इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने फेब्रुवारीमध्ये 10.97 दशलक्ष आधार मोबाईल क्रमांकाशी जोडली, ही संख्या जानेवारीच्या तुलनेत 93% अधिक
Posted On:
31 MAR 2023 5:36PM by PIB Mumbai
फेब्रुवारी 2023 मध्ये रहिवाशांनी केलेल्या विनंतीनंतर 10.97 दशलक्ष मोबाइल क्रमांक आधारशी जोडण्यात आले, जे मागील महिन्याच्या तुलनेत 93 टक्क्यांनी अधिक आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानुसार, रहिवाशांनी केलेल्या अर्जानंतर 5.67 दशलक्ष मोबाईल क्रमांक जोडले गेले, तर फेब्रुवारीमध्ये या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
कल्याणकारी सेवांचा लाभ घेताना तसेच अनेक ऐच्छिक सेवा मिळवण्यासाठी उत्तम आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण रहिवाशांना त्यांचे आधार मोबाइल क्रमांकाशी जोडण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणकडून दिले जाणारे नियमित प्रोत्साहन, सुविधा आणि विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांक अपडेट ठेवण्याची रहिवाशांची इच्छा या प्रयत्नांतून दिसून येते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक कल्याणविषयक जवळपास 1700 थेट लाभ हस्तांतरण आणि सुशासन योजना आधारच्या वापरासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत.
भारतात सर्व क्षेत्रांमध्ये आधारचा अवलंब आणि वापर वाढत आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यातच 226.29 कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहार पार पडले, जे जानेवारीतील 199.62 कोटी व्यवहारांच्या तुलनेत 13 टक्क्यांहून अधिक आहेत.
आतापर्यंत, फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत एकूण 9,255.57 कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहार पूर्ण झाले आहेत. बहुतांश प्रमाणीकरण व्यवहार क्रमांक फिंगरप्रिंट वापरून केले गेले आहेत, तर अन्य प्रमाणीकरण लोकसांख्यिकीय विवरण आणि ओटीपी द्वारे करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, पारदर्शक आणि सुधारित ग्राहक सेवा प्रदान करून, आणि व्यवसाय सुलभतेत मदत करून आधार ई-केवायसी सेवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांसाठी उत्कृष्ट भूमिका पार पाडत आहे. फेब्रुवारी महिन्यात 26.79 कोटींहून अधिक ई-केवायसी व्यवहार झाले.
ई-केवायसीचा अवलंब केल्यामुळे वित्तीय संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि इतर संस्थांचा ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी झाला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत आधार ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या 1,439.04 कोटींच्या पुढे गेली आहे.
शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सेवा पुरवणारे AePS असो, थेट निधी हस्तांतरणासाठी आधार सक्षम डीबीटी असो, ओळख पडताळणी किंवा प्रमाणीकरणसाठी ई-केवायसी असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन सुखकर करण्यात आधार महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मागील दशकात, आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांच्या ओळखीचा पुरावा म्हणून महत्वपूर्ण ठरला असून अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. ज्या रहिवाशांना 10 वर्षांपूर्वी त्यांचे आधार जारी करण्यात आले होते, मात्र त्यानंतर इतक्या वर्षांत कधीही अपडेट केलेले नाही, अशा आधार क्रमांक धारकांना त्यांचे दस्तावेज अद्यतनित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912587)
Visitor Counter : 247