दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली

Posted On: 01 APR 2023 8:30AM by PIB Mumbai

वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी  राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 

दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि  दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसेच आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवाढ पद्धतीने 7.5 टक्के दराने आकर्षक आणि निश्चित व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.

 

राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, 2019 मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा चार लाख पन्नास हजार  रुपयांवरून नऊ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून संयुक्त खात्यासाठी  नऊ लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि गुंतवणूकीची कमाल मर्यादा  आजपासून 15 लाख रुपयांवरून  30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बचत ठेव आणि पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी (PPF) वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या उपायांमुळे टपाल खात्यामधल्या लहान बचत करणाऱ्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि टपाल कार्यालयाद्वारे या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करता येईल, विशेषतः ग्रामीण भागात आणि मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटक यांना लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

 

****

MI/Vikas Y/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912827) Visitor Counter : 445


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu