गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य-देशांच्या आपत्कालीन परिस्थिती प्रतिबंध आणि निर्मूलनाशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत शांघाय सहकार्य संघटनेमध्ये सक्रियपणे सहभागी होत असून संघटनेतील विविध यंत्रणांना पाठिंबा देत आहे

2017 मध्ये पूर्ण सदस्य राष्ट्र म्हणून मान्यता मिळाल्यापासून, भारताने संघटनेत सक्रिय सहभाग कायम राखला आहे आणि एससीओ सदस्य देश, निरीक्षक आणि संवाद भागीदार यांच्या परस्पर हितासाठी प्रस्ताव हाती घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे

समरकंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या 2022 एससीओ शिखर परिषदेत भारताने एससीओचे अध्यक्षपद स्वीकारले आणि या वर्षी सदस्य देशांच्या प्रमुखांच्या पुढील शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल

अमित शाह उद्या, एससीओ बैठकीच्या निमित्ताने काही एससीओ सदस्य देशांच्या मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत



Posted On: 19 APR 2023 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्ली येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या  सदस्य-देशांच्या   आपत्कालीन  परिस्थिती प्रतिबंध आणि निर्मूलनाशी संबंधित  विभाग प्रमुखांची बैठक होणार आहे.  एससीओ  बैठकीच्या निमित्ताने अमित शाह उद्या, काही एससीओ सदस्य देशांच्या मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एससीओ  मध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे आणि मंचातील विविध यंत्रणांना लक्षणीय पाठिंबा देत आहे. 2017 मध्ये पूर्ण सदस्य राष्ट्र म्हणून मान्यता  मिळाल्यापासून, भारताने संघटनेत  सक्रिय सहभाग कायम राखला  आहे आणि एससीओ सदस्य देश, निरीक्षक आणि संवाद भागीदार यांच्या परस्पर हितासाठी  प्रस्ताव हाती घेण्यावर  लक्ष केंद्रित करत  आहे.

आपत्कालीन परिस्थितीच्या प्रतिबंध आणि निर्मूलनासाठी एससीओ  सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीदरम्यान एससीओ  सदस्य देशांचे प्रतिनिधी त्यांच्या संबंधित प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती आणि ती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांशी संबंधित माहिती सामायिक करतील.

एससीओच्या  चौकटीत आपत्कालीन परिस्थितीला प्रतिबंध आणि निर्मूलनाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अभिनव  पद्धती, तंत्रज्ञान आणि भविष्यातील शक्यता याबाबत   मत देखील प्रतिनिधी सामायिक करतील. या चर्चांच्या आधारे, सदस्य देश एससीओच्या  चौकटीत  राहून सज्जता , आपत्कालीन प्रतिसाद आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे परिणाम संयुक्तरित्या कमी करण्यासाठी सहकार्य वृद्धिंगत करतील.

2023-2025 मधील आपत्कालीन  परिस्थितीच्या निर्मूलनासाठी सहकार्य पुरवण्यासाठी एससीओ  सदस्य देशांमधील कराराच्या अंमलबजावणीसाठीच्या  कृती आराखड्यावरही  प्रतिनिधी चर्चा करतील आणि तो मंजूर करतील.  एससीओ सदस्य-देशांमधील आपत्कालीन परिस्थितींना प्रतिबंध आणि निर्मूलनासाठी सहकार्य वाढवण्यात कृती आराखडा योगदान देईल.

समरकंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या 2022 एससीओ शिखर परिषदेत भारताने एससीओचे  फिरते अध्यक्षपद स्वीकारले. विद्यमान  अध्यक्ष या नात्याने, भारत या वर्षी सदस्य देशांच्या प्रमुखांच्या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918036) Visitor Counter : 167