पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणीपूरमध्ये इंफाळ येथे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या चिंतन शिबिरामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 24 APR 2023 10:44AM by PIB Mumbai

कार्यक्रमात सहभागी होत असलेले केंद्रीय मंत्रिमडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूरजी, सर्व राज्यांचे युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरषहो,

देशाच्या क्रीडामंत्र्यांची ही परिषद, हे चिंतन शिबिर मणीपूरच्या भूमीवर होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. ईशान्येमधून उदयाला आलेल्या कित्येक खेळाडूंनी तिरंग्याचा मान वाढवला आहे, देशासाठी पदके जिंकली आहेत. देशाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यामध्ये ईशान्य भागाचे आणि मणीपूरचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. येथील सगोल कांगजई, थांग-ता, युबी लाक्पी, मुक्ना आणि हियांग तान्नबा सारखे स्वदेशी खेळ, जे स्वतःच खूपच आकर्षक आहेत. म्हणजे जेव्हा आपण मणीपूरचा ऊ-लावबी पाहतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये कबड्डीची झलक दिसते. येथील हियांग तान्नबा केरळच्या बोट रेसची आठवण करून देतो आणि पोलो या खेळाशी देखील मणीपूरचा ऐतिहासिक संबंध राहिला आहे. म्हणजेच, ज्या प्रकारे ईशान्य भाग देशाच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये नवे रंग भरत असतो, त्याच प्रकारे देशाच्या क्रीडा विविधतेला देखील नवे आयाम देत आहे.  देशभरातून आलेले क्रीडामंत्री मणीपूरकडून बरेच काही शिकून जातील अशी मला अपेक्षा आहे आणि मणीपूरच्या लोकांचे प्रेम, त्यांचा पाहुणचार, तुमच्या प्रवासाला आणखी आनंददायी बनवेल, अशी मला खात्री आहे. मी या चिंतन शिबिरात सहभागी होत असलेल्या सर्व क्रीडामंत्र्यांचे, इतर मान्यवरांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो.

मित्रहो,

कोणतेही चिंतन शिबिर, चिंतनाने सुरू होते, मननासह पुढे जाते आणि क्रियान्वयनावर पूर्ण होते. म्हणजेच, first comes reflection, then realisation and then implementation and action. म्हणूनच, या चिंतन शिबिरात तुम्हाला भविष्यातील उद्दिष्टांवर विचारविनिमय करायचा आहेच, त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या परिषदेचा आढावा देखील घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेलच यापूर्वी आपण जेव्हा 2022 मध्ये केवडिया येथे भेटलो होतो, त्यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली होती. भविष्याला विचारात घेऊन एक आराखडा तयार करण्याबाबत आणि खेळांच्या कल्याणासाठी एक पोषक व्यवस्था निर्माण करण्याबाबत सहमती व्यक्त केली होती. क्रीडा क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्यांदरम्यान सहभाग वाढवण्याबाबत बोललो होतो. आता इंफाळ मध्ये तुम्ही सर्व नक्कीच या गोष्टीचा आढावा घ्या की या दिशेने आपण किती प्रगती केली आहे. आणि मी तुम्हाला हे सांगेन की हा आढावा केवळ धोरण आणि कार्यक्रमांच्या पातळीवरच होता कामा नये. तर हा आढावा पायाभूत सुविधा विकासावर असला पाहिजे, गेल्या एका वर्षातील क्रीडाविषयक कामगिरीसंदर्भात देखील असला पाहिजे.

मित्रहो,

ही गोष्ट खरी आहे की गेल्या एका वर्षात भारतीय ऍथलीट्स आणि खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. आपल्याला या कामगिरींचा आनंद साजरा करतानाच याचा देखील विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या खेळाडूंची जास्तीत जास्त मदत कशा प्रकारे करता येऊ शकते. येणाऱ्या काळात, स्क्वाश विश्व चषक, हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियायी युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा, अशा स्पर्धांच्या आयोजनामध्ये तुमची मंत्रालये आणि तुमच्या विभागाच्या तयारीचा कस लागणार आहे. ठीक आहे, खेळाडू आपली तयार करत आहेत, पण आता क्रीडा स्पर्धांबाबत आपल्या मंत्रालयांना देखील वेगळा दृष्टीकोन ठेवून काम करावे लागणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे फूटबॉल आणि हॉकी सारख्या खेळांमध्ये man to man marking करण्यात येते, त्या प्रकारे तुम्ही सर्वांनी देखील  Match to Match मार्किंग केली पाहिजे. प्रत्येक स्पर्धेसाठी वेगळी रणनीती बनवली पाहिजे. तुम्ही प्रत्येक स्पर्धेच्या हिशोबाने क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही short term, medium term आणि long term goals देखील निर्धारित केले पाहिजेत.

मित्रहो,

खेळांचे आणखी एक वैशिष्ट्य असते. एकट्याने कोणताही खेळाडू सतत सराव करून तंदुरुस्ती तर प्राप्त करू शकतो, पण चांगल्या कामगिरीसाठी सातत्याने त्याने खेळत राहणे देखील गरजेचे आहे. यासाठीच स्थानिक पातळीवर खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा असली पाहिजे, क्रीडा स्पर्धा असल्या पाहिजेत. यामुळे खेळाडूंना बरेच काही शिकायला मिऴेल. क्रीडामंत्री म्हणून तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की कोणतीही क्रीडा गुणवत्ता दुर्लक्षित राहणार नाही.

मित्रहो,

आपल्या देशातील प्रत्येक प्रतिभावंत खेळाडूला दर्जेदार क्रीडा पायाभूत सुविधा देणे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र काम केले पाहिजे. खेलो इंडिया योजनेने जिल्हा स्तरावर क्रीडा पायाभूत सुविधांसंदर्भात नक्कीच काहीतरी चांगले काम केले आहे. पण आता या प्रयत्नांना आपल्याला तालुका स्तरावर घेऊन जायचे आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रासहित सर्व हितधारकांची भागीदारी महत्त्वाची आहे. एक विषय राष्ट्रीय युवा महोत्सवाचा देखील आहे. याला जास्त प्रभावी बनवण्यासाठी नव्याने विचार केला गेला पाहिजे. राज्यांमध्ये जे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, ती केवळ औपचारिकता बनणार नाही, याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. ज्यावेळी चारी बाजूंनी अशा प्रकारचे प्रयत्न  होतील, तेव्हाच भारत क्रीडा क्षेत्रातील एक आघाडीचा देश म्हणून प्रस्थापित होऊ शकेल.

 मित्रहो,

खेळांसंदर्भात आज ईशान्येच्या राज्यांमध्ये जे काम होत आहे ते देखील तुमच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे. क्रीडा पायाभूत सुविधांशी संबंधित 400 कोटीपेक्षा जास्त प्रकल्प आज ईशान्येच्या विकासाला नवी दिशा देत आहेत.

इंफाळचे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आगामी काळात देशभरातील युवा वर्गाला नव्या संधी देईल. ‘खेलो इंडिया योजना’ आणि ‘टॉप्स’ सारख्या प्रयत्नांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. ईशान्येच्या प्रत्येक जिल्हयात कमीत कमी 2 खेलो इंडिया केंद्रे आणि प्रत्येक राज्यात खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. हे प्रयत्न क्रीडा विश्वात एका नव्या भारताचा पाया बनतील, देशाला एक वेगळी ओळख देतील. तुम्हाला आपापल्या राज्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या कामांना गती द्यायची आहे. हे चिंतन शिबिर या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास आहे. याच विश्वासाने तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!

****

 Jaidevi PS/Shailesh P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919396) Visitor Counter : 136