युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
Y20 सल्लामसलत बैठकीत जागतिक शैक्षणिक सुधारणांवर उहापोह
जीवन कौशल्ये , सर्वांगीण शिक्षण, हार्ड आणि सॉफ्ट स्किल्स प्रदान करण्यासाठी संस्थात्मक क्षमता, विद्यार्थी प्रणित शैक्षणिक धोरण यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज Y20 बैठकीत अधोरेखित
Posted On:
11 MAR 2023 7:15PM by PIB Mumbai
पुणे, 11 मार्च 2023
एकविसाव्या शतकातील गतीशील जगाच्या संदर्भात आपल्याला कोणत्या शैक्षणिक सुधारणांची आवश्यकता आहे? भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहयोगाने पुणे इथल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (SIU) येथे आयोजित चौथ्या Y20 सल्लामसलत बैठकीच्या सत्रात या प्रश्नावर विचारमंथन करण्यासाठी तज्ञ आणि विचारवंत एकत्र आले.
एज्युकेशन फॉर पीस, युनेस्को इराकचे कार्यक्रम व्यवस्थापक सायमन कुआनी किर कुआनी यांनी स्वतःचा विचार करण्याची क्षमता आणि भविष्यात नेतृत्व कसे करावे, यासारख्या जीवन कौशल्यासह अधिक संवादात्मक आणि आनंददायी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. शिक्षणाची चौकट संस्कृतीभिमुख असायला हवी, जेथे संस्कृतीशी कोणतीही तडजोड केली जात नाही, आणि त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या पार्श्वभूमीशी घट्ट जोडलेले राहतात, यावर त्यांचा विश्वास आहे.
अर्जेंटिना येथील तरुण शिक्षण अधिवक्ता, सोफिया बर्मुडेझ यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाबद्दल विचार मांडले, जिथे एखादी व्यक्ती केवळ नोकरी शोधण्यापेक्षा आपल्या शिकवण्याच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करते. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यासाठी त्यांच्या गरजे नुसार विशेष प्रशिक्षण साहित्य निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी विचार मांडले. शैक्षणिक धोरण तयार करताना नेत्यांनी विद्यार्थांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले, कारण ही धोरणे त्यांच्या विकासाचा अविभाज्य भाग असतात.
अर्जेंटिना येथील युनेस्कोचे SDG4 Youth नेटवर्कचे युलिसेस ब्रेंगी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स, अशा दोन्ही कौशल्यांच्या महत्वावर भर दिला. ते म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि निधीच्या कमतरतेमुळे जगभरातील संस्था अद्ययावत हार्ड स्किल्स प्रदान करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तर सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण जवळपास अस्तित्वातच नाहीत. सध्याची प्राचीन शैक्षणिक चौकट, पारंपरिक अध्यापन पद्धती आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करण्यासाठी मदतीची गरज असलेली नवी पिढी, यामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे इथले प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. अर्जुन देवरे, आयएफएस, यांनी भारतातील "ब्रेन ड्रेन" आणि भारतातील युवा पिढी उच्च शिक्षणासाठी परदेशात कशी स्थलांतरित होत आहे, हा प्रमुख मुद्दा उपस्थित केला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
ठळक मुद्दे
- शिक्षणाबाबतच्या सर्वांगीण दृष्टिकोनावर भर
- शिक्षण व्यवस्थेसाठीचा निधी आणि गुंतवणुकीत वाढ
- सॉफ्ट स्किल्स आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर भर
अमेरिकेच्या लिन्सडसी व्हाईटहेड या विद्यार्थिनीने या सत्राचे सूत्रसंचालन केले.
या सल्लामसलत बैठकीला सदस्य देशांचे तरुण प्रतिनिधी, स्पर्धेतील विजेते, निमंत्रित आणि भारत आणि G20 देशांतील विद्यार्थी उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905962)
Visitor Counter : 209