पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकातील बेळगावी येथे विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ आणि पीएम-किसानचा 13 वा हप्ता जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 27 FEB 2023 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2023

 

भारत माता की जय

भारत माता की जय

नम्मा, सबका साथ सबका विकास मंत्रदा, स्फूर्तियादा, भगवान बसवेश्वर, अवरिगे, नमस्कारागळु। बेलगावियाकुंदा, मत्तुबेलगावियाजनाराप्रीती, एरडू, मरियलागदासिहि, बेलगाविया, नन्नाबंधुभगिनियरिगे, नमस्कारागळु ।

बेळगावच्या जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद अतुलनीय आहेत. हे प्रेम, हा आशीर्वाद आम्हा सर्वांना तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा देतो. तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतात. बेळगावच्या भूमीवर येणे हे कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा कमी नाही. ही कित्तूरकीरनीचेन्नमा आणि क्रांतिवीर सांगोलीरायण्णा यांची भूमी आहे. त्यांच्या शौर्यासाठी आणि गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल देशवासीय आजही त्यांचे स्मरण करतात.

मित्रांनो, स्वातंत्र्यलढा असो किंवा त्यानंतरच्या भारताचे नवनिर्माण असो, बेळगावी जनता नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. आजकाल आपल्या देशात, कर्नाटकातील स्टार्टअप्सची खूप चर्चा आहे. पण एक प्रकारे 100 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये स्टार्टअप सुरू झाले. 100 वर्षांपूर्वी. मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे. बाबुराव पुसाळकर यांनी 100 वर्षांपूर्वी येथे एक छोटेसे युनिट स्थापन केले होते. तेव्हापासून बेळगावी हा विविध उद्योगांसाठी इतका मोठा आधार बनला आहे. बेळगावची हि  भूमिका या दशकात दुहेरी इंजिन सरकारला आणखी बळकटी करायची  आहे.

बंधू आणि भगिनींनो, आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे , त्यामुळे  बेळगावच्या विकासाला नवी गती मिळेल.  शेकडो कोटींचे हे प्रकल्प दळणवळण आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित आहेत. या सर्व विकास योजनांसाठी या क्षेत्राच्या प्रगतीला  गती दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन करतो. आज संपूर्ण भारताचेच बेळगावीने स्वागत केले आहे. आज भारतातील प्रत्येक शेतकरी कर्नाटकशी, बेळगावशी जोडला गेला आहे. आज येथून पीएम किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता पाठवण्यात आला आहे. फक्त एक बटण दाबून, एका क्लिकवर देशातील कोट्यवधी  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16 हजार कोटी रुपये पोहोचले आहेत.

माझ्या इथल्या राइतु बांधवांनी मोबाईल तपासला तर संदेश आलाच असेल. जगातील लोकांनाही आश्चर्य वाटते.आणि एवढी मोठी रक्कम एका क्षणात 16 हजार कोटी रुपये आणि कोणताही मध्यस्थ नाही , कट कमिशन नाही , ना भ्रष्टाचार, थेट शेतकऱ्याच्या खात्यात. काँग्रेसची सत्ता असती तर काँग्रेसचे पंतप्रधान म्हणाले असते की एक रुपया पाठवतो , मात्र 15 पैसेच पोहोचतात. आज जर त्यांनी 16 हजार कोटी पाठविण्याचा विचार केला असता तर तुम्ही विचार करा की 12-13 हजार कोटी रुपये कुठेतरी गायब झाले असते. पण हे मोदींचे सरकार आहे. पै-पै तुमची आहे, तुमच्यासाठी आहे. मी कर्नाटकसह संपूर्ण देशातील शेतकरी बंधू- भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो . होळीच्या सणापूर्वी माझ्या शेतकऱ्यांना या होळीच्याही हार्दिक शुभेच्छा देतो. .

बंधू-भगिनींनो, आजचा बदलता भारत प्रत्येक वंचितांना प्राधान्य देत एकामागून एक विकासकामे करत आहे. आपल्या देशात अनेक दशकांपासून छोटा शेतकरी वर्ग कायमच दुर्लक्षिला गेला गेला होता. भारतात 80-85 टक्के छोटे शेतकरी आहेत. आता हेच छोटे शेतकरी भाजप सरकारच्या प्राधान्यक्रमात आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशातील लहान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत सुमारे अडीच लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तुम्ही म्हणाल किती केले  - अडीच लाख कोटी, किती? शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्येही शेती करणाऱ्या माता-भगिनींच्या खात्यात  50 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या पैशातून शेतकऱ्यांच्या छोट्या गरजा पूर्ण होत आहेत. या खर्चासाठी आता त्यांना

इतरांसमोर हात पसरावे लागत नाहीत, व्याज मागण्यासाठी लोकांकडे जावे लागत नाही, फार मोठे व्याज देऊन पैसे घ्यावे लागत नाहीत.

मित्रांनो, 2014 पासून देश सातत्याने कृषी क्षेत्रात अर्थपूर्ण बदलाकडे वाटचाल करत आहे. भाजप सरकारमध्ये आम्ही शेतीला आधुनिकतेशी जोडत आहोत, भविष्यासाठी शेतीला तयार करत आहोत. 2014 मध्ये देशाने आम्हाला संधी दिली तेव्हा भारतात कृषी क्षेत्रासाठी तरतूद  25,000 कोटी रुपये होती, यंदाच्या अर्थसंकल्पात ही तरतूद .. हा आकडा लक्षात राहील का? लक्षात ठेवलं ? जरा मोठ्याने तर बोला, लक्षात ठेवलं ? बघा, 2014 मध्ये जेव्हा आम्ही सेवेसाठी आलो, तेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली, तेव्हा कृषी क्षेत्रासाठी तरतूद 25 हजार कोटी रुपये होते. किती? 25 हजार कोटी, सध्या आपली  कृषी क्षेत्रासाठी तरतूद 1 लाख 25 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच पाच पटीने वाढ झाली आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते. किती सक्रिय आहे. आम्ही तंत्रज्ञानावर भर दिला, ज्याचा लाभही शेतकऱ्यांना होत आहे. तुम्ही कल्पना करू शकता, जर जनधन बँक खाती नसती, मोबाईल कनेक्शन वाढले नसते, आधार नसते , तर हे शक्य झाले असते का? आमचे सरकार अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडत आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून सतत मदत मिळण्याची सुविधा मिळावी, असा प्रयत्न आहे.

मित्रहो, या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्या शेतीच्या सध्याच्या स्थिती बरोबरच भविष्यातल्या गरजांचा देखील विचार करण्यात आला आहे. आजची गरज साठवणीची आहे, शेतीसाठी लागणारी गुंतवणूक कमी करण्याची आहे, छोट्या शेतकऱ्यांना संघटित करण्याची आहे. यासाठीच अर्थसंकल्पात शेकडो नवीन साठवणीच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या बरोबरच सहकार क्षेत्राच्या विस्तारावर अभूतपूर्व लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. सेंद्रीय शेतीमुळे शेतकऱ्यांना करावी लागणारी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नैसर्गिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना  खतं आणि कीटकनाशकं बनवण्यामध्ये सर्वात मोठी अडचण येते. आता शेतकऱ्यांना यामध्ये मदत करण्यासाठी हजारो मदत केंद्र उभारली जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीत सर्वात मोठा वाटा रासायनिक खतांचा असतो. आता आम्ही पीएम प्रणाम योजना सुरु केली आहे. या माध्यमातून रासायनिक खतांचा कमी प्रयोग करणाऱ्या राज्यांना केंद्राकडून अतिरिक्त सहाय्य मिळेल. बंधुंनो आणि भगिनींनो, देशाच्या शेतीसमोरची भविष्यातली आव्हानं पाहता, आपल्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा आपला निर्धार आहे.

हवामान बदलामुळे किती प्रश्न निर्माण होतात, याचा अनुभव आपला आजचा शेतकरी घेत आहे. म्हणूनच आता आपल्याला आपल्या जुन्या परंपरांचं महत्व पुनः आठवावं लागेल. आपलं भरड धान्य, आणि मी हे पाहिलं, की भरड धान्यामधलं सौदर्यही किती चांगलं आहे. आपलं भरड धान्य सर्व प्रकारचं हवामान, कुठलीही परिस्थिती सहन करण्यासाठी सक्षम आहे, आणि ते ‘सुपर फूड’ देखील आहे. भरड धान्य ‘सुपर फूड आहे’, त्याचं पोषण मूल्यही जास्त असतं. यासाठी आम्ही या वर्षीच्या अर्थसंकल्पात भरड धन्याला ‘श्री अन्नाच्या’ रुपात नवी ओळख दिली आहे. आणि कर्नाटक तर श्री अन्नाच्या बाबतीत जगातलं एक मोठं आणि मजबूत केंद्र आहे. इथे तर श्री अन्नाला पूर्वीपासूनच सिरी-धान्य असं म्हटलं जातं. इथला शेतकरी अनेक प्रकारच्या श्री अन्नाची शेती करतो. कर्नाटकचं भाजपा सरकार आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली यासाठी शेतकऱ्यांना मदतही करत आहे. श्री अन्नाच्या प्रचारासाठी रैता बंधू येडियुरप्पाजींनी इथे सुरू केलेली मोठी मोहीम मला आठवते. आता आपल्याला हे श्री अन्न संपूर्ण जगात पोहोचवायचं आहे. श्री अन्नाच्या शेतीसाठी गुंतवणूकही कमी लागते आणि पाणीही कमी लागतं. म्हणूनच ते छोट्या शेतकऱ्यांना दुप्पट फायदा देणारं आहे. मित्रांनो, या भागात उसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. भाजपा सरकारने उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील ऊस शेतकऱ्यांशी निगडीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखान्यांनी 2016-17 पूर्वी केलेल्या पेमेंटवर करात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी साखर संस्थांवर 10 हजार कोटींचा बोजा पडला होता, जो यूपीए सरकार त्यांच्या डोक्यावर टाकून गेलं होतं. त्या 10 हजार कोटींचा फायदा माझ्या या साखर सहकारी संस्थांना होणार आहे. आमचं सरकार इथेनॉलच्या उत्पादनावर किती भर देत आहे हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. इथेनॉलचं उत्पादन वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 9 वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दीड टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आलं आहे. आता पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. देश या दिशेने जेवढी अधिक वाटचाल करेल, तेवढाच आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.

बंधूनो आणि भगिनींनो, शेती असो, उद्योग असो, पर्यटन असो, उत्तम शिक्षण असो, या सर्व गोष्टी चांगल्या कनेक्टिव्हिटीने अधिक मजबूत होतात. म्हणूनच गेल्या काही वर्षांत आम्ही कर्नाटकच्या कनेक्टिव्हिटीवर खूप लक्ष केंद्रित करत आहोत. 2014 पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये  कर्नाटकसाठी रेल्वेची एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 4 हजार कोटी रुपये होती. तर या वर्षी कर्नाटकात रेल्वेसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कर्नाटकात सुमारे 45 हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे. यामुळे कर्नाटकात किती लोकांना रोजगार मिळत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. बेळगावीचं आधुनिक रेल्वे स्थानक पाहून सर्वांनाच आश्चर्याबरोबरच अभिमानही वाटतो. या आधुनिक रेल्वे स्थानकामुळे इथे अधिक सुविधाही उपलब्ध झाली आहे, आणि रेल्वे बद्दल लोकांचा विश्वासही वाढत आहे. अशी सुंदर रेल्वे स्थानकं लोक यापूर्वी केवळ परदेशातच पाहत होती. आता भारतातही अशी स्थानकं बनत आहेत. अशा आधुनिक अवतारात कर्नाटकातील अनेक स्थानकं, रेल्वे स्थानकं समोर आणली जात आहेत. लोंडा-घाटप्रभा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे आता प्रवास जलद होईल आणि सुरक्षित होईल. अशा प्रकारे ज्या नवीन रेल्वे मार्गांवर आज काम सुरु झालं आहे, ते देखील या भागातलं रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत करतील. बेळगावी तर शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाच्या बाबतीत एक मोठं केंद्र आहे. चांगल्या रेल्वे दळणवळण सुविधेचा लाभ या क्षेत्रांनाही मिळेल. 2019 पर्यंत, कर्नाटकमधल्या खेड्यांमध्ये केवळ 25 टक्के कुटुंबांच्या घरात पाण्याची नळ जोडणी होती.

आज दुहेरी इंजिन सरकारमुळे, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे कर्नाटकात नळाच्या पाण्याची व्याप्ती 60 टक्क्यांहून अधिक झाली आहे.  इथे बेळगावमध्येही दोन लाखांहून कमी घरांमधे नळाद्वारे पाणी मिळायचे. आज हा आकडा 4 लाखांच्या पुढे गेला आहे. गावातील आपल्या बहिणींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठीच या अर्थसंकल्पात 60 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

भाजप सरकार समाजातील प्रत्येक लहानात लहान घटकाला सक्षम करण्यासाठी काम करत आहे, ज्याची पूर्वीच्या सरकारांनी दखलही घेतली नाही.  बेळगाव हे कारागीर, हस्तकलाकारांचे शहर आहे. ते वेणुग्राम म्हणजेच बांबूचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या सरकारांनी बांबूच्या कापणीवर दीर्घकाळ बंदी घातली होती.  आम्ही कायदा बदलून बांबू शेती आणि व्यापाराचा मार्ग खुला केला. त्याचा बांबूचे काम करणाऱ्या कलाकारांना खूप फायदा झाला आहे. बांबू व्यतिरिक्त इतरही बऱ्याच कलाकृती इथे बनवल्या जातात. अशा मित्रांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच आम्ही पीएम विश्वकर्मा योजना घेऊन आलो आहोत. या योजनेद्वारे अशा सर्व मित्रांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.

