शिक्षण मंत्रालय
युवा संगम (टप्पा II) साठीच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात,23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1000 युवक होणार सहभागी
युवा संगमची पहिली फेरी 1200 तरुणांच्या उत्साही सहभागाने संपन्न, 29 यात्रांच्या माध्यमातून भारतातील 22 राज्यांना दिल्या भेटी
Posted On:
01 APR 2023 6:43PM by PIB Mumbai
युवा संगम (टप्पा दुसरा) साठीची नोंदणी आजपासून ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली. यात भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1000 तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत, एक्सपोजर यात्रा एप्रिल आणि मे 2023 मध्ये आयोजित केल्या जातील. या माध्यमातून 45 ते 50 लोकांचा गट दोन राज्यात एकत्र यात्रा करेल. ही यात्रा सहभागी युवकांना पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक (तंत्रज्ञान) आणि परस्पर संपर्क ( लोकांमधील संवाद) या पाच विस्तृत क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा एक प्रभावी, बहुआयामी अनुभव प्रदान करेल. या कार्यक्रमात विद्यार्थी भाषा, साहित्य, पाककृती, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन या क्षेत्रांतल्या आपल्या अनुभवांबद्दल एकमेकांशी संवाद साधतील. थोडक्यात, त्यांना प्रथमच पूर्णपणे भिन्न भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत जगण्याचा अनुभव मिळेल.
18-30 वयोगटातील इच्छुक युवक याच उद्देशाने विकसित केलेल्या https://ebsb.aicte-india.org/ या पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
युवा संगमची पहिली फेरी नुकतीच फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान संपन्न झाली. यात मुख्यतः ईशान्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या पहिल्या टप्प्यात सुमारे 1200 युवकांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी 29 यात्रांद्वारे भारतातील 22 राज्यांना भेटी दिल्या होत्या. या युवा संगममुळे सहभागी युवकांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा एक भारत श्रेष्ठ भारताचा अनुभव मिळाला.
एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘युवा संगम’ या उपक्रमाची संकल्पना विविध मंत्रालयांच्या सहयोगी प्रयत्नांच्या रूपाने साकार झाली, ज्याचा उद्देश लोकांना लोकांशी जोडणे आणि देशभरातील युवकांमध्ये परस्पर सहानुभूती निर्माण करणे हा आहे. हा उपक्रम या कार्यक्रमात सहभागी होणार्या हजारो तरुणांमध्ये समंजसपणाची आपलेपणाची भावना जागृत करत आहे, जिचा प्रसार देशभरात होत जाईल आणि खर्या अर्थाने श्रेष्ठ भारत निर्माण करण्यात मोठे योगदान देईल.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912898)
Visitor Counter : 264