पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशात नव्याने भरती झालेल्या शिक्षकांसाठी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
"आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे"
"रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी कौशल्य विकासावर सरकारचा विशेष भर"
"नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमध्ये मध्य प्रदेशने शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी झेप घेतली आहे"
"तुमचे शिक्षण केवळ वर्तमानच नव्हे तर देशाचे भविष्य देखील घडवेल हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे"
Posted On:
12 APR 2023 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
मध्य प्रदेशमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
मध्य प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम वेगाने सुरू असून विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करून हजारो तरुणांना विविध पदांवर भरती करण्यात आले असल्याचे पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना नमूद केले. शिक्षक पदासाठी 22,400 हून अधिक तरुणांची भरती करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आणि अध्यापनासारख्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नियुक्तीपत्रे मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
केंद्र सरकारने आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.“हे धोरण मुलांचा सर्वांगीण विकास, ज्ञान, कौशल्ये, संस्कृती आणि भारतीय मूल्यांच्या संवर्धनावर भर देते” असे सांगून मोदी यांनी हे धोरण प्रभावीपणे राबवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. मध्य प्रदेशातील मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती मोहीम या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
आज नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास निम्म्या शिक्षकांना आदिवासी भागात नियुक्ती दिली जाईल, यामुळे आदिवासी मुलांना यांचा लाभ होईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मध्य प्रदेश सरकारने यावर्षी 60 हजार शिक्षकांसह 1 लाखाहून अधिक सरकारी पदांची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याने राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणात शैक्षणिक गुणवत्तेत मोठी झेप घेतली आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. जाहिरातींवर पैसा खर्च न करता राज्य 17 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी विद्यार्थी,शिक्षक आणि मध्य प्रदेश सरकारचे अभिनंदन केले.
रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकार कौशल्य विकासावर विशेष भर देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे उघडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूदी नुसार देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे उघडली जातील.या केंद्रात तरुणांना नव्या युगाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाईल,असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे,असे पंतप्रधान म्हणाले.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जीवनात आई किंवा शिक्षकांच्या प्रभावाप्रमाणे त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करावे, असे पंतप्रधानांनी आज नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांना संबोधित करताना सांगितले. "तुमचे शिक्षण केवळ वर्तमानच नव्हे तर देशाचे भविष्य देखील घडवेल हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे",असे मोदी म्हणाले. शिक्षकांनी दिलेले शिक्षण केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही तर समाजातही सकारात्मक बदल घडवून आणेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. “तुम्ही जी मूल्ये रुजवली ती आजच्या पिढीवरच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांवर सकारात्मक परिणाम घडवतील”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Jaydevi PS/Sonali/Shraddha/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915855)
Visitor Counter : 184
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam