पंतप्रधान कार्यालय
"महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
"2047 पर्यंत विकसित भारत" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश यंदाच्या अर्थसंकल्पाकडे एक चांगली सुरुवात म्हणून पाहत आहे.
"महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रयत्नांना यंदाचा अर्थसंकल्प देईल नवी गती"
"महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत आणि आम्हाला देशाच्या सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल जाणवत आहेत"
"विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितया विषयासाठी मुलींची नोंदणी देशातील ४३ टक्के आहे, ती अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी सारख्या देशांहून अधिक आहे"
"प्रधानमंत्री आवास योजनेने कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा आवाज केला बुलंद"
"गेल्या 9 वर्षांत देशातील 7 कोटींहून अधिक महिला या बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत"
“महिलांच्या सन्मानाची पातळी आणि समानतेची भावना वाढवूनच भारत पुढे जाऊ शकतो”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महिला दिनावरील लेखाचा संदर्भ देऊन केला समारोप
Posted On:
10 MAR 2023 10:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी "महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सल्ला मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प पश्चात 12 वेबिनारच्या मालिकेतील हा 11वा वेबिनार होता. पंतप्रधानांनी या वर्षीचा अर्थसंकल्प देशासाठी शुभ असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प भविष्यातील अमृत काळच्या दृष्टिकोनातून पाहिला आणि तपासला गेला आहे. देशातील नागरिकही या उद्दिष्टांशी जोडून पुढील 25 वर्षांचा वेध घेत आहेत, हे देशासाठी चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.
गेल्या 9 वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टीकोन ठेऊन देश वाटचाल करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले की भारताने हे प्रयत्न जागतिक स्तरावर नेले आहेत. हेच भारताच्या अध्यक्षतेखालील G-20 अध्यक्षतेखाली ठळकपणे दिसून येत आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या या प्रयत्नांना यंदाचा अर्थसंकल्प नवी गती देईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी नारी शक्तीच्या दृढनिश्चय, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, ध्येयासाठी काम करण्याची क्षमता आणि अत्यंत कठोर परिश्रम या गुणांना "मातृशक्ती" चे प्रतिबिंब म्हणून अधोरेखित केले.
या शतकात भारताच्या विकासाचा वेग आणि आवाका वाढवण्यात हे गुण मोठी भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे आज परिणाम दिसून येत आहेत आणि देशाच्या सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल जाणवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढत आहे आणि गेल्या 9-10 वर्षांत माध्यमिक आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या तिप्पट झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अशा विषयांसाठी मुलींची नोंदणी आज ४३ टक्के आहे, ती अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीसारख्या देशांपेक्षा जास्त आहे. वैद्यकीय, क्रीडा, व्यवसाय किंवा राजकारण यासारख्या क्षेत्रात महिलांचा फक्त सहभागच नाही वाढला तर या क्षेत्रांमध्ये त्या आघाडीवर सुध्दा आहेत.
मुद्रा कर्जाच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत हि वस्तुस्थिती पंतप्रधानांनी सांगितली . त्याचप्रमाणे महिलांना पी एम स्वनिधी योजने अंतर्गत तारण मुक्त कर्ज तसेच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामोद्योग, कृषी उत्पादक संस्था आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन योजनांचा लाभ होतो असे त्यांनी सांगितले . मोदी म्हणाले, "देशाच्या निम्म्या लोकसंख्या असलेल्या महिलांच्या मदतीने आपण देशाला कसे पुढे नेऊ शकतो आणि महिला शक्तीची क्षमता कशी वाढवू शकतो याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येते." त्यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा उल्लेख केला ज्यामध्ये महिलांना ७.५ टक्के व्याज मिळते . “पंतप्रधान आवास योजनेसाठी 80 हजार कोटी रुपयांची तरतूद हे देखील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे कारण 3 कोटी घरांपैकीबहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत”, असे ही मोदी म्हणाले.
