पर्यटन मंत्रालय
आयटीबी बर्लिन 2023 या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय 'गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड्स 2023' मध्ये भारताला मिळाले गोल्डन आणि सिल्व्हर स्टार
Posted On:
09 MAR 2023 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आयटीबी बर्लिन 2023 या प्रदर्शनात 'टीव्ही/सिनेमा कमर्शियल इंटरनॅशनल अँड कंट्री इंटरनॅशनल' श्रेणीमध्ये आंतरराष्ट्रीय 'गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड्स 2023' मध्ये गोल्डन आणि सिल्व्हर स्टार पटकावला आहे. हे पुरस्कार भारत सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग यांनी 08 मार्च 2023 रोजी आयटीबी बर्लिन या प्रदर्शनात स्वीकारले. 7 ते 9 मार्च 2023 या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे.
गोल्डन सिटी गेट टुरिझम मल्टी-मीडिया पुरस्कार दरवर्षी पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राशी संबंधित विविध श्रेणींमध्ये दिले जातात. ‘गोल्डन सिटी गेट’ ही देश, शहरे, प्रदेश आणि हॉटेल्ससाठी सर्जनशील मल्टी-मीडिया या प्रकारातली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. चित्रपट आणि पर्यटन तज्ज्ञांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीद्वारे या पुरस्कारांसाठी पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते. हा वार्षिक पुरस्कार समारोह आयटीबी बर्लिन येथे होतो. हा जगातील आघाडीचा पर्यटन व्यवसायाशी निगडित कार्यक्रम आहे. मंत्रालयाने पुरस्कार प्राप्त केलेले प्रचारात्मक चित्रपट/टेलिव्हिजन जाहिराती, भारतातील कोविड पश्चात पर्यटकांसाठी भारत खुले करण्याच्या वैश्विक प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून तयार केल्या गेल्या आहेत.
पर्यटन मंत्रालयाने या महामारीनंतर परदेशी पर्यटकांचे देशात स्वागत करण्यासाठी नवीन अतुल्य भारत ब्रँडच्या जाहिरातीसाठी लघुपट विकसित केले आहेत. हे लघुपट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी उद्योगात प्रचार आणि विपणन करण्याच्या हेतूने व्यापक वापरासाठी प्रसारित केले गेले आहेत.
मंत्रालयाच्या समाज माध्यमाव्दारे या लघुपटांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला, त्यांना जगभरातून खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. इंग्रजीमध्ये तयार करण्यात आलेल्या या जाहिराती 9 आंतरराष्ट्रीय भाषांमधील निवेदनासह तयार केल्या गेल्या आहेत. यात जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, रशियन, चीनी, जपानी, कोरियन आणि अरबी या भाषांचा समावेश आहे.
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905418)
Visitor Counter : 225