युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 साजरा करण्यासाठी खेलो इंडिया दस का दम स्पर्धेचं 10 शहरांमध्ये आयोजन; सहभागींना देशातील आघाडीच्या महिला खेळाडूंकडून शुभेच्छा

Posted On: 07 MAR 2023 6:20PM by PIB Mumbai

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 निमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येणारा क्रीडा विभाग 10 ते 31 मार्च या कालावधीत खेलो इंडिया दस का दम कार्यक्रम आयोजित करणार आहे.  आंतरराष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी  प्रथमच अशा प्रकारचा क्रीडा उपक्रम आयोजित करण्यात आला असून  केंद्रीय मंत्रालयाने या स्पर्धेसाठी  एकूण 50 लाख रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.

 10 मार्च रोजी नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर उपस्थित राहतील. या स्पर्धेत देशातील 10 शहरांमध्ये 10 क्रीडा प्रकार  खेळले जाणार असून जवळपास 15000 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.

<

 भारतीय हॉकीपटू राणी, मुष्टियुद्धपटू निखत झरीन आणि इतर आघाडीच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहन  आणि शुभेच्छा देणारे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. काही नामवंत खेळाडू निवडक ठिकाणी कार्यक्रमातही सामील होतील. स्पर्धेत यश मिळविणाऱ्या महिलांचाही सत्कार करण्यात येईल. या स्पर्धेत खो खो, वुशू, कुस्ती, तलवारबाजी, तिरंदाजी, जलतरण, बास्केटबॉल, ज्युडो, अथलेटिक्स आणि योगासन या क्रीडा प्रकारांचा समावेश केलेला आहे.

राष्ट्रीय/राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या महिला खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा हेतू आहे. त्याचप्रमाणे स्पर्धात्मक खेळ भौगोलिकदृष्ट्या ज्या भागात आत्तापर्यंत पोहोचलेले नाहीत तिथं ते पोहोचतील याची सुनिश्चिती  करणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

ठिकाणांची नावे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

***

Nilima C/Parjna/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904948) Visitor Counter : 213