निती आयोग
राष्ट्रीय आव्हानं आणि सामायिक प्राधान्यांच्या क्षेत्रात नवोन्मेषासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संयुक्त प्रयत्न करणार
अटल इनोव्हेशन मिशन आणि सी एस आय आर ओ, आय ए- आय टी सी या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार
Posted On:
11 MAR 2023 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2023
राष्ट्रीय आव्हानांच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (ए आय एम), निती आयोग आणि ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था असलेल्या,कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (सी एस आय आर ओ) यांनी संयुक्तपणे काम करायचं ठरवलं आहे. त्यासाठी या बाबत संयुक्त सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरता ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या सहमतीपत्रावर(उद्दीष्ट नामा) या तिघांनी स्वाक्षरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या भारत दौऱ्यात, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीत झालेल्या त्यांच्या भेटीत ही संकल्पना पुढे आली. या बैठकीत परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रांबाबत चर्चा झाली आणि नवोन्मेषाच्या प्रमुख क्षेत्रासह, इतर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याची बांधिलकी बळकट करता येईल अशा विविध मार्गांची चाचपणी करण्यात आली.
ए आय एम आणि सी एस आय आर ओ यांच्यात स्वाक्षरी झालेल्या या पत्रात, परस्पर हितसंबंध आणि धोरणात्मक प्राधान्यांच्या क्षेत्रात अधिक सहकार्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. एकमेकांचे विचार आणि मतं लक्षात घेऊन, त्यांची अंमलबजावणी करत विकास साधण्याला चालना देणारा सर्वसाधारण कृती आराखडा, असं या उद्दीष्टनाम्याचं स्वरुप आहे.
'भारत-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी चॅलेंज (IA-ITC)' हा कार्यक्रम, दोन देशांमधील द्विपक्षीय सहयोगाचा गाभा आहे. स्टार्ट-अप(नवंउद्योग) आणि लघू-मध्यम उद्योगांना व्यावसायिक पाठबळ पुरवत, आपल्या सामायिक पर्यावरणीय आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या नवोन्मेष परिसंस्थांना एकत्र आणण्याचा हा एक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम, सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजेच पुनर्वापरावर भर देणारी अर्थव्यवस्था, ऊर्जा संक्रमण आणि अन्नसाखळीतील लवचिकता यासाठी आवश्यक असलेल्या, नवोन्मेषी तंत्रज्ञानावर आधारीत उपाययोजना बाजारात आणू शकतो. दोन्ही देशांच्या नवोन्मेष परिसंस्थेच्या, एकमेकांना पूरक क्षमता आणि साधनसंपत्तीचा लाभ, एकमेकांना मिळवून देण्याचा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
'आय ए-आय टी' सी हा कार्यक्रम, इंडिया ऑस्ट्रेलिया सर्क्युलर इकॉनॉमी (आय ए सी ई) हॅकाथॉन 2021 या उपक्रमाला मिळालेल्या यशावर बेतलेला आहे. या हॅकाथॉनमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या विद्यापीठातील विद्यार्थी, नवंउद्योग आणि लघू-मध्यम उद्योगांनी, अन्न व्यवस्था मूल्य साखळीतील पुनर्वापरासाठी, अभिनव तंत्रज्ञानावर आधारित उपाय विकसित केले आहेत.
"नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि भारत-ऑस्ट्रेलिया नवोन्मेष आणि तंत्रज्ञान उपक्रम संयुक्तपणे विकसित करण्यासाठी, सी एस आय आर ओ सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे," असं अटल नवोन्मेवेष मिशनचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले. "ही भागीदारी आणि विशेषतः आय ए-आय टी सी कार्यक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांसाठी, नवंउद्योग, लघुउद्योग क्षेत्र, व्यवसाय निर्माते आणि व्यवसाय प्रोत्साहन कर्ते, वित्तीय भांडवल पुरवठा(व्हेंच्युअर कॅपिटल) आणि उद्योगक्षेत्र अशा विविध घटकांचा समावेश असलेल्या परिसंस्थेच्या विविध स्तरांवर सहयोग करण्याची एक नामी संधी आहे. यामुळे. सीएसआयआरओच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमांचा व्यापक अनुभव लक्षात घेता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सह-निर्मिती यासाठी नवीन क्षितिजे उघडतील," असही ते म्हणाले.
“सीएसआयआरओ, ए आय एम सह भागीदारी करण्यास आणि सामायिक जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी उत्सुक आहे. ए आय एम कडे जागतिक दर्जाच्या नवकल्पनांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन आणि लाभ देण्याचा दांडगा अनुभव आहे. वास्तव जगतात, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम घडवू शकणारं वैज्ञानिक यश मिळवण्यासाठी आम्ही आमचं सामर्थ्य आणि नैपुण्य यांचा मेळ घालण्यास उत्सुक आहोत," असं 'सी एस आय आर ओ- विकास' चे कार्यकारी संचालक जोनाथन लॉ म्हणाले.
आय ए-आय टी सी या उपक्रमाचा कृती आराखडा शाश्वत, नाविन्यपूर्ण, परिणामकारक बनवण्यासाठी, तसच तो भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितसंबंधांशी सुसंगत आहे याची खात्री करण्यासाठी, ए आय एम आणि सी एस आय आर ओ, सध्या या कृती आराखड्याच्या रचना आणि विकासावर काम करत आहेत. या उपक्रमाची अधिकृत सुरुवात जुलै 2023 मध्ये अपेक्षित आहे.
* * *
JPS/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905907)
Visitor Counter : 179