पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा


इंदूरमधील रामनवमी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केले दुःख

"भारतीय रेल्वेच्या इतिहासातील दुर्मिळ घटनांपैकी एक म्हणजे पंतप्रधानांनी एकाच रेल्वे स्थानकाला अत्यंत कमी कालावधीत दोनदा दिली भेट"

“भारत आता नवीन विचार आणि दृष्टिकोनासह काम करत आहे”

“वंदे भारत हे भारताच्या उत्साहाचे आणि उर्मीचे प्रतीक. हे आमची कौशल्ये, आत्मविश्वास आणि क्षमता दर्शवते”

"ते मतपेढीसाठी खुशामतीमध्ये (तुष्टीकरण) व्यग्र होते, आम्ही नागरिकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी(संतुष्टीकरण) कटिबद्ध आहोत "

"एक स्थानक एक उत्पादन' अंतर्गत 600 विक्रीकेंद्रे कार्यरत असून अल्पावधीत एक लाख उत्पादनांची खरेदी झाली आहे"

"भारतीय रेल्वे ही देशातील सर्वसामान्य कुटुंबांसाठी सुविधा पर्याय बनत आहे"

"आज मध्य प्रदेश सातत्यपूर्ण विकासाची नवीन गाथा लिहित आहे"

"एकेकाळी ‘बीमारू’ राज्य म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशची कामगिरी विकासाच्या बहुतांश मापदंडांवर प्रशंसनीय आहे "

"भारतातील गरीब, भारतातील मध्यमवर्ग, भारतातील आदिवासी, भारतातील दलित-मागास, प्र

Posted On: 01 APR 2023 5:11PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.

इंदूरमधील एका मंदिरात रामनवमीला झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली. या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.

पंतप्रधानांनी, पहिली वंदे भारत ट्रेन मिळाल्याबद्दल मध्य प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले. या ट्रेनमुळे दिल्ली आणि भोपाळ दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल आणि व्यावसायिक तसेच तरुणांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील असे ते म्हणाले.

आजचे कार्यक्रमस्थळ असलेल्या राणी कमलापती स्थानकाचेही उदघाटन करण्याचे भाग्य लाभल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. भारताच्या अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसला दिल्लीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची  संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. आज भारतीय रेल्वेच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरणांपैकी एक आहे , एका पंतप्रधानाने एकाच रेल्वे स्थानकाला अत्यंत कमी कालावधीत दोनदा भेट दिली आहे हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आजचा हा प्रसंग आधुनिक भारतात नवीन व्यवस्था आणि नवीन परंपरा निर्माण होण्याचे प्रमुख उदाहरण आहे.

पंतप्रधानांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाविषयी सांगतमुलांमध्ये ट्रेनबद्दलची उत्सुकता आणि उत्साह अधोरेखित केलाएक प्रकारे वंदे भारत हे भारताच्या उत्साहाचे आणि उर्मीचे प्रतीक आहे. हे आमची कौशल्ये, आत्मविश्वास आणि क्षमता दर्शवते, असे ते म्हणाले.

या भागातील पर्यटनासाठी या ट्रेनचे फायदेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले यामुळे सांची, भीमबेटका, भोजपूर आणि उदयगिरी लेणी इथे अधिक पर्यटक येतील. परिणामी रोजगार, उत्पन्न आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्येही वाढतील असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी, एकविसाव्या शतकातील भारताच्या नव्या विचारसरणीवर आणि दृष्टिकोनावर भर देताना, पूर्वीच्या सरकारने नागरिकांच्या गरजांच्या पूर्ततांच्या जागी केलेल्या तुष्टीकरणाची आठवण करून दिली.  "ते मतपेढीसाठी खुशामतीमध्ये (तुष्टीकरण) व्यग्र होते, आम्ही नागरिकांच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी(संतुष्टीकरण) वचनबद्ध आहोत", असे ते पुढे म्हणाले. भारतीय रेल्वे, सामान्यांची कौटुंबिक वाहतूक व्यवस्था असल्याचे सांगत या आधी त्याचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण का झाले नाही असा सवाल पंतप्रधानांनी केला.

स्वातंत्र्यानंतर आधीच अस्तित्वात असलेले रेल्वे जाळे भूतकाळातील सरकारे सहज अद्ययावत करू शकली असती मात्र राजकीय स्वार्थापोटी रेल्वेच्या विकासाचा बळी देण्यात आला असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही ईशान्येकडील राज्ये रेल्वे जाळ्याशी जोडलेली नाहीतभारतीय रेल्वे हे जगातील सर्वोत्तम रेल्वे जाळे बनवण्यासाठी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी 2014 पूर्वी भारतीय रेल्वेला मिळालेल्या नकारात्मक प्रसिद्धीवर प्रकाश टाकला. या विस्तृत रेल्वे जाळ्यामधे, जीवघेण्या अपघातासाठी कारणीभूत हजारो मानवरहित फाटकांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ब्रॉडगेज नेटवर्क आज मानवरहित फाटकापासून मुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी रेल्वे अपघातांमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याच्या बातम्या सामान्य होत्या परंतु आज भारतीय रेल्वे अधिक सुरक्षित झाली आहे असेही त्यांनी नमूद केले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेड इन इंडिया 'कवच'ची व्याप्ती वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेचा दृष्टीकोन हा अपघातांपुरता मर्यादित नसून त्यामध्ये प्रवासातील आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीने मदत मिळवून देण्याचाही समावेश आहे. जो महिलांकरता विशेष फायदेशीर ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. स्वच्छता राखणे, वेळ पाळणे आणि तिकिटांचा काळाबाजार रोखणे या बाबींवर तंत्रज्ञानाधारे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

