माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय माहिती सेवेतील अधिकार्यांच्या समारोप सत्राला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती
"भारतीय माहिती सेवा ही भारताच्या अधिकृत माहिती प्रणालीची आघाडीची रक्षक आहे"
नवीन माहिती व्यवस्थेला आकार आणि स्वरूप देण्यात भारताचा समान सहभाग असायला हवा : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
डिजीटल सार्वजनिक ठिकाणांच्या लोकशाहीकरणातून मिळणारे फायदे चुकीच्या माहितीमुळे नष्ट होऊ दिले जाऊ नयेत: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी इंडिया@2047 साठी संवादासाठी पाच Cs चा दिला मंत्र
Posted On:
31 MAR 2023 6:37PM by PIB Mumbai
भारतीय माहिती सेवा ही भारताचे हित जपणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेचे संरक्षण करणाऱ्या भारताच्या अधिकृत माहिती प्रणालीची आघाडीची रक्षक आहे असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे 2018, 2019 आणि 2020 च्या तुकडीतील भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांच्या समारोप सत्रात आज बोलताना ते म्हणाले की, भारतीय माहिती सेवा संचार आणि संपर्काची भूमिका अभिमानाने आणि अतिशय समर्पकपणे बजावत आहे.
नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसह सेवेतील तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना ठाकूर म्हणाले की, लवकरच अधिकाऱ्यांना विविध माध्यमांद्वारे केंद्र सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांची प्रमुख माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली जाईल. अधिकारी अशा वेळी सेवेत दाखल होत आहेत, जेव्हा केवळ 280-अक्षरांच्या ट्विटमध्ये जगभरातील तब्बल 8 अब्ज लोकसंख्येवर प्रभाव टाकण्याची ताकद आहे. या तंत्रज्ञान -प्रणित युगात अधिकारी अधिक विश्वासार्ह आणि अचूक माहिती प्रदान करण्यासाठी बिगर-शासकीय माहिती प्रसारकांशी स्पर्धा करतील. उदयोन्मुख तंत्रज्ञान सातत्याने माध्यम क्षेत्राला प्रभावित करत असताना, त्यांनी अधिका-यांना प्रेक्षकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आणि आमचे संदेश पोहचवण्यासाठी अत्याधुनिक साधने, कल आणि तंत्रांमध्ये पारंगत होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी अधिकार्यांना सक्रियपणे नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी नवीन संधीचा शोध घेण्याचे आवाहन केले.
तुमच्यापुढे अनेक आव्हाने आहेत असे ठाकूर यांनी अधोरेखित केले. भारत@2047 साठी जनतेशी संवाद साधण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी 5’C मंत्र दिला. त्यांनी सांगितलेले 5’C पुढीलप्रमाणे -
-नागरिक-केंद्रित संवाद - नागरिकांच्या गरजा आणि त्यांच्या हिताच्या बाबींवर संवाद केंद्रित असावा, तो सर्वांसाठी सुगम्य, सर्वसमावेशक आणि समजेल असा असावा.
- लक्ष्यित प्रेक्षकांसह सह-निर्मिती करा - संवाद आणि संदेशाच्या निर्मिती आणि रचनेत लक्ष्यित प्रेक्षकांना सामील करून घ्या, जेणेकरून ते त्यांच्याशी प्रासंगिक असेल आणि त्यांना आपले वाटेल.
-सहकार्य :सर्वोत्कृष्ट परिणाम साधण्यासाठी आणि एकमेकांच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा लाभ घेण्यासाठी भागधारकांबरोबर एकत्र काम करा.
- चिंतन - आवश्यकतेनुसार सुधारणा आणि समायोजन करण्यासाठी संवाद विषयक धोरणांचा प्रभाव प्रतिबिंबित करण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा.
-क्षमता निर्मिती - संवाद क्षेत्रात विकसित होत असलेल्या उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आव्हानांशी जुळवून घेण्यासाठी कौशल्ये आणि ज्ञान सातत्याने विकसित करा.
युद्धानंतरच्या काळात जागतिक माहिती व्यवस्था आकाराला येत असताना देशात माहिती सेवेचा प्रारंभ झाला आणि “आज आपण पाहत आहोत की महामारीनंतरच्या काळात नवी माहिती व्यवस्था जन्माला येत आहे, ज्यात भू-राजकीय दृष्ट्या संरेखनाच्या रेषा पुन्हा आखल्या जात आहेत आणि भौगोलिक-सामरिक समस्या पुन्हा मांडल्या जात आहेत असे ते पुढे म्हणाले.
अस्पष्ट अल्गो-चलित माहिती प्रसारामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे वर्चस्व नवीन माहिती व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत, पाश्चिमात्य देश नवीन माहिती व्यवस्थेला आकार आणि रूप देत आहोत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे त्यानुसार संरेखन केले आहे”. यामुळे आपल्यासाठी काय चांगले आहे हे ठरवण्याची राष्ट्रांची स्वायत्तता हिरावून घेतली जाऊ शकते असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. यात अधिकार्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे, त्यांनी अन्य देशांनी लागू केलेल्या माहिती व्यवस्थेविरूद्ध संरक्षक ढाल बनले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. “जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने नवीन माहिती व्यवस्थेला आकार आणि स्वरूप देण्यात तितक्याच हिरीरीने सहभागी व्हायला हवे”, असे ते म्हणाले.
मुद्दे योग्यरीत्या समजून घेणे जेणेकरुन जनतेपर्यंत योग्य प्रकारे माहिती पोहचेल हे अधिका-यांचे प्रमुख काम आहे, कारण चुकीची माहिती जनतेपर्यंत पोचल्यास ती राष्ट्र कमकुवत करते, तेथील संस्था कलंकित करते आणि निवडून आलेल्या लोकांवरचा विश्वास कमकुवत करते असे ते म्हणाले. द्वेषयुक्त चुकीच्या माहितीचा प्रभाव असलेला संवाद लोकशाही आणि राष्ट्रहितासाठी धोकादायक आहे असे त्यांनी सांगितले. इन्फोडेमिकचा धोका अधोरेखित करत ठाकूर म्हणाले की, टेक प्लॅटफॉर्मने उपलब्ध केलेल्या सार्वजनिक जागांच्या लोकशाहीकरणाचा सकारात्मक परिणाम झाला आहे, यात शंका नाही, लोकप्रिय वादविवाद आणि भाषणात तळागाळातील लोकांना सहभागी केले आहे, त्याच वेळी द्वेषयुक्त, धारदार विकृत माहिती, मग ती अंतर्गत असो किंवा बाह्य असो, सार्वजनिक जागांच्या या लोकशाहीकरणाच्या सकारात्मक फायद्यांच्या विरोधात तिने काम केले आहे. डिजीटल सार्वजनिक जागांच्या लोकशाहीकरणातून मिळणारा फायदा चुकीच्या माहितीमुळे नष्ट होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन ठाकूर यांनी अधिकार्यांना केले.
या प्रतिष्ठित सेवेत सामील झाल्याबद्दल तीन तुकड्यांमधील 52 अधिका-यांचे अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, इतके तरुण, उत्साही अधिकारी - देशसेवेसाठी आपली ऊर्जा समर्पित करण्यास उत्सुक आणि तयार असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला आहे.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912714)
Visitor Counter : 204