मित्रांनो,

आज जेव्हा मी बेळगावात आलो आहे, तेव्हा मला आणखी एका विषयावर माझे म्हणणे मांडायला नक्कीच आवडेल. मी तुम्हाला आठवण करून देतो की काँग्रेस कशाप्रकारे कर्नाटकचा द्वेष करते.  कर्नाटकातील नेत्यांचा अपमान करणे हा काँग्रेसच्या जुन्या संस्कृतीचा भाग आहे.  काँग्रेसमधील विशेष कुटुंबियांना अडचणीच्या ठरणाऱ्यांचा काँग्रेसमध्ये अपमान केला जातो. इतिहास साक्षीदार आहे की काँग्रेस परिवारासमोर एस.के.  निजलिंगप्पा आणि विरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा अपमान कसा झाला हे कर्नाटकातील जनतेला माहीत आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या खास कुटुंबासमोर कर्नाटकातील आणखी एका नेत्याचा अपमान झाला आहे. 

मित्रांनो,

या मातीचे सुपुत्र, 50 वर्षांचा संसदीय कार्यकाळ असे श्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे.  जनतेच्या सेवेसाठी त्यांनी शक्यतोपरी प्रयत्न केला आहे. पण त्या दिवशी,हे पाहून मला वाईट वाटले.. छत्तीसगडमधे त्या कार्यक्रमात, काँग्रेसचे अधिवेशन सुरू असताना, सर्वात वयोवृद्ध, राजकारणातील सर्वात ज्येष्ठ, खर्गेजी तिथे उपस्थित होते. आणि ते त्या पक्षाचे अध्यक्ष होते. ऊन होते, उभ्या असलेल्या प्रत्येकाला ऊन लागणे स्वाभाविक होते. पण काँग्रेसचे सर्वात जुने आणि ज्येष्ठ नेते खरगे यांना उन्हात ती छत्री लाभली नाही. शेजारी दुसऱ्या कोणासाठी तरी छत्री लावली होती.

यातून दिसून येते की खरगे जी म्हणायला काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण काँग्रेसमध्ये त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, ते पाहता रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे सारे जग पाहत आहे आणि समजून आहेत.आज देशातील अनेक पक्ष त्याच कुटुंबवादाच्या जोखडात अडकले आहेत.  यातून देशाला मुक्त करायचे आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेलाही काँग्रेससारख्या पक्षांपासून सावध राहावे लागेल. आणि हे काँग्रेसी लोक इतके निराश झाले आहेत, आता त्यांना वाटते की जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. आणि म्हणूनच आजकाल सगळे म्हणत आहेत- मर जा मोदी, मर जा मोदी.  मर जा मोदी अशा घोषणा दिल्या जात आहेत. काही लोक कबरी खोदण्यात व्यस्त झाले आहेत.  ते म्हणतात- मोदी तेरी कब्र खुदेगी. मोदी तेरी कब्र खुदेगी.  पण देश म्हणतोय 'मोदी तेरा कमल खिलेगा'.

मित्रांनो,

स्वच्छ भावनेने काम केले की योग्य विकास होतो. डबल इंजिन सरकारचा हेतूही स्वच्छ आहे आणि विकासाची बांधिलकीही पक्की आहे. त्यामुळे हा विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे. कर्नाटक आणि देशाच्या विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला असेच पुढे जायचे आहे.  सर्वांच्या प्रयत्नाने आपण देशाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकू. आणि आजच्या कार्यक्रमाला मला थोडा उशीर झाला. हेलिकॉप्टरने येताना वाटेत बेळगावकरांनी जे स्वागत केले आणि आशीर्वाद दिले. माता, भगिनी, वडीलधारी मुले सर्वांनीच, ते अभूतपूर्व दृश्य होते.

बेळगावच्या, कर्नाटकाच्या या प्रेमापुढे मी त्यांना माथा टेकवून त्यांना प्रणाम करतो, त्यांचे आभार मानतो. आज माझा कर्नाटक दौरा सुद्धा विशेष आहे कारण मी सकाळी शिवमोगा येथे होतो आणि तिथल्या विमानतळावर मला कर्नाटकातील लोकांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले. पण त्याचवेळी आमचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. आणि शिवमोगाहून इथे आल्यावर तर तुम्ही सर्वांनी कमालच केली.  हे प्रेम, हे आशीर्वाद, माझ्या बेळगावच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या कर्नाटकातील बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही मला हे प्रेम देत आहात ना, तुम्ही आम्हा सर्वांना हे आशीर्वाद देत आहात ना, मी ते व्याजासह परत करीन. आणि मी कर्नाटकचा विकास करून परत करेन , बेळगावचा विकास करून परत करेन .  पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.  माझ्यासोबत म्हणा – भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.

खूप खूप धन्यवाद!

 

 

 

 

 

 

 

 

S.Kane/Sushama/Rajashree/Vinayak/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903033) Visitor Counter : 107