पंतप्रधान कार्यालय
जी– 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
02 MAR 2023 9:40AM by PIB Mumbai
परराष्ट्र व्यवहार मंत्री, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख, मान्यवर,
जी–20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना निवडली आहे. उद्देश आणि कृती या दोन्हींसाठी आपल्यातल्या एकवाक्यतेची गरज ही संकल्पना अधोरेखित करते. सामायिक आणि ठोस उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र येण्याची ही भावना आजच्या बैठकीत प्रतीत होईल अशी आशा मी करतो.
महामहीम,
बहुपक्षवाद सध्या संकटात आहे हे आपण सर्वांनी जाणले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक शासन रचनेची दोन उद्दिष्टे होती. पहिले म्हणजे प्रतिस्पर्धी हितांचा समतोल राखत भविष्यातली युद्धे टाळणे. दुसरे म्हणजे सामायिक हिताच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे. वित्तीय संकट, हवामान बदल, महामारी, दहशतवाद आणि युद्धे यासारख्या मुद्यांबाबत गेल्या काही वर्षातला अनुभव हे स्पष्ट दर्शवतो की या दोन्ही उद्दिष्टांमध्ये जागतिक शासन अपयशी ठरले आहे. या अपयशाचे दुष्परिणाम विकसनशील देशांना मोठ्या प्रमाणात झेलावे लागत असल्याचे आपल्याला मान्य करावे लागेल. प्रगतीच्या काही वर्षानंतर आपण आता शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत मागे जात असल्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक विकसनशील देश आपल्या जनतेसाठी अन्न आणि उर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात असतानाच न पेलणाऱ्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी झगडत आहेत. श्रीमंत राष्ट्रांमुळे निर्माण झालेल्या जागतिक हवामान बदलाचा सर्वात जास्त फटकाही या देशांना सोसावा लागत आहे. म्हणूनच भारत आपल्या जी- 20 अध्यक्षपदाच्या काळात ग्लोबल साउथचा आवाज उठवत आहे. आपल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ज्यांना सोसावा लागत आहे त्यांचे म्हणणे ऐकल्याखेरीज कोणताही गट जागतिक नेतृत्वावर दावा करू शकत नाही.
महामहीम,
तीव्र जागतिक विभाजनाच्या काळात आपली बैठक होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून सध्याच्या भू-राजकीय तणावाचा आपल्या चर्चेवर प्रभाव राहणे अतिशय स्वाभाविक आहे. हा तणाव कसा निवळावा याबाबत आपणा सर्वांचा आपापला दृष्टीकोन आहे. तथापि जगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून सध्या या ठिकाणीत नसलेल्यांप्रतीही आपली जबाबदारी आहे. विकास, आर्थिक लवचिकता, आपत्ती संदर्भातली लवचिकता, वित्तीय स्थैर्य, भ्रष्टाचार, दहशतवाद, अन्न आणि उर्जा सुरक्षितता यासंदर्भातल्या आव्हानांवरच्या उपायांसाठी जग जी – 20 कडे पाहत आहे. आपण ज्या समस्यांचे निराकरण करू शकतो त्यांच्या मार्गात आपण असे मुद्दे येऊ देता कामा नयेत ज्यांचे आपण एकत्रित निराकरण करू शकत नाही. गांधीजी आणि बुद्ध यांच्या भूमीत आपली बैठक होत आहे त्यामुळे आपल्यातल्या भिन्नतेवर नव्हे तर आपल्याला जोडणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या संस्कृतीपासून आपण प्रेरणा घ्यावी अशी माझी प्रार्थना राहील.
महामहीम,
शतकातली सर्वात विनाशकारी महामारी आपण अलीकडेच अनुभवली. नैसर्गिक आपत्तीत हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचेही आपण पाहिले. तणावाच्या काळात जागतिक पुरवठा साखळी कोलमडून पडल्याचे आपण पाहिले. स्थिर अर्थव्यवस्था, कर्ज आणि वित्तीय संकटाने अचानक हतबल झाल्याचेही आपण पाहिले. यावरूनच आपल्या समाजात, आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये, आपल्या आरोग्य यंत्रणांमध्ये आणि आपल्या पायाभूत संरचनेत लवचिकतेची आवश्यकता स्पष्ट दिसून येत आहे. एकीकडे विकास आणि कार्यक्षमता तर दुसरीकडे लवचिकता यातला समतोल शोधण्यामध्ये जी-20 राष्ट्रांना महत्वाची भूमिका बजावावी लागेल. एकत्र काम करून आपण हा समतोल अधिक सहजपणे साध्य करू शकू. म्हणूनच आजची आपणा सर्वांची बैठक महत्वाची आहे. आपणा सर्वांची सामुहिक प्रतिभा आणि क्षमता यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आजची बैठक समावेशक ,कृतीशील आणि मतभेदांपलीकडे जाणारी असेल असा मला विश्वास आहे.
आपणा सर्वांचे आभार आणि फलदायी बैठकीसाठी आपण सर्वाना शुभेच्छा.
***
S.Thakur/N.Chitale/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903583)
Visitor Counter : 196
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam