महिला आणि बालविकास मंत्रालय
५ व्या पोषण पंधरवडा सोहळ्याला उद्यापासून सुरूवात
संकल्पना: "सर्वांसाठी पोषण: निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल"
कुपोषण दूर करण्यासाठी मौल्यवान संपत्ती म्हणून ‘श्री अन्न’- सर्व धान्यांची जननी लोकप्रिय करणे यावर पोषण पंधरवड्यात लक्ष केंद्रित करणार.
20 मार्च ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत पोषण पंधरवड्यादरम्यान श्री अन्नाचा प्रचार आणि प्रसार, स्वस्थ बालक स्पर्धा साजरी करणे आणि सक्षम अंगणवाड्यांची लोकप्रियता वाढवणे यावर उपक्रमांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करणार.
पोषण पंधरवड्यादरम्यान जनआंदोलन आणि जन भागीदारीच्या माध्यमातून पौष्टिकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सकस खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.
Posted On:
19 MAR 2023 9:16AM by PIB Mumbai
महिला आणि बाल विकास मंत्रालय 20 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाचवा पोषण पंधरवडा साजरा करणार आहे. जनआंदोलन आणि जन भागीदारीच्या माध्यमातून पौष्टिकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सकस खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे पंधरवड्याचे उद्दिष्ट आहे.
8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले पोषण अभियान, लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि व्याख्यानांच्या माध्यमातून पोषण विषयक जागरूकतेवर भर देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. पौष्टिकतेचे परिणाम सर्वांगीण पद्धतीने सुधारण्याच्या उद्देशाने पोषण अभियानाला सुरूवात झाली. कुपोषण-मुक्त भारताची अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर वर्तणुकीतील बदल महत्त्वपूर्ण घटक ठरला आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात 15 दिवस पोषण पंधरवडा साजरा केला जातो. तसच सप्टेंबर महिना देशभर राष्ट्रीय म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत साजरे करण्यात आलेल्या पोषण महिना आणि पोषण पंधरवड्यात सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेश, आघाडीचे कृतीशील गट, एकत्रित मंत्रालये तसेच लोकांचा व्यापक प्रमाणात सहभाग आणि उत्साह दिसून आला आहे. गेल्या पोषण पंधरवडा 2022 मध्ये देशभरात जवळपास 2 कोटी 96 लाख उपक्रम घेण्यात आले.
या वर्षीच्या पोषण पंधरवडा 2023 ची संकल्पना "सर्वांसाठी पोषण: निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल" ही आहे. 2023 हे भरडधान्याचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्’णून घोषित केल्यामुळे, या वर्षी कुपोषणावर उपाय म्हणून ‘श्री अन्न”- सर्व धान्यांची जननी म्हणून लोकप्रिय करणे यावर पोषण पंधरवड्याचं लक्ष केंद्रित असेल.
पोषण पंधरवडा दरम्यानचे उपक्रम, इतर बाबींसह, खालील प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करतील:
1. पोषणमूल्य वाढवण्यासाठी भरड धान्यावर आधारित पूरक पोषण, गृहभेटी, आहार सल्ला शिबिरे, श्री अन्न/भरड धान्याचा प्रचार आणि प्रसार मोहिमा आयोजन इत्यादी
2. स्वस्थ बालक स्पर्धा साजरी करणे: चांगलं पोषण, चांगलं आरोग्य आणि निरामय आयुष्यासाठी स्पर्धेची निरोगी भावना निर्माण करून नियोजित निकषांनुसार 'स्वस्थ बालक' किंवा ‘निरोगी बालक’ स्पर्धा साजरा करून याबाबत ओळख निर्माण करणे.
3. सक्षम अंगणवाड्यांना लोकप्रिय करणे: विकसित पोषण वितरण तसंच लहान बालकांची काळजी आणि शिक्षण केंद्र म्हणून सुधारित पायाभूत सोयी आणि सुविधांसह सक्षम अंगणवाड्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी मोहिमा आयोजित केल्या जातील.
पोषण पंधरवड्या दरम्यान आखलेल्या उपक्रमांचा समन्वय साधण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय हे क्षेत्रीय मंत्रालय असेल. राज्य/केंद्रशासित प्रदेशात महिला आणि बाल विकास विभाग/समाज कल्याण विभाग पोषण पंधरवड्यासाठी क्षेत्रीय विभाग असेल.
***
M.Jaybhaye/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908515)
Visitor Counter : 1036