आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने राष्ट्रीय टेलि -मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला: ऑक्टोबर 2022 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून टेली-मानस हेल्पलाइनवर 1 लाखांहून अधिक दूरध्वनी प्राप्त


देशभरात सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत 38 हून अधिक टेली-मानस कक्ष 20 हून अधिक भाषांमध्ये मानसिक आरोग्यविषयक सेवा

1600 हून अधिक प्रशिक्षित समुपदेशकांकडून त्वरित सेवा

Posted On: 24 APR 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

देशभरात सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण  मानसिक आरोग्यविषयक  सेवा पुरविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स आणि नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (टेली-मानस) हेल्पलाइनने ऑक्टोबर 2022 मध्ये प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत  1 लाखांहून  अधिक दूरध्वनी  प्राप्त करून  मैलाचा दगड गाठला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी  ट्विटमधून या कामगिरीबद्दल देशवासियांचे अभिनंदन केले आहे.

10 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनी  राष्ट्रीय टेलि - मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभापासूनच  या सेवेचा उद्देश डिजिटल मानसिक आरोग्य व्यवस्था  निर्माण करणे हा असून  विद्यमान मानसिक आरोग्यविषयक  सेवांना चालना दिली आहे. कोविडदरम्यान डिजिटल मानसिक आरोग्य नेटवर्कची तातडीची गरज भासू लागली होती आणि टेली -मानसचा उद्देश देशाच्या सर्वात  दुर्गम भागात 24X7 मानसिक आरोग्यविषयक  सेवा उपलब्ध करून देणे हा  आहे. या सेवा सर्व व्यक्तींसाठी 14416/1800-89-14416 या टोल-फ्री क्रमांकाद्वारे मोफत उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या देशव्यापी सेवेने 6 महिने यशस्वीरित्या पूर्ण केले असून सध्या 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 38 पेक्षा जास्त टेली - मानस कक्ष कार्यरत  आहेत, जिथे 20 भाषांमधून मानसिक आरोग्यविषयक सेवा पुरवली जाते आणि 1600 हून अधिक प्रशिक्षित समुपदेशक त्वरित सेवा पुरवतात. टेली -मानस वर आतापर्यंत आलेले बहुतेक दूरध्वनी हे खिन्न  मनःस्थिती, तणाव , परीक्षेशी संबंधित चिंता, घरगुती समस्या  आणि शांत झोप न येणे या समस्यांशी  संबंधित होते.

देशातील मानसिक आरोग्य समस्येची दखल घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2022-23 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेला टेली -मानस उपक्रम, लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्य विषयक समस्यांसाठी मदत घेण्यास  सक्षम करणारा  एक अभिनव उपक्रम आहे. यामध्ये दूरध्वनी करणाऱ्यांच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली जाते आणि त्यातून  मानसिक आरोग्याच्या समस्यांशी निगडित कलंक कमी होतो.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919256) Visitor Counter : 186