कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मन की बात कार्यक्रमात कृषी क्षेत्राच्या संदर्भात प्रसारित झालेल्या भागांवरील संशोधनपर अभ्यास अहवालाचे अनावरण


शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्यात मन की बात कार्यक्रम महत्त्वाचा ठरला

Posted On: 25 APR 2023 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023

आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सामान्य जनेतेला संबोधित करतात आणि समकालीन विषयांवर त्यांच्याशी संवाद साधतात. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु झाला आणि तेव्हापासून 26 मार्च 2023 पर्यंत या कार्यक्रमाचे 99 भाग प्रसारित झाले.या कार्यक्रमाच्या अनेक भागांतून कृषी समुदायाला तसेच इतर भागधारकांना प्रेरित तसेच प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने विद्यमान  कृषीविषयक समस्या मांडण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यक्रमाने दिलेल्या प्रेरणेचा आणि प्रोत्साहनाचा शेती समुदायावर झालेल्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी नवी दिल्ली येथील आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन मंडळ आणि हैदराबाद येथील एमएएनएजीई अर्थात राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था यांनी एक अभ्यास केला. या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष विविध जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यात आले.  या प्रकाशनांचा अनावरण कार्यक्रम डीएआरईचे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे झाला. यावेळी, आयसीएआरसह केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रकाशनांतील महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत

या अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार, नैसर्गिक शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि एकात्मिक शेती पद्धती (वैविध्यपूर्ण शेती) या मन की बात कार्यक्रमात चर्चिल्या गेलेल्या विषयांना लहान शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिले. भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासावरून असे दिसून आले की, मन की बात कार्यक्रमातून देण्यात आलेला संदेश आणि कृषी विज्ञान केंद्रांतील तज्ञांनी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम यांमुळे भरड धान्यांच्या सुधारित जाती तसेच उत्पादन प्रक्रिया यांच्या स्वीकाराविषयीच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनात बदल झाला आणि त्यातून कृषी-उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.

मन की बात कार्यक्रमाच्या अनेक भागांमध्ये ज्यावर भर देण्यात आला अशा ड्रोन आणि मोबाईल सह  डिजिटल तंत्रज्ञानाने  देखील शेतकऱ्यांच्या जागरुकतेवर तसेच कृषी तंत्रज्ञानाच्या स्वीकाराविषयीच्या माहितीवर मोठा परिणाम झाला. मन की बात कार्यक्रमाने कृषी उद्योग करण्यातील सुलभता वाढविण्यासाठी आणि  शेतकऱ्यांच्या लागवड प्रक्रियेतील खर्च (20-25%ने ) कमी करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांबद्दल (एफपीओ), अनुकूल वातावरण निर्माण केले. मधुमक्षिका पालनासंदर्भातील भागावरील अभ्यासावरून असे दिसून आले की, मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर मधुमक्षिका पालकांना संस्थात्मक माहिती तसेच साधने यांच्यापर्यंत  अधिक उत्तम प्रकारे पोहोचता आलेआणि त्यामुळे तांत्रिक समस्या वगळता इतर वेळी  व्यक्तिगत पातळीवरील मधुमक्षिका पालनापेक्षा गटामध्ये काम करण्यातून अधिक उत्पन्न मिळाले. किसान रेल गाड्यांची माहिती देणाऱ्या संदेशामुळे शेतकऱ्यांना या गाड्यांची सेवा वापरण्याची माहिती आणि प्रेरणा मिळाली. किसान रेल्वे गाड्या शेतकऱ्यांना  कोणत्याही मध्यस्थाच्या सहभागाविना त्यांची नाशिवंत कृषी उत्पादने कमी वेळात इष्ट ठिकाणी पोहोचवून अधिक निव्वळ नफा मिळण्याची सुनिश्चिती झाली. म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी आवश्यक  अनुकूल वातावरण तयार करण्यात  मन की बात कार्यक्रमाने मोलाची भूमिका निभावली आहे,असे या अभ्यासात म्हंटले आहे.

 

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919612) Visitor Counter : 145


Read this release in: Urdu , Hindi , English , Punjabi