संरक्षण मंत्रालय
सैन्यात अग्निवीर आणि इतर श्रेणीतील भर्ती साठीच्या ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेला सुरुवात
Posted On:
17 APR 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
भारतीय सैन्यदलाने अग्निवीर, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर श्रेणींसाठी भर्ती प्रक्रियेत संगणक आधारित ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा सुरू करून परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. पात्र नोंदणीकृत उमेदवारांची ऑनलाईन सी ई ई परीक्षा देशभरातील 176 ठिकाणी 375 परीक्षा केंद्रांवर आजपासून सुरु झाली असून ती 26 एप्रिल 2023 पर्यंत चालेल.
ही ऑनलाईन परीक्षा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एज्युकेशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या मिनी रत्न कंपनीच्या सहयोगाने घेतली जात आहे.
देशातील युवकांच्या तांत्रिक ज्ञानात लक्षणीय प्रगती झाली असून नेटवर्कच्या अत्यंत सुधारलेल्या संपर्क जाळ्यामुळे आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे, देशातील युवक आता लांब अंतराचा प्रवास करून प्रत्यक्ष स्वरूपात परीक्षा देण्याऐवजी ऑनलाईन परीक्षा देण्याच्या दृष्टीने सक्षम झाला आहे. परीक्षा पद्धतीमधील या बदलामुळे निवड प्रक्रियेत आकलनविषयक दृष्टिकोनावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता रोखली जाईल. याशिवाय देशभरात व्यापक प्रमाणात परीक्षा घेता येतील आणि भर्ती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या मेळ्यात होणारी गर्दी टाळता येईल, त्यामुळे ही परीक्षा घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सुलभ होईल.
नवीन भरती प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात, www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि आवेदन केलेले उमेदवार ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेला बसतील. दुसऱ्या टप्प्यात, निवड झालेल्या उमेदवारांना जून 2023 पासून भर्ती मेळाव्यासाठी संबंधित सैन्य भरती कार्यालयाने ठरवलेल्या ठिकाणी भर्ती रॅलीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावले जाईल. या टप्प्यात, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.त्यानंतर यशस्वी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
सुधारित भर्ती प्रणालीमुळे भर्ती प्रक्रिया अधिक सुटसुटीत , पारदर्शक होईल आणि तिची रचना माहिती तंत्रज्ञानातील देशात उपलब्ध असलेल्या अद्ययावत पायाभूत सुविधांचा लाभ उत्तम प्रकारे करून घेण्याच्या दृष्टीने केलेली असेल.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917442)
Visitor Counter : 233