पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा संबंधित कार्यक्षम पुरवठातंत्र याविषयी अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 04 MAR 2023 11:16PM by PIB Mumbai

 

नमस्कार जी!

आज पायाभूत सुविधांवर होत असलेल्या या वेबिनारमध्ये शेकडो सहभागीदार जोडले गेले आहेत आणि 700 पेक्षा जास्त तर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंडळींनी खास वेळ काढून या महत्वपूर्ण उपक्रमाचे महात्म्य समजून एकप्रकारे मूल्यवर्धनाचे काम केले आहे, याचा मला आनंद होतो आहेआपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. याशिवाय अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि वेगवेगळे भागधारकही मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत, त्यामुळे सर्वजण मिळून या वेबिनारला अतिशय समृद्ध करतील, परिणामकारक करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वांनी या वेबिनारसाठी वेळात वेळ काढलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. आणि अगदी हृदयापासून आपले स्वागत करतो. या वर्षाचे अंदाजपत्रक पायाभूत सुविधा क्षेत्राच्या  वृद्धीसाठी नवी ऊर्जा, शक्ती देणारे आहे. जगातल्या मोठ-मोठ्या तज्ञांनी आणि अनेक प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी भारताच्या या अंदाजपत्रकाचे आणि त्यामध्ये घेतलेल्या नीतीगत निर्णयांची भरभरून प्रशंसा केली आहे. आता आपला कॅपेक्स म्हणजेच भांडवली खर्च वर्ष 2013- 14च्या तुलनेमध्ये याचा अर्थ आमचे सरकार येण्याच्या आधीच्या तुलनेमध्ये पाचपट वाढला आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन  अंतर्गत सरकार आगामी काळामध्ये 110 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करीत आहे. अशावेळी प्रत्येक भागधारकावर एक नवीन जबाबदारी आहे. नव्या शक्यता आणि धाडसी निर्णय घेण्याचा हा काळ आहे.

 

मित्रांनो,

कोणत्याही देशाच्या विकासामध्ये, शाश्वत विकासामध्ये आणि देशाच्या  उज्ज्वल भविष्याचा विचार ध्यानात घेवून केलेल्या विकासामध्येपायाभूत सुविधांचे महत्व नेहमीच असते. जे लोक पायाभूत सुविधांशी संबंधित इतिहासाचा अभ्यास करतात, त्यांना ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी चंद्रगुप्त मौर्य यांनी उत्तरापथची निर्मिती केली होती. या मार्गाने मध्य आशिया आणि भारतीय उपमहाव्दीप यांच्यामध्ये व्यापार- कारभार वाढण्यासाठी मदत झाली होती. त्यानंतर सम्राट अशोक यांनीही या मार्गावर अनेक प्रकारची विकास कामे केली. सोळाव्या शतकामध्ये शेर शाह सूरी यांनीही या मार्गाचे महत्व जाणले आणि त्यामध्ये नव्याने विकास कामे पूर्ण केली. ज्यावेळी ब्रिटिश आले, त्यावेळी त्यांनी या मार्गाला आणखी अद्ययावत बनवले आणि मग त्याला जी-टी रोड म्हणजेग्रॅंट-ट्रंक मार्ग असे नाव दिले गेले. याचा अर्थ देशाच्या विकासासाठी महामार्गाच्या विकासाची संकल्पना हजारो वर्षांपूर्वीची, जुनी आहे. याचप्रमाणे आपण पाहतो आहे की, आजकाल रिव्हर फ्रंट आणि वाटरवेज म्हणजे नदीकिनारी मार्ग आणि जलमार्ग यांची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या संदर्भामध्ये आपण बनारसच्या घाटांना पाहिले तर लक्षात येईल की, हे घाटही एका पद्धतीने हजारों वर्षांपूर्वीच बनले आहेत. हे घाट म्हणजेच रिव्हर फ्रंटच आहेत. कोलकातापासून थेट जलमार्ग संपर्कामुळे कितीतरी युगांपासून बनारस हे व्यापाराचे, व्यवसायाचे केंद्र होते.

आणखी एक अगदी रंजक उदाहरण इथे देतो. तामिळनाडूतल्या तंजावूरमध्ये कल्लणै धरण आहे. हे कल्लणै धरण चोल साम्राज्याच्या काळात बनले होते. हे धरण जवळपास दोन हजार वर्ष जुने आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे धरण आजही वापरात आहे.   जगातल्या  लोकांना ही माहिती मिळाल्यानंतर खूप नवल व्यक्त करतात. दोन हजार वर्षांपूर्वी बनविण्यात आलेले हे धरण आजही या क्षेत्राला समृद्धी प्राप्त करून देत आहे. आपण कल्पना करू शकता की, भारताकडे किती मोठा, महान वारसा आहे. कोणकोणत्या क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून भारताकडे प्रचंड सामर्थ् आहे. दुर्भाग्य असे की, स्वातंत्र्यानंतर आधुनिक पायाभूत सुविधांवर जितका भर देण्याची आवश्यकता होती, तितका भर दिला गेला नाही. आपल्याकडे अनेक दशके एकाच विचाराचा प्रभाव होता, तो म्हणजे गरीबी एक मनोभावना आहे-पावरर्टी एज व्हर्च्यू या विचार पद्धतीमुळे देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधीच्या सरकारांपुढे समस्या निर्माण होत होती. त्यांचे मतपेटीचे राजकारण अशा गुंतवणूकीला अनुकूल नव्हते. आमच्या सरकारने अशा प्रकारच्या मानसिकतेतून देशाला फक्त बाहेरच काढले असे नाही तर, आता देश आधुनिक पायाभूत सुविधांवर विक्रमी गुंतवणूकही करीत आहे.

 

मित्रांनो,

याच विचारांचा  आणि याच प्रयत्नांचा परिपाक आता दिसून येत आहे आणि हा झालेला परिणाम संपूर्ण देश आता पहात आहे. राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचे वार्षिक सरासरी प्रमाण  2014 च्या तुलनेमध्ये आज जवळपास दुप्पट झाले आहे. त्याचप्रमाणे 2014 च्या आधी दरवर्षी 600 किलोमीटर लांब रेल लाइनचे विद्युतीकरण केले जात होते. आज हे प्रमाण जवळपास 4 हजार किलोमीटर लांबीपर्यंत पोहोचले आहे. जर आपण विमानतळांच्या संख्येकडे पाहिले तर दिसून येते की, विमानतळांची संख्याही  74वरून दीडशेच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजेच दुप्पट झाली आहे. याचा अर्थ नवीन 75 विमानतळांचे काम इतक्या कमी कालावधीमध्ये पूर्ण झाले आहे. याच प्रकारे आता ज्यावेळी जागतिक वैश्विकरणाचे युग आहे, त्यावेळी बंदरांचेही महत्व वाढले आहे. आमच्या बंदरांच्या कार्यक्षमतेमध्ये आधीच्या तुलनेत आज जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

 

मित्रांनो,

आम्ही पायाभूत सुविधांना देशाच्या अर्थव्यवस्थेची चालक शक्ती  मानतो. याच मार्गाने वाटचाल करत भारत, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचे लक्ष्य प्राप्त करेल. आता आपल्याला आपला वेग आणखी वाढवला पाहिजे. आता आपल्या टॉप गिअरमध्ये पुढे जायचे आहे. आणि यामध्ये पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याची अतिशय महत्वाची आणि मोठी भूमिका आहे. गतिशक्ती बृहत आराखडा, भारताच्या पायाभूत सुविधांचा, भारताच्या बहुविध पुरवठा तंत्राचा कायाकल्प घडवून आणणार आहे. हे आर्थिक आणि पायाभूत सुविधा नियोजनाला, विकासाला एक प्रकारे एकात्मिक बनविण्याचे एक महत्वाचे  साधन आहे. तुम्ही थोडे आठवून पहा, आपल्याकडे सर्वात मोठी समस्या अशी आहे की, बंदर, विमानतळ बनविले जात होते, परंतु पहिल्या टोकापासून ते अखेरच्या टोकापर्यंत संपर्क व्यवस्थेवर लक्ष दिले जात नव्हते. अशा गोष्टीला प्राधान्य दिले जात नव्हते. सेझ आणि औद्योगिक वसाहती बनविल्या जात होत्या, परंतु  त्यांना जोडणारा संपर्क मार्ग आणि विजेची व्यवस्था, पाणी, गॅसवाहिनी अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अतिशय विलंब केला जात होता.

याच कारणामुळे पुरवठा साखळीमध्ये अतिशय अडचणी येत होत्या. देशाच्या जीडीपीचा कितीतरी मोठा भाग अनावश्यक गोष्टींवर खर्च होत होता. आणि विकासाच्या प्रत्येक कामाला एक प्रकारे रोखून धरले जात होते. आता अशा सर्व गोष्टींचा विचार जाणीवपूर्वक केला जात आहे. एकाच वेळी, निश्चित समयसीमेमध्ये आणि सर्वांना बरोबर घेवून, एक प्रकारे ब्लू प्रिंट तयार केली जात आहे. आणि मला आनंद वाटतो की, पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचे परिणामही आता दिसायला लागले आहेत. ज्यामुळे पुरवठा साखळीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो , प्रभाव पडतो, अशा  मधल्या त्रृटी आम्ही चिन्हीत केल्या आहेत. म्हणून यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये 100 गंभीर, महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे आणि त्यासाठी 75,000 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. गुणवत्ता आणि बहुविध पायाभूत सुविधांमुळे आपल्या पुरवठा साखळीवर होणारा खर्च आगामी काळामध्ये आणखी कमी होवू शकणार आहे. यामुळे भारतामध्ये उत्पादित होणा-या सामानावर, आपल्या उत्पादनाच्या कार्यक्षमतेवर खूप सकारात्मक परिणाम होणार तर आहेच. पुरवठा क्षेत्राबरोबरच सुलभ जीवनमान आणि व्यवसाय सुलभतेमध्ये खूप चांगली सुधारणा होणार आहे. अशामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागितेच्या शक्यताही सातत्याने वाढत आहेतखाजगी क्षेत्रांनी या प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे, असे आमंत्रण मी देत आहे.

 

मित्रांनो,

या सर्व गोष्टींमध्ये आमच्या राज्यांचीही खूप मोठी आणि महत्वाची  भूमिका निश्चितपणे असणार आहे. राज्य सरकारांना निधीची कमतरता पडू नये, या हेतूने 50 वर्षांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जाला एक वर्षाचा वाढीव कालावधी दिला आहे. यामध्येही गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या तुलनेमध्ये 30 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामागचा उद्देश असा आहे की, राज्यांनीही दर्जेदार पायाभूत सुविधांना प्रोत्साहन द्यावे.

 

मित्रांनो,

या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांना माझा आग्रह असा आहे की, आणखी एका  विषयावर आपण जरूर विचार करू शकता. आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सामुग्रीचा वापर  केला जाणे, तितकेच आवश्यकही आहे. याचा अर्थ आपल्या निर्मिती उद्योगांसाठीही खूप मोठ्या संधी निर्माण होण्याच्या  शक्यता आहेत. जर या क्षेत्रामध्ये आपल्या आवश्यकतांचे आकलन करून आधीच अंदाज बांधला, आणि त्यादृष्टीने एक विशिष्ट तंत्रज्ञान विकसित होवू शकले तर बांधकाम उद्योगालाही सामुग्रीची ने-आण करणे जास्त सोईचे होईल. आपल्याला एकात्मिक दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा भाग बनणेही आपल्याला भावी निर्माण कार्यांबरोबर जोडण्याची गरज आहे. टाकाऊतून टिकाऊची संकल्पनाही याचा भाग बनणे आवश्यक आहे. आणि मला असे वाटते की, यामध्ये पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचीही महत्वपूर्ण, मोठी भूमिका आहे.

 

मित्रांनो,

ज्यावेळी कोणत्याही ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित होतात, त्यावेळी आपल्याबरोबर विकासही घेवून येतात. एक प्रकारे विकासाची संपूर्ण परिसंस्था एकाच वेळी, समांतरपणे आपोआप उभी राहण्यास प्रारंभ होतो. आणि मी आपल्या जुन्या दिवसांना आठवतो, ज्यावेळी कच्छमध्ये भूकंपाचे संकट आले होते, त्यावेळी स्वाभाविकपणे सरकारच्या समोर तर खूप मोठी समस्या निर्माण होते. कारण इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर  सरकारला मोठा धक्का बसतो. त्यावेळी मी म्हणालो असतो, मंडळी चला! लवकरात लवकर ही इकडची -तिकडची कामे पूर्ण करून दैनंदिन व्यवहार लवकर सुरळीत कसे होतील, याकडे लक्ष द्या. अशा संकटकाळी माझ्यासमोर दोन मार्ग होते. एक म्हणजे, भूकंपग्रस्त भागाला फक्त आणि फक्त बचाव सामुग्री पुरवायची आणि तिथे बचाव कार्यानंतर  जी लहान-मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, त्या इमारतींची दुरूस्ती करून घेवून त्या जिल्ह्यांना त्यांच्या नशीबाच्या हवाले सोडून द्यायचे. अथवा दुसरा मार्ग होता की, या संकटाला संधीमध्ये परिवर्तित करायचे. नवीन दृष्टीकोनातून कच्छला आधुनिक बनविण्याच्या दिशेने काम सुरू करायचे. आता जे काही नुकसान झाले आहे, आपत्ती आली आहे, ते तरी बदलता येणार नाही; मग आता काहीतरी नवीन करू या. जे काही नवीन करू ते चांगलेच करूया आणि तेही मोठ्या प्रमाणावर करू या. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना आनंद वाटेल, मी राजकीय लाभ आणि नुकसान यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला नाही. तात्पुरत्या स्वरूपाचेहलके-फुलके काम करून तिथून बाहेर पडलो नाही. आणि कुणाकडून कौतुक करून घेण्यासाठी, कुणी माझी प्रशंसा करावी म्हणूनही मी काम केले नाही. तर मी एक खूप लांब उडी घेतली. मी दुसरा मार्ग निवडला आणि कच्छमध्ये विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कार्याला आपला मुख्य आधार निश्चित केला. त्यावेळी सरकारने कच्छसाठी राज्यातील सर्वात उत्तम रस्ते बनविले. तिथे अतिशय रूंद, मोठे रस्ते बनवले, मोठ-मोठ्या पाण्याच्या टाक्या बनविल्या. विजेच्या पूर्ततेसाठी दीर्घकाळ पक्के काम केले. आणि त्यावेळी अनेक लोक बोलत होते, ते मला आठवतेय. लोक म्हणायचे, ‘‘अरे इतके रूंद रस्ते इथे बनवले जाताहेत, पाच मिनीट, दहा मिनिट तर या रस्त्यावरून एकही वाहन जात नाही. इथं वाहनंच जास्त येत नाहीत तर मग इतक्या मोठ्या रस्त्यांची काय गरज आहे. इतका खर्च केला जातोय.’’ असे मला लोक म्हणायचे. कच्छमध्ये तर अशा प्रकारे नकारात्मक वृद्धी होतीलोक आपली घरे सोडून, कच्छ सोडून बाहेर जात होते. गेल्या 50 वर्षांपासून लोक कच्छ सोडून जात होते. मात्र मित्रांनो, त्यावेळी आम्ही ज्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जी गुंतवणूक केली, त्यावेळच्या काळाचा विचार सोडून भविष्यातील आवश्यकता लक्षात घेवून सर्व नियोजन केले, त्याचा अद्भूत लाभ आज कच्छ जिल्ह्याला होत आहे. आज कच्छ, गुजरातमधला सर्वात वेगाने विकास करणारा जिल्हा बनला आहे. ज्या अधिका-यांची  कधीकाळी सीमेवर म्हणजे कच्छ जिल्ह्यात बदली होणे म्हणजे शिक्षा वाटत होती. कच्छच्या सरहद्दीवर बदली होणा-या अधिका-याला काळ्यापाण्याची शिक्षा झाली असे म्हटले जात होते. तोच जिल्हा आज सर्वात विकसित जिल्हा बनत आहे. इतके प्रचंड मोठे क्षेत्र कधी काळी अगदी वीराण होते. ते क्षेत्रच आता व्हायब्रंट बनले आहे. आणि कच्छची चर्चा आज संपूर्ण देशभर होते आहे. एकाच जिल्ह्यामध्ये पाच विमानतळ आहेत. आणि त्याचे संपूर्ण श्रेय जर कुणाला द्यायचे असेल तर ते आहे कच्छमधल्या आधुनिक पायाभूत सुविधांना! संकटाला संधीमध्ये परिवर्तित करण्याचे काम केले गेले, या गोष्टीला श्रेय आहे. आणि त्यावेळी तात्पुरती गरज काय आहे, केवळ याचाच विचार करता, भविष्यकाळाचा विचार केला गेला. त्याचा परिणाम आज पहायला मिळत आहे.

 

मित्रांनो,

प्रत्यक्ष पायाभूत सुविधा मजबूत झाल्या तर त्याबरोबर देशाच्या सामाजिक पायाभूत सुविधाही मजबूत होणे हेही तितकेच आवश्यक आहे. आपल्या सामाजिक पायाभूत सुविधा जितक्या बळकट होतील, तितके बुद्धिमान युवक, कुशल युवक , काम करण्यासाठी पुढे येवू शकतील. म्हणूनच कौशल्य विकसन, प्रकल्प व्यवस्थापन, वित्तीय कौशल्य, आंत्रप्रनर कुशलता अशा अनेक विषयांवरही प्राधान्याने  भर देण्याची आवश्यकता आहे. वेग-वेगळ्या क्षेत्रामध्ये लहान -मोठ्या उद्योगांमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या कौशल्याची गरज भासू शकते, याचा अंदाज घेवून त्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. यामुळे देशातल्या मनुष्य बळ सेतूलाही खूप मोठा फायदा होईल. सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांनाही माझे सांगणे आहे की, या दिशेने वेगाने काम करावे. मित्रांनो, आपण सर्व पायाभूत सुविधांचेच निर्माण करीत आहात असे नाही, तर भारताच्या वृद्धीला गती देण्याचेही काम करीत आहात. म्हणूनच या वेबिनारमध्ये सहभागी झाले आहाततुमच्यासारख्या सहभागीदारांची भूमिका आणि तुमच्या सूचना खूप महत्वाच्या  आहेत. आणि असेही पहा, ज्यावेळी पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते त्या कधी-कधी रेलमार्ग, विमानतळ, बंदरे यांच्या परिसरात असतात, असे मानले जाते. मात्र आता आपण पाहिले असेल, या अंदाजपत्रकामध्ये गावांमध्ये गोदामांचा खूप मोठा  प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांच्या पिकांच्या साठवणुकीसाठी अशी गोदामे उभारण्यात येत आहेत. यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. याचाही आपण जरूर विचार करावा.

देशामध्ये निरायम आरोग्य केंद्रांच्या उभारणीचे काम करण्यात येत आहे. लाखो गावांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी उत्तमातील उत्तम निरामय आरोग्य केंद्र बनविण्यात येत आहेत. हेही एक प्रकारे पायाभूत सुविधेचेच काम आहे. आम्ही नवीन रेल्वे स्थानके बनवित आहोत, ही सुद्धा पायाभूत सुविधाच आहे. आम्ही प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देण्याचे काम करीत आहोत. तेही काम पायाभूत सुविधेमध्ये येते. या कामांमध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान, लागणा-या सामुग्रीमध्ये नवेपण, बांधकामासाठी लागणारी वेळ मर्यादा निश्चित करणे, अशा सर्व विषयांमध्ये आता भारताला खूप लांब उडी घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच हे वेबिनार अतिशय महत्वाचे आहे.

आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही केलेले हे मंथन, तुम्हा सर्वांचे हे विचार, तुम्हा सर्वांचा अनुभव या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी उत्तमरितीने व्हावी, यासाठी उपयोगी पडेल. आणि त्यामुळे वेगाने अंमलबजावणी होऊ शकेल, आणि त्याचे सर्वाधिक चांगले परिणाम मिळतील. असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यावतीने आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत.

धन्यवाद!!

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904369) Visitor Counter : 226