विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आज सुरु करण्यात आलेले “युवा पोर्टल” आपल्याला संभाव्य युवा स्टार्ट अप उद्योगांना जोडण्यात आणि ओळखण्यात सहाय्यक ठरेल- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 17 APR 2023 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023

पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज संभाव्य युवा स्टार्ट अप उद्योगांना जोडण्यात आणि ओळखण्यात सहाय्यक ठरणाऱ्या युवा पोर्टलची सुरुवात केली.

एनपीएलच्या एक सप्ताह-एक प्रयोगशाळा या कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे उद्घाटन करताना डॉ.जितेंद्र सिंह यांनी, भागधारकांचा सहभाग व्यापक असला पाहिजे ही बाब अधोरेखित केली. विशेषतः उद्योग क्षेत्राचा व्यापक सहभाग नसेल तर स्टार्ट अप उद्योग योग्य उद्योगविषयक मार्गदर्शन आणि योग्य कौशल्य यांच्या आधाराशिवाय टिकू शकणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी 6 जानेवारी 2023 रोजी एक सप्ताह-एक प्रयोगशाळा हा उपक्रम सुरु केला आहे.भारताची तंत्रज्ञानविषयक जागतिक दर्जाची उत्कृष्टता , नवोन्मेष आणि स्टार्ट अप्स यांच्यावर भर देत केंद्रीय मंत्री म्हणाले की देशभरातील 37 सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ)प्रयोगशाळा वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी समर्पित आहेत आणि एक सप्ताह-एक प्रयोगशाळा हा उपक्रम त्यांच्यापैकी प्रत्येक प्रयोगशाळेला त्यांनी केलेले कार्य सादर करण्याची संधी देईल आणि यातून इतरांना त्याचा फायदा मिळवता येईल तसेच भागधारकांना त्याविषयी माहिती मिळेल.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की आजच्या कार्यक्रमामुळे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या (सीएसआयआर)सर्व प्रयोगशाळांना केवळ त्यांचे तंत्रज्ञान सादर करण्यासाठीच नव्हे तर युवा संशोधक, विद्यार्थी, स्टार्ट अप, शिक्षण क्षेत्रातील मंडळी तसेच उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना सखोल तंत्रज्ञान विषयक उपक्रमांच्या माध्यमातून संधी शोधण्यासाठी प्रेरणा मिळेल.

सीएसआयआर-एनपीएलचे संचालक प्रा.वेणुगोपाल अचंता म्हणाले, सीएसआयआर-एनपीएल 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत एक सप्ताह-एक प्रयोगशाळा उपक्रम आयोजित करत आहे.एनपीएल येथे उपलब्ध तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याविषयी संभाव्य भागधारकांमध्ये जाणीव निर्माण करणे, सामाजिक समस्यांवर उपाय सुचविणे, अचूक मोजमापाच्या महत्त्वाविषयी सर्वसामान्य जनतेला जागृत करणे आणि जनसामान्यांमध्ये विशेषतः या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती विकसित करणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत.

दिनांक 18 ते 20 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत स्टार्ट अप उद्योग/ एमएसएमई /उद्योग क्षेत्र यांच्यात भेटीगाठी, चर्चा होतील. एनपीएलकडून उद्योगांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचे प्रदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात, एनपीएलने  ज्यांना मदत केली, जोडून घेतले, तंत्रज्ञानविषयक पाठींबा दिला सल्ला किंवा सेवा दिली अशा सर्व भागधारकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या प्रत्येक दिवशी 20 हून अधिक उद्योग सहभागी होणार असून ते त्यांची तंत्रज्ञाने किंवा सेवा (जेथे एनपीएलने योगदान दिले आहे तिथे)सादर करतील. इतकेच नव्हे तर ते एनपीएलकडून मिळालेल्या शास्त्रीय आणि तंत्रज्ञान विषयक मदतीबद्दल देखील माहिती देतील. देशातील नवोन्मेष आराखडा आणि परिसंस्था यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात येईल. 4 नव्या उद्योग भागीदारांशी तंत्रज्ञान हस्तांतरण आणि विकसन यांच्याशी संबंधित सामंजस्य करार देखील करण्यात येणार आहेत.

सीएसआयअर-एनपीएल आणि त्यांचा एक सप्ताह-एक प्रयोगशाळा हा कार्यक्रम यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया एनपीएलच्या https://www.nplindia.org/. या संकेतस्थळाला भेट द्या.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक व्यक्तींना संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.   

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1917467) Visitor Counter : 168