श्रम आणि रोजगार मंत्रालय

ई श्रम पोर्टलची उपयुक्तता वाढवण्यासाठी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करणे सुलभ व्हावे या उद्देशाने या पोर्टलमधील काही नवीन वैशिष्ट्यांचे भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 24 APR 2023 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023

केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रीभूपेंद्र यादव यांच्या हस्ते आज ई श्रम पोर्टलमधील काही नवीन वैशिष्ट्यांचे  अनावरण झाले. यावेळी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव, आरती आहुजा, आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 (श्रम आणि रोजगार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ई श्रम पोर्टलमधील नवीन वैशिष्ट्यांचा शुभारंभ)

ई श्रम पोर्टलमधील नवीन वैशिष्ट्यांमुळे या पोर्टलची उपयुक्तता वाढेल आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करणे सुलभ होईल. नोंदणीकृत कामगारांना आता रोजगाराच्या संधी, कौशल्यवृद्धी, शिकाऊ उमेदवारी, निवृत्ती वेतन योजना, डिजिटल कौशल्य आणि राज्यांच्या योजनांचा लाभ ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून घेता येईल.

स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबाच्या माहितीची नोंद करण्याचे वैशिष्ट्य ई श्रम पोर्टल मध्ये नव्याने घालण्यात आले आहे. या वैशिष्ट्यामुळे कुटुंबासह स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या मुलांना शिक्षण देणे आणि महिलांसाठी तयार केलेल्या योजनांचे लाभ त्यांच्या कुटुंबातील महिलांना देणे शक्य होणार आहे. याशिवाय ई श्रम पोर्टल वरील बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत मजुरांची माहिती संबंधित इमारत आणि इतर बांधकाम कामगार (BOCW) कल्याण मंडळासोबत सामायिक करण्याचे वैशिष्ट्य देखील घालण्यात आले आहे. यामुळे ई श्रम पोर्टल वरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांची नोंदणी त्यांच्या संबंधित इमारत आणि इतर बांधकाम कामगार (BOCW) कल्याण मंडळासोबत सामायिक केली आहे की नाही याची खातरजमा करता येऊ शकेल आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांचे लाभ त्यांना मिळू शकतील.

ई श्रम पोर्टल वरील माहिती राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांसह सामायिक करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या डेटा शेअरिंग पोर्टल (DSP) चे अनावरण देखील केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. असंघटित क्षेत्रातील ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत कामगारांसाठी आखलेल्या सामाजिक सुरक्षा / कल्याणकारी योजनांचे लाभ  त्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी डेटा शेअरिंग पोर्टल द्वारे  ई श्रम लाभार्थ्यांची माहिती अत्यंत सुरक्षित रीत्या संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसह सामायिक केली जाईल. या योजनांचा लाभ न मिळालेल्या ई श्रम नोंदणीकर्त्यांना ओळखण्यासाठी विविध योजनांच्या माहितीची पडताळणी ई श्रम वरील माहितीशी करण्याचे कार्य मंत्रालयाने अलीकडेच सुरु केले आहे. ही माहिती (डेटा) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी देखील सामायिक केली  जात आहे ज्या आधारे, ज्या असंघटित कामगारांना अद्याप सामाजिक कल्याण/सुरक्षा योजनांचा लाभ मिळालेला नाही, अशा कामगारांना राज्ये/केंद्रशासित प्रदेश  ओळखू शकतील आणि त्यांना योजनांचा लाभ  प्राधान्याने देऊ शकतील.

देशातील कामगारांच्या हितासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालय अविरत कार्य करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशात असंघटित कामगारांचा एक व्यापक राष्ट्रीय डेटाबेस  तयार करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी  ई श्रम पोर्टल सुरु केले, जे आधारशी जोडलेले आहे. 21 एप्रिल 2023 पर्यंत, 28.87 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ईश्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे.

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919177) Visitor Counter : 167