महिला आणि बालविकास मंत्रालय

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय w-20 बैठकीचा आज समारोप


उद्घाटन सत्रात डब्ल्यू -20 ची पाच प्राधान्य क्षेत्रे सांगून केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी केला चर्चासत्राचा प्रारंभ

जगभरातून आलेल्या महिला प्रतिनिधींद्वारे विविध क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर चर्चा

डब्ल्यू -20 प्रतिनिधींची शहरातील वारसा स्थळांना भेट आणि भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनुभवला आस्वाद

Posted On: 28 FEB 2023 4:00PM by PIB Mumbai

छत्रपती संभाजीनगर, 28 फेब्रुवारी 2023


छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसीय महिला-20 (डब्ल्यू -20) प्रारंभिक बैठक आज संपन्न झाली. या संमेलनात सदस्य देश, अतिथी देश आणि विशेष निमंत्रितांच्या जवळपास 150 महिला मान्यवरांनी भाग घेतला.

सोमवारी (27 फेब्रुवारी, 2023) उद्घाटन समारंभात प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री (डब्ल्यूसीडी), स्मृती झुबिन इराणी यांनी भारताच्या अध्यक्षतेखालील डब्ल्यू 20 च्या पाच प्राधान्य क्षेत्रांबद्दल माहिती दिली जसे की , तळागाळातील महिला नेतृत्व, महिला उपक्रम आणि कृषी क्षेत्रातील महिला कौशल्य, डिजिटल दरी दूर करणे, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान लवचिकता कृतीत महिला आणि मुली. जगातील विविध भागातून आलेल्या डब्ल्यू -20 सदस्य प्रतिनिधींचे स्वागत करताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री म्हणाल्या की डब्ल्यू 20 चे नेतृत्व आणि योगदान मोलाचे आहे कारण डब्ल्यू 20 सदस्य प्रतिनिधींचे आगमन हे जगभरातील महिला शोधत असलेल्या उपायांचे आगमन दर्शवते. जगभरातील डब्ल्यू 20 च्या सर्वोत्कृष्ट विचारांचे एकत्रीकरण हे महिला-नेतृत्वातील व्यवसाय, कृषी समाजातील महिला, आरोग्य क्षेत्रातील महिलांची गरज आणि शिक्षण आणि विशेषतः कौशल्य क्षेत्रातील महिला याबाबत प्रत्येक देशाकडून सर्वोत्तम पद्धतींचा लाभ घेण्याविषयी  मार्गदर्शन प्रदान करू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. समानता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी डब्ल्यू -20 सदस्यांना जगभरात आणि सरकार आणि हितधारक संस्थांसोबत महिलांच्या सहभागाची चौकट कशी विस्तारायची यावर विचारमंथन करण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की जगभरातील 3 दशलक्ष महिला ज्या तळागाळातील राजकीय पदांवर  नियुक्त केल्या जातात त्यापैकी 1.4 दशलक्ष महिला भारतातील आहेत. त्यांनी असेही सांगितले की 230 दशलक्ष पीएम मुद्रा कर्जाच्या लाभार्थी या महिला आहेत. भारतातील जवळपास 100 दशलक्ष स्त्रिया कृषी क्षेत्राचा देखील भाग आहेत. भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लैंगिक समावेशन निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी दिली.

जी -20 शेर्पा अमिताभ कांत, भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, आमदार अतुल सावे, संदिपानराव भुमरे, डब्ल्यू 20 चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुलदेन तुर्कटॅन, डब्ल्यू -20 अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा आणि डब्ल्यू -20 च्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक देखील उदघाटन समारंभाला उपस्थित होत्या.

चर्चासत्राच्या प्रारंभी अमिताभ कांत यांनी सोमवारी सांगितले होते की, "महिलांना केवळ लाभार्थी म्हणून नव्हे, तर महिलांना विकासाच्या नेत्या म्हणून उदयास आणणे हा महत्त्वाचा अजेंडा आहे कारण महिला आणि मुले ही गरिबीने सर्वाधिक त्रस्त आहेत". त्यांनी पुढे सांगितले की डब्ल्यू 20 हा महिलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे जो जागतिक समृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण दीर्घकालीन गुंतवणूक आहे.

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) या ऐतिहासिक नगरीत W-20 सदस्य, अतिथी आणि विशेष निमंत्रितांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांनी स्वागत केले. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी महिलांना अत्यंत फायदेशीर अशा पीएमजेडीवाय, मुद्रा योजना सारख्या केंद्र सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली.

डब्ल्यू -20 स्थापना मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या विविध सत्रांमध्ये 'नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगातील महिलांचे सक्षमीकरण', 'हवामान लवचिकता कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका', 'क्रिएटिंग अॅक्शन' यासारख्या विस्तृत विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम परिसंस्थेची निर्मिती, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून प्रवेश सुधार, 'लैगिक डिजिटल तफावत दूर करण्यासाठी कौशल्य' आणि 'शिक्षण आणि कौशल्याद्वारे महिलांसाठी मार्ग तयार करणे' यासारख्या विस्तृत विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. "भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकास" या विषयावर एक विशेष सत्रही संपन्न झाले.

