युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रांच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा मंत्र्यांच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी भूषवले


एससीओ सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेचे यजमानपद ही भारतासाठी अभिमानाची बाबः अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 15 MAR 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023

 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) आठ सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सहयोग’ या विषयावरच्या तीन दिवसीय शिखर परिषदेचा आज समारोप झाला.

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे तीन दिवस चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती. पहिले दोन दिवस शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रांच्या कार्यगटाच्या तज्ञ सदस्यांनी चर्चा केली आणि शेवटच्या दिवशी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली या सदस्य  देशांच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा मंत्र्यांची बैठक झाली.  विशेषत: स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या पहिल्या वर्षीच (भारतीय स्वातंत्र्याचे 76 वे वर्ष) आणि जी 20 गटाचे अध्यक्षपद भारताकडे असताना एससीओ देशांच्या सदस्यांचे यजमानपद भूषवता आले ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे ठाकूर म्हणाले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांसोबत विविध विषयांवर क्रीडा आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या कौशल्याचा वापर करून एक समान व्यासपीठ तयार करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. हे पाऊल उचलल्यामुळे आमची खेळाप्रती असलेली समान वचनबद्धता आणखी दृढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी पुढे नमूद केले.

कझाकिस्तान, किरगिझस्तान, रशिया, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी (प्रभारी, उच्चायुक्तालय, नवी दिल्ली यांनी प्रतिनिधीत्व केलेले) वैयक्तिकरित्या या बैठकीला उपस्थित होते. चीन आणि ताजिकिस्तानचे प्रतिनिधी आभासी माध्यमातून या शिखरपरिषदेत सहभागी झाले. योगा, वुशू (कुंग फू) हे एससीओ देशांचे पारंपरिक शारीरिक व्यायाम प्रकार हे जीवनशैलीचा एक भाग म्हणून तसेच खेळ म्हणून त्यांचे महत्त्व याबद्दल बैठकीत प्रशंसा करण्यात आली. शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यात या पारंपरिक प्रकारांची भूमिका त्यांनी मान्य केली. एससीओ देशांच्या पारंपरिक औषधांचा वापर क्रीडा औषध, उपचार आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता यासाठी होतो याची नोंदही चर्चासत्रात करण्यात आली.

शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल एससीओ सदस्यांनी भारताचे अभिनंदन केले आणि यजमान राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

* * *

JPS/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1907358) Visitor Counter : 120