पारंपारिक पद्धतीत देशात महिलांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसे मात्र पंतप्रधान आवास योजनेत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले . पीएम आवास योजनेमुळे महिलांना कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा आवाज बुलंद केला आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
महिला बचत गटांमधून नवीन युनिकॉर्न तयार होण्यासाठी महिला बचत गटांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. बदलत्या काळानुसार महिला सक्षमीकरणामुळे देशाच्या दृष्टीकोन बळकट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले . देशात आज 5 पैकी 1 बिगरशेती व्यवसाय महिला चालवते. गेल्या 9 वर्षांत 7 कोटींहून अधिक महिला बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. या बचत गटांनी 6.25 लाख कोटी रुपयांची कर्जे घेतल्यानं त्यांच्या भांडवलाच्या गरजेवरून त्यांची मूल्यनिर्मिती समजू शकते, असे गौरवोद्गार पंतप्रधानानी काढले.
या महिला केवळ लहान उद्योजक म्हणूनच नव्हे, तर सक्षम संसाधन व्यक्ती म्हणूनही योगदान देत आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. बँक सखी, कृषी सखी आणि पशु सखी सारख्या योजनांमुळे खेड्यापाड्यात विकासाचे नवे अध्याय रचले जात आहेत, याचाही उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला.
येत्या वर्षांत 2 लाखाहून अधिक बहुउद्देशीय, दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जाणार आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी सहकार क्षेत्रात झालेलं परिवर्तन आणि या क्षेत्रात महिलांच्या भूमिकेवरील आपले विचार स्पष्ट केले. १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला शेतकरी आणि उत्पादक संस्था मोठी भूमिका बजावू शकतात, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पारंपरिक अनुभव असलेल्या 1 कोटींहून अधिक आदिवासी महिला या श्रीअन्न विषयक बचत गटांचा एक भाग आहेत. “आम्हाला श्रीअन्न विषयक उत्पादनांच्या विपणनाशी संबंधित संधीचा वापर करून प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बनवण्याची कला हस्तगत करायची आहे, असं म्हणत श्रीअन्न विषयक महिला बचत गटांचं मोदी यांनी कौतुक केलं.
अनेक ठिकाणी गौण वन उत्पादनांवर प्रक्रिया करुन ते पदार्थ बाजारात विक्रिला आणण्यासाठी आज सरकारी संस्था मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. दुर्गम भागात अनेक बचतगट तयार झाले आहेत, ते आपण व्यापक पातळीवर नेले पाहिजेत, असं ते म्हणाले.
कौशल्य विकासाच्या गरजेवर या अर्थसंकल्पात आणलेली विश्वकर्मा योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ही योजना त्यांना जोडणारा एक दुवा म्हणून काम करेल तसंच महिला सक्षमीकरणासाठी तिच्या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे, यावर मोदी यांनी भर दिला. त्याचप्रमाणे, GeM अर्थात सरकारी ई-बाजापेठ आणि ई-कॉमर्स हे महिलांच्या व्यवसायाच्या संधी वाढवण्याचे मार्ग बनत आहेत, बचत गटांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात नवीन तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या भावनेनं देश वाटचाल करत असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. देशाच्या कन्या राष्ट्रीय सुरक्षेच्या भूमिकेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्या राफेल विमान उडवताना दिसतात आणि जेव्हा त्या उद्योजक बनतात, निर्णय घेतात आणि जोखीम पत्करतात तेव्हा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो, असं पंतप्रधान म्हणाले. नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन महिला आमदार प्रथमच निवडून आल्याचा त्यांनी उल्लेख केला, त्यापैकी एका महिलेनं मंत्रीपदाची शपथही घेतली आहे असे ते म्हणाले. भारत, महिलांच्या सन्मानाची उंची आणि समानतेची भावना वाढवूनच पुढे जाऊ शकतो. सर्व महिला, भगिनी आणि मुलींच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याच्या निर्धाराने पुढे जाण्याचं आवाहन मोदी यांनी सर्वांना केलं.
तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमच्या कुटुंबात, शेजारच्या किंवा कामाच्या ठिकाणी एका बदलासाठी स्वत: ला वचनबद्ध करण्याची विनंती मोदी यांनी केली. मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणणारा कोणताही बदल, तिच्या आयुष्यात पुढे जाण्याची शक्यता वाढवणारा कोणताही बदल महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. "आपल्यापैकी प्रत्येकाची प्रगतीची गती वाढवणे आपल्यावर अवलंबून आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लिहिलेल्या लेखातली एक ओळ वाचून पंतप्रधानांनी आपल्या वेबिनारचा समारोप केला.
***
JPS/G.Deoda/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905559)
Visitor Counter : 432
Read this release in:
Kannada
,
Malayalam
,
Telugu
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati