असे वैष्णव म्हणाले. पंतप्रधानांनी मन की बात मुळे, रेडियोला नव्या स्वरूपातील, नव्या अवतारातील संवादाचे माध्यम बनवले आहे. यामुळे, रेडियोचे सामर्थ्य वाढले आसून, या माध्यमाद्वारे, सोशल मीडियाच्या मार्गे, हे प्रसारण पंतप्रधानांचे शब्द सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

31 जानेवारी 2016 पासून सुरू झालेल्या 'मन की बात'चे प्रसारण आधी  हिंदी भाषेतून  त्यानंतर पुढे इंग्रजी आवृत्ती आणि 28 मे 2017 पासून संस्कृत आवृत्तीपर्यंत विस्तारित झाल्याची माहिती,  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी श्रोत्यांना दिली. सध्या, 'मन की बात' 23 भाषांमध्ये आणि 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित होत आहे, असे त्यांनी संगितले.

या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ तिन्ही मान्यवरांच्या हस्ते  'मन की बात' च्या 100 भागांवरील स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाण्यांचे अनावरण झाले.

यावेळी वित्त राज्यमंत्री  पंकज चौधरी आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा हे देखील उपस्थित होते.

 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920071) Visitor Counter : 157