महिला आणि बालविकास मंत्रालय

केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 4 ते 6 एप्रिल 2023 दरम्यान महिला आणि बाल विकास मंत्रालयाची दुसरी G20 सक्षमीकरण (एम्पॉवर) बैठक आयोजित


"महिला सक्षमीकरण: समानता आणि अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी'' ही या बैठकीची संकल्पना

बैठकीच्या पार्श्वभूमीवर 4 एप्रिल रोजी आयोजित परिसंवादामध्ये महत्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा

Posted On: 03 APR 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2023
  
  
महिलांच्या आर्थिक प्रतिनिधित्वाचे सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी जी 20 आघाडी  (एम्पॉवर) ही जी 20 समूहातील देशांचे व्यापार धुरिणांची  आणि सरकार यांची आघाडी आहे, खाजगी क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व आणि सक्षमीकरणाला गती देणे हे याचे उद्दिष्ट आहे. भारताचा महिला नेतृत्वाखालील  विकास अजेंडा पुढे नेण्याचे, भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 एम्पॉवर 2023 चे उद्दिष्ट आहे

जी 20 सक्षमीकरण कार्यगटाची पहिली बैठक 11-12 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशात आग्रा येथे झाली. दुसरी बैठक 4 ते 6 एप्रिल 2023 दरम्यान केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आयोजित करण्यात आली आहे.
 
"महिला सक्षमीकरण: समानता आणि अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी '' ही या बैठकीची संकल्पना आहे. भारताचे जी 20 अध्यक्षपद हे  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने सर्वसमावेशक, न्याय्य, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित परिवर्तनीय बदलांना पुढे घेऊन जात आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई  या बैठकीत  सहभागी होतील  आणि बैठकीला उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. जी 20 सक्षमीकरण   2023 च्या अध्यक्षा डॉ. संगिता रेड्डी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यादेखील बैठकीला संबोधित करणार आहेत.
 
दुसऱ्या जी 20 सक्षमीकरण बैठकीच्या प्रारंभीच्या सत्रात, '25x25 ब्रिस्बेन उद्दिष्टांच्या दिशेने महिलांचे सक्षमीकरण करून आर्थिक समृद्धी मिळवणे 'या विषयावरील पूर्ण सत्रानंतर परिसंवादही होणार आहे.

बैठकीच्या पार्श्वभूमीवर 4 एप्रिल रोजी आयोजित अन्य कार्यक्रमांमधील परिसंवादात, 'शाळा-ते-कार्यस्थळ' स्थित्यंतरे आणि कारकीर्द विकासाच्या संधी उपलब्ध करणे; देखभाल संबंधी अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे; महिला सक्षमीकरणासाठी कॉर्पोरेट संस्कृतीच्या दिशेनं मार्गक्रमण या विषयावर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

मुख्य कार्यक्रमासह चहा, कॉफी, मसाले आणि काथ्याची लागवड आणि उत्पादनामध्ये ,  महिलांच्या नेतृत्वाखालील एफपीओ आणि महिलांनी तयार केलेली स्वदेशी खेळणी, हातमाग आणि  हस्तकला उत्पादने तसेच आयुर्वेदिक आणि निरामय  उत्पादने यांची लागवड आणि उत्पादनामधील महिलांचा सहभाग दर्शवण्यासाठी राष्ट्रीय  फॅशन तंत्रज्ञान संस्थेची  संकल्पना असलेल्या आणि त्यांनी मांडलेल्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन डिजिटल वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल जे अभ्यागतांना एक सुंदर अनुभूती देईल.

जी 20 सक्षमीकरणच्या प्राधान्यक्रमांवरील सहमतीच्या मुद्यांच्या अनुषंगाने प्रमुख निष्कर्ष आणि कृती निश्चित करण्यावर या बैठकीच्या समारोप सत्राचा भर असेल. 

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1913395) Visitor Counter : 124