विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सरकार संपत्ती आणि रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योग-संचालित स्टार्ट-अप्सना देणार प्रोत्साहन -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
26 FEB 2023 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2023
संपत्ती आणि रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार उद्योग-संचालित स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; भू - विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
ते आज राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्था, (NII), दिल्ली येथे जैवतंत्रज्ञान विभागाच्या 37 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते. स्टार्ट-अप्सची भरभराट टिकवून ठेवण्यासाठी उद्योग क्षेत्राने समान भागीदारी आणि जबाबदारीसह समान योगदान देण्याचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
उद्योगाने जर सुरुवातीपासूनच संकल्पना /विषय/ उत्पादन मध्यवर्ती ठेवून सरकारशी जुळणारी नि:पक्षपाती गुंतवणूक केली तर स्टार्ट-अप शाश्वत बनतील, असेही ते म्हणाले. देशात “नवोन्मेषी परिसंस्थेला ” प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये निधीची अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारत जागतिक जैव-उत्पादन केंद्र बनण्याच्या तयारीत आहे आणि 2025 पर्यंत जगातील पहिल्या 5 देशांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ जितेंद्र सिंह यांनी भारताच्या स्वत:च्या रेणू विकासाची बाजू मांडली आणि भारतीय समस्यांसाठी भारतीय उपाय योजले पाहिजेत यावर भर दिला. जैवतंत्रज्ञान हे उद्याचे तंत्रज्ञान आहे कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आधीच त्याच्या संपृक्ततेच्या टप्प्यावर पोहोचले आहे, असे त्यांनी सांगितले. जैवतंत्रज्ञान ही अमृत काळातील अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली ठरेल असे ते म्हणाले. भारताला जगातील आघाडीचे राष्ट्र बनविण्यावरही सिंह यांनी भर दिला.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902587)
Visitor Counter : 197