माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘धरोहर भारत की- पुनरुत्थान की कहानी’ हा सरकारच्या कामगिरीवरील माहितीपट दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणार
मालिकेमधून नवीन राष्ट्रीय महत्वाच्या स्थळांच्या निर्मितीबाबतचा पंतप्रधान मोदी यांचा दृष्टीकोन,आणि त्याची अंमलबजावणी याचा मागोवा घेण्यात आला आहे
आपले सांस्कृतिक ऐक्य आणि अभिमानाची भावना पुनरुज्जीवित होण्याचा प्रवास माहितीपटाच्या माध्यमातून उलगडणार
डिजिटल माध्यमांवरील लोकप्रिय निवेदक कामिया जानी यांचे सादरीकरण असलेली, राष्ट्रीय महत्वाच्या स्थळांचे दस्तऐवजीकरण करणारी दोन भागांची मालिका 14 आणि 15 एप्रिल रोजी प्रसारित होणार
Posted On:
13 APR 2023 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
भारताच्या वर्तमानाची ताकद आपल्या समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय आचार-विचारांच्या जाणीवेमध्ये सामावली आहे. ही जाणींव सर्वोच्च स्तरावर पोहोचली असताना, दूरदर्शन, ‘धरोहर भारत की- पुनरुत्थान की कहानी’ हा दोन भागांचा माहितीपट प्रसारित करणार आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग 14 एप्रिल 2023 रोजी, तर दुसरा भाग 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 8:00 वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. डिजिटल माध्यमांवरील लोकप्रिय निवेदक, कामिया जानी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माहितीपटानिमित्त केलेल्या खास संवादात म्हटले आहे, “आपल्या मातृभूमीच्या एकेक इंच भूमीच्या रक्षणासाठी आपले सैनिक आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात आणि आपल्या प्राणांची आहुती देतात. त्यांचे बलिदान शब्दात मोजता येणार नाही; भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्याची भव्यता आणि प्रभाव जिवंत करणे आवश्यक आहे”.
त्यांच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने हा माहितीपट भारताने, आपली सांस्कृतिक एकात्मता आणि अभिमानाचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये गेल्या काही वर्षांत केलेली मोठी प्रगती दाखवेल. जालियनवाला बाग सारख्या देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या स्थळांची सुरक्षा आणि पावित्र्याचे जतन करणे, रामजन्मभूमी, काशी विश्वनाथ धाम, सोमनाथ धाम आणि केदारनाथ धाम यांसारख्या आपल्या सांस्कृतिक केंद्रांच्या भव्यतेचे पुनरुत्थान करणे, करतारपूर साहिब सारख्या आध्यात्मिक स्थळांचा सन्मान राखणे, सेल्युलर जेल सारख्या प्रेरणादायी स्थळांवर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देणे, इंडिया गेट सारख्या भव्य ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारून देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला मानवंदना देणे, आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या माध्यमातून आपल्या देशभक्तांच्या - भूतकाळातील आणि वर्तमानातील महान योगदानाचा सन्मान करणे, यासारख्या इतर काही संकल्पना या माहितीपटामधून मांडल्या जातील.
“पुरातन, महान परंपराओं के प्रति आकर्षण” किंवा आपल्या पुरातन, महान आणि अतुलनीय वारशा प्रति रुची, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला समाजाच्या सर्व स्तरांमधून मिळालेला प्रतिसाद ऐतिहासिक ठरला असून, ही एक देशव्यापी घटना बनली आहे. हा माहितीपट हीच भावना प्रतिबिंबित करतो. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये या गोष्टीची जाणीव होऊन आपल्या सर्वांमधील अभिमानाच्या जाणीवेला नवसंजीवनी मिळाली आहे. अशा वेळी, आजच्या तरुणांनी आपल्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बलिदानाचे महत्त्व पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांच्या वारशाचे स्मरण करणे अत्यावश्यक आहे.
त्याचप्रमाणे, साबरमती आश्रमासारख्या आपल्या अध्यात्मिक केंद्रांचे पुनरुज्जीवन, स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा आणि पंचतीर्थ यांसारख्या नवीन स्मारकांच्या उभारणीमागील कारणे या माहितीपटाच्या माध्यमातून पूर्णपणे समजतील. थोडक्यात, दोन भागांचा हा माहितीपट, भारताच्या विशाल आणि चैतन्यमय संस्कृतीचे एक दृश्य आकर्षक प्रदर्शन आहे, जो आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे पुनरुज्जीवन करतो, त्याला आत्मसात करतो आणि त्याचा उत्सव साजरा करतो.
“धरोहर भारत की” प्रत्येक भारतीयाच्या हृदयात, आणि हृदयाने भारतीय असलेल्यांमध्ये आनंद आणि अभिमान जागवेल. आपले मूळ समजून घेण्याचा हा प्रवासच आपल्याला उज्जवल भविष्याच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916283)
Visitor Counter : 169