प्रारंभिक बैठकीची चर्चा पुढे नेत, दुसर्‍या दिवसाची सुरुवात आज "अडथळे दूर करणे: महिलांच्या अपारंपरिक कथा" या विषयावरील विशेष सत्राने झाली. आपल्या प्रास्ताविकपर भाषणाची सुरुवात राज्यसभा खासदार डॉ.सोनल मानसिंग यांनी आपली मान लववून, भारतीय प्रथेनुसार आपल्या प्रत्येका मधील देवत्व ओळखण्याचे प्रतीक असलेल्या नमस्काराने केली, आणि बैठकीला उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे स्वागत केले. त्यांनी डॉ. संध्या पुरेचा यांच्या सह, छत्रपती संभाजी नगर या वारसा शहरासाठी महिलांनी दिलेले योगदान अधोरेखित करणारे 'अवया' नावाचे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले.

छत्रपती संभाजी नगर या वारसा शहरासाठी महिलांनी दिलेले योगदान अधोरेखित करणारे 'अवया' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

या सत्रात शाझिया खान, दिशा अमृत, तविशी सिंग आणि स्वाती भंडारी या भारतीय नौदलातील वीरांगनांचा सहभाग होता, ज्यांनी महिलांना विशिष्ट क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या पितृसत्ताक विचारांना मोडून काढण्यासाठी सामाजिक रीतीरिवाजा विरोधात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले. नेव्ही वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या प्रतिनिधी दीपा भट नायर यांनी भारतीय समाजाच्या विकासामध्ये आणि आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणामध्ये  नौदल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी बजावलेली भूमिका सर्वांसमोर उलगडली.

W-20 प्रारंभिक बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात चर्चा करताना भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी

केंद्र सरकारच्या अंतर्गत प्रशासनाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कशी मदत झाली, हे जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका मिशनच्या सदस्य झुबेदिया बीबी यांनी सांगितले.   

जम्मू-काश्मीर ग्रामीण उपजीविका मिशनच्या झुबेदा बीबी W-20 प्रारंभिक बैठकीच्या सत्रात बोलताना

W-20 प्रारंभिक बैठकीच्या सहाव्या सत्रात, 'महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुलभ करणारे: धोरण आणि कायदेशीर चौकट' या शीर्षकाखाली झालेल्या चर्चा सत्रात महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरण आणि कायदेशीर चौकटीच्या भूमिकेवर भर देण्यात आला. इन्क्लुजन नेशन, यूएसए च्या संस्थापक आणि सीईओ, आणि सत्राच्या सूत्रसंचालक मिशेल सिल्व्हरथॉन, यांनी पॅनेलच्या सदस्यांना, त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले. एकतेची ताकद प्रदर्शित करणारी आपली स्वतःची कथा सांगताना सिल्व्हरथॉन म्हणाल्या, “आपण सर्वांनी कोणालाही मागे न सोडता, एकत्र येऊन काम करायला हवं.”  या सत्राच्या पॅनेलमध्ये यूएन वुमन इंडियाच्या देश प्रतिनिधी  सुसान जेन फर्ग्युसन, दक्षिण आफ्रिकेतील अधिवक्ता आणि शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक नार्निया बोहलर, आणि स्पेनमधील MLK लॉ फर्मच्या संस्थापक कॅथरीना मिलर यांचा समावेश होता. जगातील महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या मानसिकता आणि वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी कायदे आणि धोरणात्मक उपाययोजनांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता बन्सुरी स्वराज
यांचा देखील या सत्रातील पॅनेल सदस्यांमध्ये समावेश होता. त्यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या महत्त्वावर जोर दिला आणि राजकीय इच्छाशक्ती हाच लैंगिक समानता आणण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्यामुळे, सर्व महिलांना आपल्या मताचे महत्व ओळखण्यासाठी प्रोत्साहन दिले.  

‘महिलांच्या नेतृत्वाखालील विकास सुलभ करणारी: धोरणे आणि कायदेशीर चौकट’या सत्राचे पॅनेलिस्ट

W-20 प्रतिनिधींनी आज सकाळी हेरीटेज वॉक दरम्यान, बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी या ऐतिहासिक स्थळांना आणि शहरातील जगप्रसिद्ध दरवाजांना भेट दिली. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि परंपरेची झलक दाखवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

महिलांच्या उद्दिष्टांना G-20 चर्चांच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी G20 देश आणि नेत्यांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने, W-20 बैठकीत श्वेतपत्रिका, पॉलिसी ब्रीफ्स, व्हिडिओ डॉक्युमेंटरी, ओपिनियन पीस, माहिती पुस्तिका आणि निवेदने, यासारखे माहितीपूर्ण साहित्य तयार केले जाईल.  

G20 नेत्यांच्या घोषणा आणि निवेदने यावर प्रभाव टाकण्याच्या दिशेने W20 बैठकीत विशेष भर दिला जाईल, ज्या द्वारे, महिला उद्योजकांबरोबर सक्रीय सहभाग आणि लिंग समानतेला पुढे नेणाऱ्या धोरणांची वचनबद्धता यावर एकमत मिळवण्याच्या दिशेने एकत्रित प्रयत्न करता येतील. आपले ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी एकमत तयार करणे, आणि त्या दिशेने कृती करण्यासाठी W-20 इंडियाने, सहयोग (Collaboration), सहकार्य (Cooperation), संवाद (Communication), हे  4C धोरण स्वीकारले आहे.   

 

N.Chitale/Vasanti/Rajashree/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903046) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil