पर्यटन मंत्रालय
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे झालेल्या पर्यटनविषयक कृतिगटाच्या दुसऱ्या बैठकीची आज यशस्वी सांगता
भारताने सादर केलेल्या पाच प्राधान्यक्रमांबाबत चर्चा करून कृतिगटाने त्यांना मान्यता दिली
बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेतून सफर केली आणि युद्ध स्मारकाला दिली भेट
Posted On:
03 APR 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2023
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे झालेल्या पर्यटनविषयक कृतिगटाच्या दुसऱ्या बैठकीची आज यशस्वी सांगता झाली. दिनांक 1 ते 3 एप्रिल या कालावधीत आयोजित या बैठकीत द्विपक्षीय उपक्रम, उद्घाटनपर सत्र, कृतिगटाच्या बैठका, द्विपक्षीय बैठकींची मालिका, बतासिया लूप आणि राज्यपालांचे दार्जिलिंग येथील निवासस्थान या ठिकाणांना भेट तसेच दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेगाडीतून सफर यांचा समावेश होता.
दिनांक 1 एप्रिलच्या कृतिगटाच्या बैठकीपूर्वी ‘शाश्वत विकास ध्येये गाठण्यासाठी साहसी पर्यटनाचा साधन म्हणून वापर’ या संकल्पनेवर आधारित चर्चात्मक कार्यक्रम पार पडला. साहसी पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती, यशोगाथा, आगामी शक्यता आणि समस्या यांच्यावर या कार्यक्रमात सहभागी सदस्यांनी चर्चा केली. यामध्ये ब्रिटन, मेक्सिको, कॅनडा, जर्मनी,जपान तसेच ब्राझील या देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.या प्रसंगी साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा झाली तसेच जागतिक आणि भारतीय संदर्भात साहसी पर्यटन या विषयावरील सादरीकरणे करण्यात आली.
उद्घाटनपर सत्रात केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी.किशन रेड्डी तसेच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षात म्हणजे 2047 या वर्षी भारताला एक ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय निश्चित केले आहे असे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी उद्घाटनपर सत्रात बोलताना सांगितले.भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय पर्यटन धोरण मसुदा तयार केला आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की, हे धोरण देशातील पर्यटन क्षेत्राचा शाश्वत आणि जबाबदार विकास साधण्यासाठीचा समग्र आराखडा आहे. वर्ष 2030 पर्यंत शाश्वत विकास ध्येये गाठण्याप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी पर्यटन उद्योगांना पाठबळ देऊन आणि पर्यटन क्षेत्र मजबूत करून देशातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आराखडा बळकट करणे हा या धोरणाचा उद्देश आहे.
या बैठकीला उपस्थित असलेले त्रोईका-इंडोनेशिया आणि ब्राझीलसह सर्व जी-20 सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी पहिल्या मसुद्याच्या परिणामांबाबत तसेच भारताने सादर केलेल्या पाच प्राधान्यक्रमांबाबत त्यांची मते आणि सूचना नोंदविल्या.
या बैठकीच्या दुसऱ्या सत्रात सादरीकरणे आणि खुल्या चर्चांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उपरोल्लेखित पाच प्राधान्यक्रमांची सविस्तर चर्चा करण्यात आली. तुर्कस्थान, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि इटली या देशांनी प्रत्येक प्राधान्यक्रमाच्या संदर्भात, अनुक्रमे हरित पर्यटन, डिजिटलीकरण, कौशल्ये,पर्यटनविषयक एमएसएमई उद्योग आणि स्थानाधारित व्यवस्थापन याबाबत सादरीकरणे केली. प्रत्येक सादरीकरणानंतर सदस्य राष्ट्रे, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या प्रतिनिधींमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या समारोपाच्या वेळी अध्यक्ष भारताच्या प्रतिनिधींनी पाच प्राधान्यक्रमांवर आधारित चर्चा केल्याबद्दल आणि बैठकीचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल सर्व जी-20 सदस्य, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कालावधीत “अभियान तत्वावरील पर्यटन: साहसी पर्यटनाचे लाभ” या विषयावर देखील सादरीकरणे करण्यात आली. साहसी पर्यटनाचे लाभ, समस्या आणि साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यातील आव्हाने प्रस्तुत करण्यात आली आणि प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.
आज, बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी घूम स्थानक ते दार्जिलिंग स्थानक या टप्प्यात दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे प्रवासाचा लाभ घेतला. या प्रतिनिधींनी बतासिया लूप आणि युध्द स्मारकाला देखील भेट दिली. घूम हे देशातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे.
जी-20 बैठकीच्या प्रतिनिधींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ.सी.व्ही.आनंद बोस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यांनी दार्जिलिंगच्या चौरस्ता भागात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दार्जिलिंग आणि सिलीगुडी येथील स्थानिक कला आणि हस्तकला यांचे दर्शन या प्रतिनिधींन घडविले तसेच या प्रतिनिधींना पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध स्थानिक वस्तू भेटीदाखल दिल्या.
बैठकीच्या कालावधीत मेफेअर टी रिसॉर्ट या ठिकाणी प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, तेथे त्यांनी योग सत्रामध्ये देखील भाग घेतला.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1913592)
Visitor Counter : 175