एक स्थानक एक उत्पादन या योजनेमुळे रेल्वे हे स्थानिक कारागिरांची उत्पादने ठिकठिकाणी पोहोचवण्याचे उत्तम माध्यम ठरत आहे, असे मोदी यांनी सांगितले. या योजने अंतर्गत प्रवाशांना जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने जसे, हस्तकला वस्तू, कला, भांडीकुंडी, कापड, चित्रे . रेल्वे स्थानकातच विकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशभरात अशी सुमारे 600 दुकाने सुरू झाली असून त्यांच्या मार्फत एक लाखांहून अधिक खरेदी व्यवहार झाले आहेत.

देशातल्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी भारतीय रेल्वे म्हणजे प्रवासाचे सोईस्कर माध्यम ठरू लागली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, 6000 स्थानकांवर वायफाय सुविधा, 900 स्थानकांमध्ये सीसीटीव्ही अशा उपाययोजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. वंदे भारतची युवावर्गात वाढती लोकप्रियता आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून वाढती मागणी त्यांनी अधोरेखित केली.

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी असलेल्या विक्रमी तरतुदीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. हेतू स्पष्ट, निश्चय पक्का आणि इच्छा असेल तिथे नवे मार्ग काढता येतात, असे ते म्हणाले. गेल्या नऊ वर्षांत अर्थसंकल्पातील रेल्वेसाठीची तरतूद सातत्याने वाढत गेली आहे. त्यात मध्य प्रदेशाच्या वाट्याला या काळात 13,000 कोटी आले आहेत. ही रक्कम वर्ष 2014 पूर्वीच्या वर्षांतील सरासरी 600 कोटींच्या तुलनेत जास्त असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी देशाच्या काही भागांमध्ये रेल्वेचे 100% विद्युतीकरण होत असल्याचे सांगितले. यासाठी निवडलेल्या 11 राज्यांमध्ये मध्य प्रदेशही असल्याचे ते म्हणाले. वर्ष 2014  नंतर दरवर्षी सरासरी 6,000 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होत असून हे त्यापूर्वीची सरासरी 600 किलोमीटरच्या तुलनेत दसपट जास्त आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आज मध्य प्रदेश सातत्यपूर्ण विकासाची नवी गाथा लिहीत आहे. शेती असो वा उद्योग, आज मध्य प्रदेशाची ताकद देशाच्या ताकदीत भर घालत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एकेकाळी बीमारू म्हणजे आजारी राज्य म्हणून ओळखला जाणारा मध्य प्रदेश आता विकासाच्या बहुतेक निकषांची पूर्तता करत आहे, असे म्हणून पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील उदाहरणे दिली जसे, गरीबांसाठी घरे बांधण्यात मध्य प्रदेश आघाडीवर आहे, घरोघरी पाणीपुरवठा करण्यात मध्य प्रदेश यशस्वी ठरले आहे, राज्यातील शेतकरी गव्हासह अनेक पिकांचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत, उद्योग सातत्याने नवी उंची गाठत असून युवांसाठी अनंत संधी निर्माण करत आहेत.       

पंतप्रधानांची प्रतिमा देशात आणि देशाबाहेरही मलीन करण्याच्या प्रयत्नांत असलेल्यांपासून सावध राहण्याचा इशारा मोदी यांनी जनतेला दिला. भारताचा गरीब, मध्यम-वर्गीय, आदिवासी, दलित-मागास नागरिक आणि एकूणच भारतीय हे माझी ढाल आहेत, असे म्हणून त्यांनी जनतेला देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. विकसित भारतात मध्य प्रदेशाची भूमिका आणखी वाढवायला हवी. नवी वंदे भारत एक्स्प्रेस हे त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचलेले पाऊल आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

वंदे भारत एक्स्प्रेसने देशातील प्रवासाच्या अनुभवात सुधारणा घडवून आणली आहे. भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानक आणि नवी दिल्ली दरम्यान सुरू झालेली वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील 11 वी वंदे भारत सेवा आणि 12 वी वंदे भारत गाडी आहे. स्वदेशी आराखडा असलेली वंदे भारत एक्स्प्रेस ही प्रवासासाठी सर्व सोयीसुविधायुक्त आहे. रेल्वे प्रवाशांना या गाडीमुळे अधिक आरामदायी, सोईस्कर प्रवास शक्य होईल. त्यामुळे पर्यटन आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल

***

S.Patil/V.Ghode/R.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1912909) Visitor Counter : 132