विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आज सहा दिवसांच्या लंडन दौऱ्यासाठी रवाना, ब्रिटनच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी, तसेच भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद आणि स्टार्ट अप उद्योजक आणि अभ्यासकांशी चर्चा करणार
Posted On:
25 APR 2023 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अंतराळ आणि अणुऊर्जा मंत्रालय, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ सहा दिवसांच्या लंडन दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौऱ्यात डॉ. सिंह, ब्रिटन सरकारमधील त्यांच्या समकक्ष मंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच लंडनमधील भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्याशिवाय स्टार्टअप्स उद्योग आणि अभ्यासकांशीही ते चर्चा करतील.
इंग्लंडमध्ये (यु के) ऋषि सुनक यांच्या नेतृत्वाखाली, नवं सरकार नियुक्त झाल्यानंतरचा डॉ. सिंह यांचा हा पहिलाच लंडन दौरा असल्याने, तो विशेष महत्वाचा ठरणार आहे.

या दौऱ्यात, डॉ. सिंह इंग्लंडचे विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष मंत्री, जॉर्ज विल्यम फ्रीमन, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण आशिया आणि संयुक्त राष्ट्र, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस अशा भागांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लॉर्ड अहमद यांची भेट घेतील. तसेच, उद्योजकांच्या बैठकींमध्ये, रोल्स रॉइस उद्योगसमुहाच्या प्रमुखांसह, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उद्योगप्रमुखांची ते भेट घेतील. तसेच इंग्लंडच्या विज्ञान नवोन्मेष परिषदेसोबतही त्यांची एक महत्वाची बैठक होईल.
डॉ जितेंद्र सिंग ऑक्सफर्ड, युनिव्हर्सिटी ऑफ सरी, इम्पीरियल कॉलेज लंडन आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी या शैक्षणिक संस्थांनाही भेट देतील. सॅटेलाइट ऍप्लिकेशन्स कॅटपल्ट, रदरफोर्ड ऍपलटन लॅब्स आणि सायन्स म्युझियम या प्रमुख वैज्ञानिक केंद्रांनाही ते भेट देणार आहेत.
त्याशिवाय, आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यात, डॉ. सिंह लंडनमधील भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील तसेच तिथे राहणाऱ्या, भारतीय विद्यार्थ्यांचीही ते भेट घेतील. त्यावेळी, भारत आणि इंग्लंडच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या तयार केलेले संशोधन प्रकल्पही ते बघतील.
तसेच डॉ. सिंह इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधतील. यात विज्ञानविषयक वार्तांकन करणारे पत्रकार तसेच, इतर भारतीय प्रसारमाध्यमंच्या इंग्लंडमधील प्रतिनिधी पत्रकारांचाही समावेश असेल.
इंग्लंड सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार, डेम अँजेला मॅक्लीन आणि FDCO मुख्य शास्त्रज्ञ, शार्लोट वॉट्स यांच्यासोबतही डॉ. सिंह यांची चर्चा होणार आहे.
28 एप्रिल रोजी, डॉ. जितेंद्र सिंह, भारत सरकार तर्फे, इंग्लंडचे सर्वोच्च नेते आणि शिक्षणतज्ज्ञ, रॉयल सोसायटी फेलो, उद्योजक आणि बुद्धिजीवी यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करतील.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919547)