राष्ट्रपती कार्यालय

भूतानच्या राजांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Posted On: 04 APR 2023 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2023

 

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आज (4 एप्रिल 2023) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

भारत आणि भूतान यांच्यात परस्पर विश्वास, सद्भावना आणि सामंजस्य यावर आधारित सर्व स्तरांवर घनिष्ठ भागीदारी आहे, अशा भावना भूतानच्या राजांचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या. भूतानसोबतची बहुआयामी आणि विशेष भागीदारी भारतासाठी अतिशय महत्वाची आहे असेही त्या म्हणाल्या. भूतानचा सर्वात मोठा विकास भागीदार या नात्याने, आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा, डिजिटलीकरण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात भूतानमधील प्रकल्पांना पाठबळ देण्याचा भारताला अभिमान आहे. भूतानचे प्राधान्यक्रम आणि तिथल्या लोकांच्या  आकांक्षा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी भारताची भागीदारी पुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वर्षी भूतान कमी विकसित देश (LDC) या स्तरातून बाहेर पडण्यासाठी  सज्ज असून उच्च उत्पन्नाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. या प्रवासात भारत भूतानचा विश्वासार्ह भागीदार राहील, असे त्या म्हणाल्या.

फिन टेक म्हणजेच वित्त तंत्रज्ञान, स्टार्ट अप्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही, भारत आणि भूतानमधील सहकार्य सुरु आहे. युवाशक्तीमधली   ऊर्जा आणि क्षमता यांचा  पुरेपूर लाभ घेण्यासाठी दोन्ही देशांनी   सहकार्याची व्याप्ती अधिक वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913643) Visitor Counter : 139