गृह मंत्रालय

छत्तीसगडमध्ये जगदलपूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या(सीआरपीएफ) 84 व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

Posted On: 25 MAR 2023 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज छत्तीसगडमध्ये जगदलपूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या(सीआरपीएफ) 84 वर्धापन दिन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. बस्तर विभागासाठी हल्बी या स्थानिक भाषेतील प्रसार भारतीच्या वार्तापत्राचे देखील त्यांनी उद्घाटन केले.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की सीआरपीएफच्या स्थापनेनंतर आणि डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचा उदय झाल्यानंतर  पहिल्यांदाच हा दिवस छत्तीसगडमध्ये साजरा केला जात आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. छत्तीसगडमधील डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचा अंत करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत सीआरपीएफच्या 763 कर्मचाऱ्यांनी हौतात्म्य पत्करले आहे, असे त्यांनी सांगितले.  शहीद जवानांनी ज्यासाठी सर्वात मोठे योगदान दिले त्या डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाविरोधातील संघर्ष आता अंतिम टप्प्यात आहे , असे ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर असो किंवा ईशान्येमध्ये शांतता प्रस्थापित करणे असो किंवा आदिवासींच्या विकासासाठी डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाविरोधातील संघर्ष असो ,सीआरपीएफच्या जवानांनी असामान्य साहस आणि शौर्याचे दर्शन घडवले आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले. देशातील अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रातील सीआरपीएफचा सुवर्ण इतिहास सर्व जवानांचे शौर्य, साहस आणि बलिदानाने लिहिलेला आहे, असे ते म्हणाले.सीआरपीऐफच्या 174 कोटी रुपये खर्चाच्या तीन विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन झाले आहे, असे शाह म्हणाले.  आकाशवाणीने हल्बी भाषेतील प्रसार भारतीच्या साप्ताहिक वार्तापत्राचे प्रसारण देखील सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. छत्तीसगडच्या आदिवासी भाषेतील पहिले वार्तापत्र सुरू केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी ऑल इंडिया रेडियो आणि दूरदर्शनचे अभिनंदन केले. यामुळे आपल्या स्थानिक भाषांनाच केवळ बळकटी मिळणार नसून या भागात राहणाऱ्या लोकांना जगातील घडामोडींची माहिती मिळेल आणि ते जगासोबत जोडले जातील, असे शाह म्हणाले.  

   

सीआरपीएफच्या महिला मोटरसायकल चमूच्या फ्लॅग इन म्हणजे मोहिमेवरून परतल्यानंतरच्या स्वागताचा देखील कार्यक्रम आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 38 मोटरसायकलींवरून या 75 महिला जवान 9 मार्च 2023 पासून सुरू झालेला 1848 किमीचा प्रवास करून या ठिकाणी परतणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या महिला जवानांच्या शौर्यामधून संपूर्ण देशात नारी शक्तीचा संदेश प्रसारित व्हायला मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षा दलांनी गेल्या 9 वर्षात डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाविरोधात निर्णायक लढा दिला असून त्यांना मोठे यश मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांमुळे विकासाच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात सीआरपीएफ देखील यशस्वी झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटना 2010 मधील उच्चांकाच्या तुलनेत 76%  ने कमी झाल्या आहेत आणि जीवितहानी देखील सुमारे 78%ने  कमी झाली आहे, अशी माहित केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी दिली. याशिवाय, सीआरपीएफने आंतरराज्य सीमांचा गैरफायदा घेण्यापासून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांना रोखण्यासाठी विविध राज्यांच्या पोलिसांसह एक संयुक्त कार्यदल देखील तयार केले आहे. बुधा पहाड, चक्रबंद आणि पारसनाथ हे तीन भाग ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या भागाला आज डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून मुक्त करण्यात आले आहे आणि  देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे आणि  आज तेथे सर्व विकासकामे सुरू झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.

सीआरपीएफच्या 84 वर्षांच्या वैभवशाली इतिहासाला आणखी बळकटी देत, हे दल डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत समर्पित भावनेने भारतमातेची सेवा करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910729) Visitor Counter : 160