राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रपती नीलयमच्या वास्तूमधला प्रवेश खुला, भारताच्या राष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केले उद्घाटन

Posted On: 22 MAR 2023 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 मार्च, 2023) तेलंगणाचे राज्यपाल, डॉ. तमिलिसाई सौंदर्यराजन आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रपती नीलयम इथला प्रवेश खुला केला. यावेळी राष्ट्रपतींनी जय हिंद रॅम्पचा जीर्णोद्धार आणि संवर्धन, तसेच ऐतिहासिक ध्वज चौकीच्या प्रतिकृतीच्या कामाची पायाभरणीही केली.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती रिट्रीट्स प्रत्येक भारतीयाचे आहेत. त्या म्हणाल्या की आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. सर्व नागरिकांना, विशेषत: आपल्या तरुण पिढीला स्वातंत्र्यसैनिकांबद्दल माहिती मिळावी आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत मूल्यांचा आदर व्हावा, असा आपला प्रयत्न आहे. सर्व नागरिकांनी, विशेषतः लहान मुले आणि युवा वर्गाने नीलयमला भेट द्यावी, आणि आपल्या वारशाशी जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती नीलयमची वारसा स्थळ असलेली वस्तू, सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रथमच खुली करण्यात आली आहे. यापूर्वी, केवळ मर्यादित कालावधीसाठी वर्षातून एकदाच नागरिक नीलायमच्या उद्यानांना भेट देऊ शकत होते. यापुढे, राष्ट्रपती निलयम राष्ट्रपतींच्या दक्षिण भागातील मुक्कामाचा काळ वगळता, वर्षभर सर्वसामान्यांसाठी खुले राहील.

अभ्यागत http://visit.rashtrapatibhavan.gov.in द्वारे त्यांची भेट देण्याची वेळ ऑनलाइन बुक करू शकतात. राष्ट्रपती नीलायम इथल्या स्वागत कार्यालयातही प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल. नागरिक, निलयमला आठवड्यातून सहा दिवस (सोमवार आणि सरकारी सुटी वगळता) सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 या वेळेत भेट देऊ शकतात, संध्याकाळी 4:00 वाजता प्रवेश प्रक्रिया बंद होईल. .

नोंदणी शुल्क भारतीय नागरिकांना प्रत्येकी रुपये 50/- फक्त, आणि परदेशी नागरिकांना प्रत्येकी रुपये 250/- इतके लागू राहील.  

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1909552) Visitor Counter : 196