रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेची वित्तीय  वर्ष -2022-23 मधील प्रमुख कामगिरी


भारतीय रेल्वेने वित्तीय वर्ष 22-23 मध्ये विक्रमी 1512 मेट्रिक टन मालवाहतूक केली

Posted On: 02 APR 2023 7:15PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने वित्तीय  वर्ष 2022-23 दरम्यान  मालवाहतूक, विद्युतीकरण, नवीन मार्ग /दुहेरीकरण/गेज रूपांतरण, रेल्वे इंजिन  उत्पादन आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे एकात्मिकीकरण  यासह विविध श्रेणींमध्ये महत्वपूर्ण टप्पे गाठले.

आर्थिक वर्ष- 2022-23 मधील भारतीय रेल्वेच्या कामगिरीचे ठळक मुद्दे :

1. माल वाहतूक   आणि महसूल: भारतीय रेल्वेने  2022-23 मध्ये 1512 मेट्रिक टन मालवाहतूक केली. यात   वित्त वर्ष  2021-22 मधील  1418 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या  तुलनेत 6.63% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय रेल्वेसाठी एका आर्थिक वर्षातली ही सर्वाधिक मालवाहतूक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतीय रेल्वेने 2.44 लाख कोटी रुपये  महसूल प्राप्त केला आहे. यात वर्ष  2021-22 मधील 1.91 लाख कोटी रुपयांच्या  तुलनेत  27.75% वाढ झाली आहे. ग्राहककेंद्रित दृष्टिकोन  आणि व्यवसाय विकास युनिट्सचे कार्य, वेगवान धोरण निर्मितीचे पाठबळ यामुळे  रेल्वेला हे  महत्त्वपूर्ण यश साध्य करता आले.

 

2. विक्रमी विद्युतीकरण: भारतीय रेल्वे मिशन 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण करण्यासाठी आणि जगातील सर्वात मोठे पर्यावरणपूरक  रेल्वे जाळे होण्यासाठी वेगाने प्रगती करत आहे. वर्ष 2022-23 या कालावधीत भारतीय रेल्वेच्या  इतिहासात प्रथमच 6,542 RKM(रूट किलोमीटर ) विद्युतीकरण साध्य करता आले.

 

3. नवे मार्ग (नवीन रेषा/दुहेरीकरण/गेज रूपांतरण) -यात  2021-22 मधील  2909 किमीच्या तुलनेत वाढ झाली असून  2022-23 मध्ये 5243 किमी साध्य करता आले. अशा प्रकारे दररोज सरासरी 14.4 किमी प्रतिदिन नवे मार्ग टाकले जात आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण  आहे.

 

4. स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली : भारतीय रेल्वेच्या सध्याच्या उच्च घनतेच्या मार्गांवर अधिक गाड्या चालवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग हा एक किफायतशीर उपाय आहेभारतीय रेल्वेने वर्ष 2021-22 मधील 218 किलोमीटरच्या तुलनेत  2022-23 मध्येस्वयंचलित सिग्नलिंगसह 530 किमी अद्यावत करत  143.12% ची वाढ नोंदवली  आहे.

 

5. डिजिटली इंटरलॉक्ड स्थानकं (Electronic Interlocking):- जुन्या धाटणीच्या साच्या ऐवजी संगणकावर आधारित प्रणाली असलेल्या  डिजिटली इंटरलॉक्ड स्थानकांची मोठ्या संख्येने निर्मिती करण्यात आली.  2021-22 या वर्षात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीने युक्त 421 स्थानकांच्या तुलनेत 2022-23 या वर्षात 538 स्थानकांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली, जी गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 27 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांनी अधिक आहे.

 

6. उड्डाणपूल/भूमिगत मार्ग:- प्रवाशांना लोहमार्ग ओलांडण्याकरता 2021-22 मध्ये 994 उड्डाणपूल/भूमिगत मार्ग निर्माण करण्यात आले. त्या तुलनेत 2022-23 या वर्षात 1065 उड्डाणपूल/ भूमिगत मार्ग बनवण्यात आले. जे सात पूर्णांक 14 शतांश टक्क्यांची वाढ दर्शवतात .

 

7. पादचारी पूल:- 2021-22 या वर्षात 373 पादचारी पुलांच्या तुलनेत 2022-23 या वर्षात 375 पादचारी पूल बांधण्यात आले.

 

8. फाटक निष्कासन :- लोहमार्ग नजीकच्या फाटकांमधून लोहमार्ग ओलांडणे हा सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होता.  2021-22  या वर्षात 867 फाटके बंद करण्यात आली. त्या तुलनेत 2022-23 या वर्षात 880 फाटके बंद झाली.

 

9. गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनल्स :- मालवाहतूक क्षेत्रात दळणवळण वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनल्स निर्मितीच्या विकासाला प्राधान्य देत आहे. 2021-22  या वर्षात अशी 21 मालवाहतूक टर्मिनल्स निर्माण करण्यात आली होती, त्या तुलनेत 2022-23 या वर्षात 30 मालवाहतूक केंद्रांची निर्मिती झाली.

 

10. उद्वाहन / सरकते जिने:- सुगम्य भारत अभियान अंतर्गत दिव्यांग, वयोवृद्ध आणि बालकांचा रेल्वे स्थानकांवर वावर  सुलभ व्हावा  या उद्देशाने भारतीय रेल्वे देशभरातल्या रेल्वे स्थानकांवर उद्वाहने आणि सरकत्या जिन्यांची उभारणी करत आहे. 2022-23  या वर्षात 215 उद्वाहने आणि 184 सरकते जिने बसवण्यात आले.

 

11. आतापर्यंतची सर्वाधिक भंगार विक्री :- भंगार वस्तू  व्यवहारातून काढून टाकणे आणि  -लिलावाच्या माध्यमातून त्यांची विक्री करण्यासाठी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे प्रयत्नशील असून 2021-22  या वर्षात भंगार मालाच्या विक्रीतून 5316 कोटी रुपये जमा झाले, त्या तुलनेत 2022-23  या वर्षात 5736 कोटी रुपये विक्रीच्या माध्यमातून प्राप्त झाले.

 

12. भारतीय रेल्वे कडून 2022-23  या वर्षात 414 स्थानकांच्या परिसरात  यार्डांची पुनर्निर्मिती करण्यात आली.

***

S.Kane/S.Kakade/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913117) Visitor Counter : 290