रसायन आणि खते मंत्रालय
जी-20 समूहातील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीसोबतच ऑगस्ट 2023 मध्ये इंडिया मेडटेक एक्स्पो,2023 या भारतीय वैद्यकीय उपकरणे क्षेत्रावर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन
औषध निर्माण विभाग आणि उद्योजक संघटना यांच्यातर्फे गुजरातमध्ये गांधीनगर येथे या उदयोन्मुख क्षेत्रावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसांच्या प्रदर्शनाचे आयोजन
Posted On:
24 APR 2023 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
जी-20 समूहाच्या भारताच्या अध्यक्षीय कार्यकाळात, भारतीय वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्राच्या क्षमतांवर अधिक प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने,केंद्र सरकारने प्रथमच भारतीय वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्राच्या सहकार्याने गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयएमटीई-23 या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. भारतीय वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योगांच्या क्षमतांचे प्रदर्शन करणे तसेच या क्षेत्राचा भारतातील विकास आणि जागतिक पातळीवरील योगदानाच्या शक्यता यांचा शोध घेऊन नेटवर्कच्या संधी निर्माण करणे हा ऑगस्ट 2023 मध्ये गांधीनगर येथे होणार असलेल्या जी-20 समूहातील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीच्या काळात होणाऱ्या या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
केंद्रीय औषधनिर्मिती विभागाने पहिल्यांदाच गुजरातमधील गांधीनगर येथे असलेल्या प्रदर्शन केंद्रामध्ये 18 ते 20 ऑगस्ट 2023 या तीन दिवसांच्या काळात वैद्यकीय उपकरणांवर आधारित राष्ट्रीय पातळीवरील या मोठ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.गांधीनगर येथे 17 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत जी-20 समूहातील आरोग्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.
याआधी, जानेवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मेडटेक एक्स्पो या प्रदर्शनाला वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित उद्योगांकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता आणि जी-20 समूहातील आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीसोबत ऑगस्ट 2023 मध्ये अशाच प्रकारच्या प्रदर्शनाच्या आयोजन केल्यामुळे या उदयोन्मुख क्षेत्राला आवश्यक असलेले प्रोत्साहन मिळू शकेल अशा विचाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय औषधनिर्मिती विभाग देखील, उत्पादनाशी संलग्न मदत अनुदान योजना, वैद्यकीय उपकरणांचे पार्क उभारणे इत्यादी विविध उपक्रमांच्या माध्यमातून याला हातभार लावत आहे. आरोग्य सुविधा क्षेत्राशी संबंधित बाजारातील सर्व क्षेत्रांपैकी वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्योग सर्वोच्च स्थानी आहे आणि सध्या, रुग्णाला उपयोगी ठरणाऱ्या विविध वस्तूंपासून ते रोपणयोग्य वैद्यकीय उपकरणांपर्यंत विविध प्रकारच्या साधनांची भारतात निर्मिती होत आहे. उत्पादनाशी संलग्न मदत अनुदान योजनेच्या पाठिंब्यामुळे, सी टी स्कॅन, एमआरआय, एलआयएनएसी इत्यादींसारख्या अत्यंत महागड्या वैद्यकीय साधनांची निर्मिती भारतात होऊ लागली आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात गांधीनगर येथे होत असलेल्या या प्रदर्शनात सुमारे दीडशेहून अधिक स्टार्ट-अप्स, 275 हून अधिक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय उपकरणे निर्मिती कंपन्या, सुमारे 50 संशोधन संस्था सहभागी होणार आहेत. थेट व्यापारी सहभागासाठी सुमारे दोनशे परदेशी खरेदीदारांना या प्रदर्शनात आमंत्रित करण्यात येणार आहे.
सध्या भारतातील वैद्यकीय उपकरणे निर्मिती व्यवसायाची उलाढाल सुमारे 11 अब्ज अमेरिकी डॉलर्सची आहे असा अंदाज आहे. गेल्या दशकात, 10-12% हून अधिक सीएजीआर सह भारतात या क्षेत्राचा विकास होत असून 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. प्रस्तावित प्रदर्शन, भारतीय वैद्यकीय उपकरणे निर्मिती परिसंस्थेला जगासमोर सादर करेल आणि भारतीय वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्राची ब्रँड म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919174)
Visitor Counter : 175