कृषी मंत्रालय
वाराणसी येथे उद्यापासून तीन दिवसीय G20 MACS बैठक सुरू होणार
जनरल (निवृत्त) व्ही. के सिंग उद्घाटन सत्राला करणार संबोधित
Posted On:
16 APR 2023 5:55PM by PIB Mumbai
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (DARE) द्वारे वाराणसी येथे 17-19 एप्रिल 2023 दरम्यान कृषीक्षेत्रातील आघाडीच्या शास्त्रज्ञांची जी - 20 बैठक (MACS) आयोजित केली जात आहे. या तीन दिवसीय बैठकीत जी- 20 सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 80 विदेशी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयासह कृषी मंत्रालय आणि इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अन्न सुरक्षा आणि पोषण, हवामान स्मार्ट शेती, डिजिटल शेती, सार्वजनिक खाजगी भागीदारी इत्यादी विषयांसह कृषी संशोधन आणि विकासाच्या विविध मुद्द्यांचा चर्चेसाठी समावेश करण्यात आला आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-20 चा एक उपक्रम असलेल्या “भरड धान्य आणि इतर प्राचीन धान्य आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रम" (MAHARISHI) यावर देखील चर्चा होणे प्रस्तावित आहे.
'निरोगी लोक आणि वसुंधरेसाठी शाश्वत शेती आणि अन्न प्रणाली' ही एमएसीएस 2023 ची मुख्य संकल्पना आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या तांत्रिक सत्रांमध्ये अनेक तज्ञ अन्न सुरक्षा आणि पोषण, विपरीत परिस्थितीत टिकू शकेल अशी कृषी खाद्य प्रणाली, डिजिटल शेती, शाश्वत कृषी-अन्न मूल्य साखळी, कृषी संशोधन, विकासासाठी सार्वजनिक - खाजगी क्षेत्रांचा सहभाग या उप विषयांवर सादरीकरण करतील. त्यासोबतच या मुद्यांवर सहभागी प्रतिनिधी चर्चा देखील करतील. "भरड धान्य आणि इतर प्राचीन धान्य आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रम" (MAHARISHI) या विषयावर एक समर्पित सत्र नियोजित आहे. या सत्रात तज्ञांचे सादरीकरण आणि सर्व जी 20 सदस्य देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या उपायात्मक सूचनांचा समावेश आहे.
जी 20 च्या भारतीय अध्यक्षतेखालील काळाची मुख्य संकल्पना 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' आहे. ही संकल्पना जगासाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्यामधील एकता आणि सामंजस्याची भावना साजरी करते.
गंगा आरतीचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी या प्रतिनिधींना 17 एप्रिल 2023 रोजी क्रूझ राईडवर नेण्यात येणार आहे. 18 एप्रिल 2023 रोजी या प्रतिनिधींना सारनाथची सहल घडवण्यात येणार आहे. सारनाथ येथे हे प्रतिनिधी, गाईडच्या सोबत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संग्रहालयाला आणि बुद्ध स्तुपाला भेट देतील तसेच प्रकाश आणि ध्वनी आयोजनाचे साक्षीदार होतील. त्यानंतर, बुद्ध थीम पार्कच्या शांत परिसरात प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाही मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे प्रतिनिधी 19 एप्रिल 2023 रोजी ट्रेड फॅसिलिटेशन सेंटरला भेट देतील आणि शहराच्या कापडाच्या इतिहासाची झलक अनुभवतील तसेच उत्पादने बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांची प्रात्यक्षिके देखील पाहतील. हे प्रतिनिधी 20 एप्रिल 2023 रोजी आपापल्या देशांना रवाना होतील.
****
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917143)
Visitor Counter : 251