राष्ट्रपती कार्यालय
चौधरी चरणसिंह हरियाणा कृषी विद्यापीठाच्या 25 व्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपतींची सन्माननीय उपस्थिती
Posted On:
24 APR 2023 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 24 एप्रिल 2023 रोजी हरियाणामधील हिसार येथे आयोजित चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाच्या 25 व्या पदवीदान समारंभात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठ स्थापनेपासून, शिक्षण, संशोधन तसेच कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी लक्षणीय योगदान देत आहे. आज हरियाणा राज्य, देशाच्या केंद्रीय धान्य साठवणीत योगदान देणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे त्याचे श्रेय केंद्र तसेच राज्य सरकारांची शेतकरी स्नेही धोरणे, हरियाणा कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाधारित उपक्रम आणि या राज्यातील शेतकऱ्यांची आधुनिक कृषी तंत्रे स्वीकारण्याची इच्छा यांना द्यावे लागेल.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारतात प्रचंड लोकसंख्या असूनही आजघडीला आपला देश अन्नविषयक समस्येला तोंड देणारा देश राहिला नसून धान्य निर्यात करणारा देश झाला आहे. मात्र आज वाढती लोकसंख्या, संकुचित होत गेलेली शेतजमीन, खालावत जाणारी भूजल पातळी, मातीचा घसरत चाललेला कस आणि हवामान बदल अशा अनेक समस्या कृषी क्षेत्रासमोर उभ्या आहेत आणि या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम कृषी व्यावसायिकांना करायचे आहे. आपल्या देशाच्या प्रचंड लोकसंख्येला सकस अन्न पुरवितानाच, पर्यावरण तसेच जैवविविधतेचे कमीतकमी नुकसान होईल असे मार्ग त्यांनी शोधले पाहिजेत. कृषी व्यावसायिकांसमोर असलेले हे आव्हान आहे आणि ही एक संधी देखील आहे असे त्या म्हणाल्या.
शेती पिकवण्याचा खर्च कमी करण्यात, उत्पादकता वाढविण्यात, आणि कृषी क्षेत्राला पर्यावरणस्नेही तसेच अधिक लाभदायक रूप देण्यात तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. पाणी हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, मात्र तो अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे असे सांगून त्या म्हणाल्या की शेतीमध्ये पाण्याचा समंजसपणे वापर होणे महत्त्वाचे आहे. शेतीच्या सिंचनात तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त प्रमाणात वापर झाला पाहिजे, जेणेकरून जलस्त्रोतांचे शोषण कमी प्रमाणात होईल असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, अशा तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा प्रसार यासाठी हरियाणा कृषी विद्यापीठासारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की प्रयोगशाळांतून जसे संपूर्ण समाजामध्ये माहिती आणि लाभ प्रसारित होतात तसेच कार्य विद्यापीठांनी केले पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये पीक उत्पादन तंत्रांचा प्रसार करण्यासाठी हरियाणा कृषी विद्यापीठ जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे हे समजल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रयत्नांचा लाभ देशातील अधिकाधिक लोकांना, विशेषतः हरियाणाच्या जनतेला मिळावा यासाठी या प्रयत्नांची तीव्रता वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की कृषी हे फार व्यापक क्षेत्र आहे. धान्य, फळे आणि दूध उत्पादन, पशुपालन तसेच मत्स्यव्यवसाय यांच्यासह इतर अनेक उद्योग शेतीशी थेट जोडलेले आहेत. भारत हा आता स्टार्ट अप उद्योगांचे केंद्र म्हणून विकसित होतो आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था भारतात आहे. कृषी क्षेत्राकडून अनेक उद्योगांना कच्चा माल पुरविला जातो. म्हणूनच हे क्षेत्र स्टार्ट-अप उद्योगांसाठी अमर्याद संधी निर्माण करते असे त्या म्हणाल्या. हरियाणा कृषी विद्यापीठाने अभिनव संशोधन, तंत्रज्ञान अद्यायावतीकरण आणि कौशल्य विकास यांच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी इन्क्युबेशन केंद्राची स्थापना केली आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थी या सकारात्मक वातावरणाचा लाभ घेतील आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे हिंदी भाषेतील भाषण मिळविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919279)
Visitor Counter : 163