माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त गोव्याच्या केंद्रीय संचार ब्यूरोने केले बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 28 FEB 2023 3:37PM by PIB Mumbai

पणजी, 28 फेब्रुवारी 2023

गोव्यातील केंद्रीय संचार ब्युरोने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त मल्टिमीडिया म्हणजेच बहु माध्यम प्रदर्शन आयोजित केले आहे. पणजीच्या कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरशन बस स्टँड वर हे प्रदर्शन सुरू आहे. उत्तर गोवा विभागाचे पोलीस अधीक्षक निधिन वलसान यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. 3 मार्च पर्यंत हे प्रदर्शन लोकांसाठी खुले असून त्याद्वारे लोकांना भरड धान्याचे महत्त्व सांगितले जात आहे आणि आपल्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था, आयसीएआरनेही इथे आपला स्टॉल लावला आहे, या प्रदर्शनाला जाणारे लोक या स्टॉलवर भरड धान्य तज्ञांशी संवाद साधू शकतात, तसेच अशा आहाराचे प्रत्यक्ष नमुनेही बघू शकतात. या प्रदर्शनाचे ज्ञान भागीदार म्हणून ही संस्था गोव्याच्या प्रादेशिक वातावरणाला अनुकूल अशा भरड धान्याविषयी माहिती देत आहे ज्यात या भूमीतील भरड धान्यांचा इतिहास आणि वर्तमानातील स्थिती यांचाही समावेश आहे.

यावेळी बोलतांना, एसपी निधीन, जे स्वतः कर्करोगातून बरे झाले आहेत, आणि एक खेळाडूही आहेत, त्यांनी, त्यांच्या स्वतःचे अनुभव सांगितले की कशा प्रकारे भरड धान्याने त्यांना पुन्हा सुदृढ करण्यात मदत केली. त्यांनी अलीकडेच यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आर्यनमॅन ट्रायथॉलॉन स्पर्धेच्या प्रशिक्षणात भरड धान्याचा आहार अत्यंत महत्वाचा ठरला, असेही त्यांनी सांगितले. “ गेल्या दहा महिन्यांपासून माझे रात्रीचे जेवण आणि सकाळची न्याहरी यात भरड धान्याचा समावेश असतो. नाचणीचे सत्व हे माझे रोज रात्रीचे जेवण आहे. जेव्हापासून माझ्या आहारात हा बदल झाला आहे, माझी ताकद आणि काटकता यात लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि माझे वजन अजिबात वाढलेले नाही." असेही निधीन यांनी सांगितले. सर्वांनी आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करावा असे आवाहन त्यांनी केले.

आय सी ए आर - मध्य किनारी कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ प्रवीण कुमार म्हणाले, गेल्या काही वर्षात भरड धान्याच्या उत्पादनात किरकोळ वाढ दिसून आली आहे. भरड धान्य उत्पादनाला फारच कमी खर्च येतो आणि पाणी देखील कमी लागते, ज्यामुळे ही पिके घेणे शेतकऱ्यांसाठी सोपे असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते असेही म्हणाले की भरड धान्ये जीवनशैलीशी निगडीत अनेक रोगांशी लढण्यात देखील मदत करतात तसेच शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण देतात. आपले वजन कमी होणे आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणावर अधिक नियंत्रण ठेवण्यात यश आले याचे श्रेय ते भरड धान्यांना देतात.

या प्रसंगी भरड धान्यापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ उपस्थितांना देण्यात आले तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश आहे.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष याविषयी माहिती

भरड धान्ये ही भारतीय उपखंडातील परंपरागत पिके आहेत. भरड धान्याचे दाणे आकाराने लहान असतात, तृण प्रकारात मोडणारी ही पिके वार्षिक असतात आणि सम शितोष्ण कटिबंधातील धान्ये आहेत. ही पिके पावसाच्या पाण्यावर घेतली जाऊ शकतात, यांना अत्यंत कमी पाणी लागते इतर लोकप्रिय धान्याच्या तुलनेत उत्पादकता जास्त असते. सध्या 130 पेक्षा जास्त देशांत यांचे उत्पादन घेतले जाते. आशिया आणि आफ्रिकेतील पाच लाखांपेक्षा जास्त लोकांचा पारंपारीक आहार म्हणून ओळखले जाते. भारताने दिलेला प्रस्ताव मान्य करत संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्याचे मोठे आव्हान जगासमोर असताना, लवचिक तृण धान्य असलेली  भरड धान्य परवडणारा आणि पोषक पर्याय बनू शकतात. यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. एप्रिल 2018 मध्ये भरड धान्यांना 'पोषक कडधान्य' हे नवीन नाव देण्यात आले. त्यानंतर वर्ष 2018 राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. याचा उद्देश, भरड धान्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांची मागणी तयार करणे, हा होता. जागतिक भरड धान्य बाजारात 2021 ते 2026 या काळात 4.5% एकिकृत वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे.


N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


    

 

 


(Release ID: 1903035) Visitor Counter : 197