वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी अर्ज मागवण्यात येत आहेत, 31-5-2023 ही अंतिम तारीख

Posted On: 07 APR 2023 12:52PM by PIB Mumbai

 

नवोन्मेषी उत्पादने तयार करणाऱ्या आणि लक्षणीय सामाजिक प्रभावाचे दर्शन घडवणारे उल्लेखनीय स्टार्ट अप्स आणि स्टार्ट अप्स व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) 2020 मध्ये राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार (NSA) सुरू केले. आतापर्यंत या पुरस्कार वितरणाच्या तीन कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय स्टार्ट अप व्यवस्थेच्या विकासात क्रांती घडवण्यात  मोलाचे योगदान देणारे स्टार्ट अप्स आणि पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 साठी अर्ज मागवण्यात येत असून हे अर्ज करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाली असून 31 मे 2023 या अंतिम तारखेपर्यंत अर्ज करता येतील.

विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सना मान्यता देण्याचा आणि सन्मानित करण्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी डीपीआयआयटीने राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा शुभारंभ केला आहे.  ‘Vision India @2047’ या दृष्टीकोनाला अनुसरून देशभरातील नवोन्मेषांचा सन्मान करण्यात येईल ज्यामध्ये भारत विविध संकल्पनांमधील अमृत काळाच्या भावनेने प्रेरित होऊन विकसित अर्थव्यवस्था बनण्यावर भर देत आहे.  

या वेळच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये 20 श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येतील, ज्या श्रेणींचा सध्याच्या भारतीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा केल्यानंतर विचार करण्यात आला आहे. यामध्ये एरोस्पेस, किरकोळ आणि परिवर्तनकारक तंत्रज्ञानापासून अधिक जास्त प्रभाव निर्माण करण्यावर भर असलेल्या श्रेणींपर्यत विविध श्रेणींचा समावेश आहे.

प्रत्येक श्रेणीतील विजेत्या स्टार्ट अप्सला डीपीआयआयटीकडून 10 लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल. राष्ट्रीय पुरस्कार 2023 मधील विजेत्यांना आणि अंतिम फेरी गाठणाऱ्यांना गुंतवणूकदार आणि सरकारसोबत संपर्क, मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उपलब्धता, कॉर्पोरेट आणि युनिकॉर्नसोबत संपर्क आणि इतर प्रकारच्या मदतीसह संपूर्ण पाठबळ दिले जाणार आहे.

यापूर्वी झालेल्या तीन राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सोहळ्यात देशातील स्टार्ट अप्स आणि पूरक वातावरण निर्मात्यांनी अतिशय उत्साही सहभाग नोंदवला होता. तीन वर्षात राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार कार्यक्रमात 6400 स्टार्ट अप्स सहभागी झाले होते आणि 450 हून अधिक स्टार्ट अप्संना विजेते आणि अंतिम फेरीतले प्रवेशकर्ते म्हणून मान्यता मिळाली.

अधिक तपशीलासाठी, येथे भेट द्या https://www.startupindia.gov.in/

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914636) Visitor Counter : 130


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu